Monday, February 4, 2019

जीपीटी ते स्टार्ट गिविंग फाउंडेशन

जीपीटी ते स्टार्ट गिविंग फाउंडेशन
१९९२ मध्ये आम्ही इंजिनीअरिंग डिप्लोमा घेऊन ठाण्याच्या शासकीय तंत्रनिकेतनातून (गव्हर्मेंट पॉलिटेक्निक ठाणे) बाहेर पडलो. त्यावेळी मोबाईल नव्हते. इतकेच काय...पण लँडलाईन फोनही आमच्याकडे नव्हते. आमचे कॉलेज ठाणे शहरापासून दूर.....जाण्या येण्याचा त्रासच असायचा. त्यामुळे बराचसा वेळ कॉलेजमध्ये जायचा. कदाचित त्यामुळंच आमचे ऋणानुबंध घट्ट झाले असतील. प्रत्येकाचे आपापल्या विभागानुसार ग्रूप होते. म्हणजे मुलुंड ते दादर मध्ये राहणारे, ठाण्यात राहणारे, तर डोंबिवली कल्याण येथे राहणारे. काही तर नव्या मुंबईतूनही यायचे. पण सर्वांच्यात एकी प्रचंड होती. कॉलेज संपल्यावर ही आम्ही जमेल तसे एकमेकांच्या संपर्कात राहिलो. दर तीन ते चार महिन्यांनी भेटायचो ...पार्टी करायचो.कोणाच्या घरातील सुख दुःखाच्या वेळीही एकत्र यायचो.
मग मोबाईलचा जमाना आला.प्रत्येकजण कमावता असल्यामुळे प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला आणि अजून जवळ आलो.
अचानक एके दिवशी अमेरिकेत नोकरी करणाऱ्या मंगेशचा फोन आला."अनिषची तब्येत बिघडली आहे त्याला भेटशील का .... ?? दुसऱ्या दिवशी आम्ही दोघे तिघे त्याला भेटायला गेलो . त्यानंतर काही दिवसांनी मंगेशही भारतात आला . म्हणून आम्ही परत काही मित्र अनिषला घरी भेटायला गेलो त्यानिमित्ताने मंगेशची ही भेट झाली आणि तेव्हाच व्हाट्स अपवर जीपीटी ग्रुप (गव्हर्मेंट पॉलिटेक्निक ठाणे) निर्माण झाला. प्रत्येकाने आपापल्या कॉन्टॅक्ट मधील मित्र अॅड केले .. मग सर्वांशी रोज बोलणे होऊ लागले . बर्‍याच जणांची माहिती कळली. कोण ..??कुठे ..?? काय करतात..?? तेही कळले .मित्रांची प्रगती पाहून खूपच आनंद होत होता.
असेच एक दिवस चॅटिंग करत असताना एकाने प्रश्न विचारला... हे मोठे सेलिब्रिटी समाजासाठी काय करतात ..?? समाज त्यांना मान देतो डोक्यावर घेतो त्याबदल्यात हे काय देतात ... ?? दुसर्याने उत्तर दिले त्यांचे सोड तू आणि मी काय करतो समाजासाठी ??  सामाजिक संस्थाना देणगी देतो ते केवळ टॅक्स वाचविण्यासाठी ..,बाकी काय करतो..?? मग चर्चा रंगली आणि  सगळ्यांचे असे ठरले की काहीतरी असे करू की आपल्याला समाधान आणि गरजूना योग्य मदत मिळाली पाहिजे. चला आपण देऊ समाजाला काहीतरी . स्टार्ट गिविंग .....
आणि अश्या तऱ्हेने स्टार्ट गिविंगची स्थापना झाली . आम्ही सर्वच इंजिनियर असल्यामुळे शैक्षणिक क्षेत्रातच काहीतरी करावे असे ठरले . त्याच वेळी राकेशने एका एनजीओशी आमची ओळख करून दिली. कापसे मॅडम येऊर मधील ग्रामविकास शाळेत कार्य करीत होत्या . त्यांच्या सहकार्याने आम्ही त्या शाळेत पोचलो . अपयशाने शिकत पुढे  जायचे असेच आमचे ठरले होते . एकमेकांवर विश्वास ठेवा बडबड नको कृती करा हेच आमचे बोध वाक्य होते. कमीतकमी पेपरवर्क करून मदत करायची हे ही नक्की झाले . मध्येच संस्था रजिस्टर्ड करायची का ?? असाही एक विषय आला पण आपल्याच खिश्यातून पैसे काढायचे आणि खर्च करायचे असतील तर कशाला रजिस्टर्ड करा ..?? असे बोलून तो ही विषय संपविला .
येऊरच्या ग्रामविकास शाळेत आम्ही भेट दिली तेव्हा अनेक समस्या जाणवल्या. अनवाणी पायाने जंगलातून पायपीट करत शाळेत येणारी मुले ... फाटके गणवेश.. अजून बरेच काही . साधारण १२५ विद्यार्थी तिथे शिकत होते . मग त्यांच्यासाठी आम्ही शूजची व्यवस्था केली. वर्षाला दोन गणवेश दिले. स्पर्धा परीक्षेत यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे. त्याच वेळी संजय आणि भूषणचा विकास हायस्कूल विक्रोळीचा ग्रूप आम्हाला बाहेरून जॉईन झाला. ते तर दहावीपासून एकत्र होते . त्यात लेडी डॉक्टर्स होत्या. स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. अनिता, डेंटिस्ट डॉ. स्मिता, स्कीन स्पेशालिस्ट डॉ वीणा, डॉ. उषा, आयुर्वेदाचार्य डॉ. सुवर्णा. या सर्वाना समाजसेवेची आवड होती. जमेल तेव्हा आणि जमेल तिथे त्या आपल्या ज्ञानाचा वापर समाजासाठी करीत होत्या. त्यांच्या आग्रहाने आम्ही शाळेत मेडिकल कॅम्पही घेतला .
पण कुठेतरी आम्हाला काही खटकत होतं. हे सर्व अनेक संस्था मोठया प्रमाणात करीत होत्या आम्हाला काहीतरी वेगळे करायचे होते . शेवटी चर्चा करता करता राजेंद्र आणि संजयच्या डोक्यातून डिजिटल अभ्यासक्रम अर्थात इ लर्निंग देण्याची आयडिया निघाली. मुंबईतील प्रत्येक शाळेत आज प्रोजेक्टर आणि स्क्रीन मार्फत वर्गावर्गातून इ लर्निंग शिकवले जाते . या शाळेत ते दिले तर ....?? मग संजयने सर्च करून एका कंपनीला डिजिटल अभ्यासक्रमाचे काम सोपविले . आम्ही त्या शाळेत पहिली ते सातवीचा अभ्यासक्रम ..प्रोजेक्टर ..स्क्रीन फिट करून दिले .मग आमच्या वार्षिक बजेटचा विचार करता ग्रामीण भागातील शाळेत असे देता येईल का असा विचार झाला . ग्रूपमधील प्रत्येक सदस्याने आपल्या गावातील शाळा डिजिटल करावी आणि त्या शाळेची जबाबदारी घ्यावी असे ठरले .मग बर्‍याच जणांनी आपल्या गावातील शाळेत डिजिटल अभ्यासक्रमाची मागणी केली . योगायोगाने पुण्यातील एक इ-लर्निंग बनविणारी कंपनी आमच्या मागे उभी राहिली . त्यांनी आम्हाला अजून महत्वाचे बदल सुचविले . ज्यामध्ये प्रोजेक्टर आणि स्क्रीन न देता टीव्ही च्या माध्यमातून इ-लर्निंग देता येईल अशी कल्पना दिली . बजेट लिमिटेड असल्यामुळे जितक्या होतील तितक्या शाळा करायच्या असे ठरले . त्याप्रमाणे आम्ही कणकवली, विक्रमगड, श्रीवर्धन , वाडा , धुळे येथील शाळाना डिजिटल बनविले. मग विकासचा आणि जीपीटी चा ग्रुप एकत्र करून स्टार्ट गिविंग फाउंडेशन ग्रूप बनविला. त्यावर फक्त कामाविषयीचेच मेसेज असतील असा कठोर नियम बनविला .हळू हळू आमच्या कार्याची माहिती घेऊन बरेचजण प्रभावित झाले. १९९१ ला आमच्या कॉलेजमध्ये क्लार्क म्हणून आलेली सुनीता २५ वर्षांनी आमच्या संपर्कात आली. तिला आमचे कार्य आवडले आणि ती अॅक्टिव्ह सभासद बनली. मी, राजेंद्र परब, सुनीता चिंदरकर आणि ज्यांच्या गावात शाळा आहे ते असे सर्व प्रत्यक्षात जाऊन अभ्यासक्रम कसा वापरायचा याची माहिती देऊ लागलो. राजेंद्र परब आणि संजय पाटील  यांनी हिशोब ठेवायचे काम आपल्या हाती घेतले. तर फेसबुकच्या माध्यमातून बरेचजण आमच्या ग्रुपचे सभासद बनले आणि  पाठिंबा देऊ लागले. बाहेरून काहींनी आर्थिक मदत ही केली. आमच्यावर विश्वास ठेवून मदत करणाऱ्या सगळ्यांचे फाउंडेशनने स्वागतच केले आहे. इथे प्रत्येकजण आपली मते स्पष्टपणे मांडू शकतात . आपल्या शंका विचारू शकतात. आमची अट एकाच असते एकमेकांवर विश्वास ठेवा.
इथे आम्हाला खूप चांगले अनुभव ही आले तसेच वाईट अनुभव ही आले. पण ते फार कमी प्रमाणात होते. काही ठिकाणी शाळेकडून फारसा प्रतिसाद लाभला नाही. पण आम्ही त्यातूनच बरेच काही शिकलो. पूर्वी आम्ही संपूर्ण सेट फ्री द्यायचो पण एका शाळेने त्याचा गैरफायदा घेतला, म्हणून यापुढे शाळेकडून काहीतरी मदत घ्यावी.. लोकसहभागातून मदत घ्यावी असा प्रस्ताव पास झाला.
बऱ्याच संस्था आमच्याकडे इतर प्रकारची मदत मागतात पण केवळ डिजिटल शाळा हेच आमचे लक्ष असल्यामुळे आम्ही त्यांना फाउंडेशनकडून मदत नाकारतो पण इतर ठिकाणाहून मदत करण्याचे आमच्या ग्रूपतर्फे आवाहन करतो.मध्येच टिटवाळ्यातील एका अनाथाश्रमातून काही मदत होईल का ..?? असे विचारण्यात आले  तेव्हा आमच्या ग्रूपमधील लेडी डॉक्टरांनी पुढाकार घेऊन मेडिकल कॅम्प घेतला आणि फाउंडेशनतर्फे त्यांना मोफत औषधे दिली गेली. इथे आमच्याकडे कोणतीही कागदपत्रे नाहीत. आमचे सगळे कार्य व्हाट्स-अॅप, फेसबुकद्वारा चालते. वर्षभराचा हिशोबही व्हाट्स-अॅप वर मांडला जातो .
गेल्या चार वर्षात आम्ही १६ शाळा डिजिटल केल्या जवळपास २५०० विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला आणि दोन मेडिकल कॅम्प यशस्वीरीत्या पार पाडले. भविष्यातही अधिकाधिक  चांगली सेवा समाजाला देता येईल यासाठी प्रयत्न करु. सोशल मीडियाने आमच्या जीवनात मोठी क्रांती घडवली आहे ही गोष्ट मात्र खरी.
© श्री. किरण कृष्णा बोरकर
स्टार्ट गिविंग फाउंडेशन
kiran_borkar@yahoo.co.in

No comments:

Post a Comment