Friday, February 8, 2019

व्हॅलेंटाईन डे..... उत्तरार्ध


व्हॅलेंटाईन डे..... उत्तरार्ध
आज तो डायरेक्ट तिच्या ऑफिसच्या गेटजवळच येऊन उभा राहिला. तिच्या चेहऱ्यावर येणारा आनंदाचा आश्चर्याचा धक्का त्याला पाहायचा होता. तिला असे अनपेक्षित गोड धक्के देणे आवडायचे त्याला.लग्नाआधीही अनेकवेळा तो स्टेशनवर जाऊन उभा राहायचा ..कधी कधी तिला फारच उशीर व्हायचा पण तरीही त्याला ते मान्य असायचे.
आज व्हॅलेंटाईन डे ...तिला काहीतरी सरप्राईसची अपेक्षा होती पण तो बाहेर असा समोर उभा राहील ही अपेक्षा नसणार याची त्याला खात्री होती.पण आज वेळेवर बाहेर पडली तर ठीक नाहीतर उशीर झाला तर ती डायरेक्ट घरी घेऊन जाईल याची त्याला खात्री होती.
पाच वाजले तसे हळू हळू एकेक जण बाहेर पडू लागले .थोडयावेळाने ती त्याला दिसली...मैत्रिणींच्या घोळक्यात उठून दिसत होती . तिने त्याच्याकडे पाहिले आणि एक आश्चर्य डोळ्यात उमटून गेले. मैत्रिणींच्या कानात काही कुजबुज करून ती बाहेर पडली.मैत्रिणीचे कॉमेंट ऐकून तिच्या चेहऱ्यावर लाली चढली.
"हे काय आता ..?? इथे कशाला आलात ..?? बायको काय पळून जात नव्हती....."?  ती लटक्या रागाने बोलली .पण चेहऱ्यावरचा आनंद काही लपवता आला नव्हता .
"जास्त वेळ नाही हा बाहेर थांबू शकत....नंतर आवरताना घाई होते मग ...."तिने आधीच सांगितले.
" हो ग बाई .. थोडा वेळ बसू आणि निघू .."असे म्हणत  त्याने टॅक्सी केली आणि पार्कात आले.
"द्या माझे गिफ्ट ....."तिने हात पुढे केला.त्याने सॅकमधून गजरा काढला आणि तिच्या केसात माळला ...."हल्ली जमते हो तुम्हाला ..कितीजणींवर ट्राय केलात.." ती डोळे मिचकावत म्हणाली.तो खदखदून हसला "आणि शेंगदाणे ..."असे म्हणत तिने हात पुढे केला.
"आज नाही आणले.. आज जे काही आणले ते फक्त तुझ्यासाठी... "असे म्हणत परत सॅकमधून एक छोटा ज्वेलरी बॉक्स काढला आणि तिच्या हातात दिला.
"हे म्हणजे फारच हो आता ..?? कुठे लॉटरी लागली की काय ..."?? असे म्हणत तिने बॉक्स उघडला . आत छान एक नेकलेस आणि इयर रिंग होत्या.
"किती छान ...ती पुटपुटली.
" अमेझॉन..... फक्त 450 रु..." तो रुबाबात म्हणाला . "असू दे .. चालेल की आम्हाला....आम्हीही पुढे एक शून्य वाढवून सांगू ...." तीही रुबाबात म्हणाली आणि दोघेही हसू लागले.पुढचा एक तास कसा गेला हे त्यांना कळलेच नाही .आज ती भरभरून बोलत होती .तो तिच्या चेहऱ्याकडे भान हरपून पाहत होता ."साले हे क्षण रोज का येत नाहीत आपल्या आयुष्यात ..."?? तो मनात विचार करीत होता . अंधार पडू लागला तशी ती सावध झाली."चला निघुया.... घरी वाट पाहत असतील.."तो नाईलाजाने उठला.त्याची नाराजी ओळखून तिने प्रेमाने त्याचे गाल ओढले.
रस्त्यात तिने श्रीखंड विकत घेतले "माझ्यातर्फे आपल्या सर्वांसाठी व्हॅलेंटाईन गिफ्ट......"असे म्हणत तिने डबा त्याच्याससमोर नाचविला.
घरात शिरताच सासू म्हणाली "अग ...आताच तुझ्या नणंदेचा फोन येऊन गेला .अर्पिताचे लग्न पक्के झालेय . तिला घरी बोलवा एकदा जेवायला आणि हो काहीतरी हातात ठेवायला गिफ्ट घेऊन या ."तिने हसून मान डोलावली.आत जाताच त्याने विचारले "काय गिफ्ट घ्यायचे ग ...??बजेट कोसळणार आपले "
तिने हसून सांगितले "काळजी करू नका..आहे आपल्याकडे."असे बोलून पर्समधून त्याने दिलेला ज्वेलरी बॉक्स काढून दाखविला.
"अरे पण हे तुझ्यासाठी आहे .... नको ते देऊ ..आपण दुसरे काही देऊ .."तो चिडून म्हणाला.
"आहो ..!! हे काय मी रोज घालणार आहे का .. ?? सध्या तीन महिने तरी आपल्याकडे काही समारंभ नाही . डायरेक्ट अर्पिताचे लग्न.मग त्याच वेळी घेऊ की छान काहीतरी आणि तुम्ही मला आवडती गिफ्ट दिली आहेच .."केसातील गजऱ्याकडे हात दाखवून ती म्हणाली "शेवटी भाचीला या निमित्ताने व्हॅलेंटाईन गिफ्ट देऊ आपल्याकडून .."असे म्हणत प्रेमाने त्याला जवळ घेतले.
© किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment