Monday, February 4, 2019

प्रगती....२

प्रगती....२
कॉलेज कॅन्टीनमध्ये आज धमालच होती. तिच्या मैत्रिणीचा वाढदिवस होता .सर्व एकत्र बसून धमाल करत होते .मैत्रिणीने सर्वांच्या हातात तिच्या वडिलांनी परदेशातून आणलेले चॉकलेट ठेवले.हिने गपचूप ते आपल्या बॅगेत टाकले .घरी छोटा भाऊ होता .भांडणे नेहमीच व्हायची त्यांची .पण प्रेमही तितकेच होते. इतके भारीचे चॉकलेट बघून त्याचा चेहरा कसा होईल हे आठवून ती खुदकन हसली.
कॉलेज संपल्यावर सर्वाना बाय करून ती घरी निघाली.फूटपाथवरील त्या झोपडीच्या दारात तो छोटा मुलगा शांतपणे बसला होता .आज त्याचे कपडे नेहमीपेक्षा छान स्वच्छ दिसत होते .पण चेहरा उदास होता. ती त्याला नेहमी तिथे खेळताना पहायची. हातात प्लास्टिकचे तुटलेले विमान घेऊन तो जोरात पळायचा. त्याच्या निरागस चेहऱ्याचे तिला खूप कौतुक वाटायचे .
पण आज त्याचा उदास चेहरा पाहून तिला नवल वाटले . इतक्यात त्या झोपडीच्या दारातून तरुण स्त्री बाहेर आली आणि त्या छोटुच्या गळ्यात हात टाकून "हॅप्पी बर्थडे बाबू ...असे म्हणत गालाची पप्पी घेतली. "आज संध्याकाळी तुला चॉकलेट नक्की आणीन बाबू..." असे म्हणून निघून गेली .ते पाहून ती हसली हळूच त्याच्यासमोर जाऊन उभी राहिली . मैत्रिणीने दिलेले ते परदेशी चॉकलेट पर्समधून काढून त्या छोटुच्या हातात दिले .हॅपी बर्थडे म्हणत तिने त्याचा हात हाती घेतला .चॉकलेट पाहून छोटुचे डोळे चमकले . तोड पसरून छानपैकी हसत त्याने तिच्याकडे पाहिले. मन भरून येणे म्हणजे काय ते तिला आज कळले .
©श्री.किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment