Tuesday, February 5, 2019

प्रगती ....३

प्रगती .....३
आज तिच्या घरी गडबड उडाली होती.कारणच तसे होते ...आज तिला पाहायला मुलगा येणार होता.आई.. वडील ...ती ...आणि छोटी बहीण हाच तिचा परिवार.ती एका मोठ्या कॉर्पोरेट ऑफिस मध्ये कामाला होती.छोटी बहीण ही कमावती होती.सधन  कुटुंबियांपैकी होते ते.पण आईवडील जुन्या वळणाचे.
बऱ्याच काळाने तिने साडी नेसली होती .त्या साजशृंगारात फारच देखणी दिसत होती. अर्थात तिलाही आपले हे रूप आवडले होते म्हणा. बहिणीने तर बरेच फोटो काढले होते तिचे .आणि सेल्फीही. व्हाट्स अपच्या डीपी ची महिनाभर तरी काळजी नव्हती. आरश्यात बघून स्वतः ला निखरत असतानाच आई आत शिरली."चल .....मंडळी आली आहेत. पण काही उलटसुलट बोलू नकोस . बाहेर सर्व नात्यातील बसली आहेत. सर्व काही रीतिरिवाज आणि परंपरेनुसार होईल.तू फक्त शांत बस "मनात आलेला संताप आईकडे पाहून तिने आवरला . मुकाटपणे बाहेर गेली.
मुलगा खरेच छान होता . तिला तो पहाताचक्षणी आवडला. ती समोर बसली आणि मोठ्यांची चर्चा ऐकू लागली. लग्नाचा खर्च मुलीकडून होईल. पंचवीस तोळे सोने .संसाराला लागणाऱ्या सर्व वस्तू मुलीकडून . ती मनातल्या मनात हिशोब करत होती. बापरे साधारण 20 लाखापर्यंत खर्च जातोय .आणि तोही आम्हीच करायचा ....?? सहन न होऊन ती मध्ये बोलली" मी काही बोलू का...."?? सर्वच आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागले .आईने कपाळावर हात लावला.
"तू लहान आहेस अजून असे मध्ये बोलायला ..".तिचा काका म्हणाला.
"मग लग्न का करतायत माझे...." तेव्हढ्याच जोरात तिने उत्तर दिले .
मग नवऱ्यामुलांकडे पाहून तिने विचारले.." मी काही विचारू का ...?? त्याने हसून मान डोलावली .
"तुमचा पगार किती ..."? त्याने पटकन उत्तर दिले. तुमची गावी काही मालमत्ता...?? तिचा दुसरा प्रश्न..
"वडिलोपार्जित घर आहे आणि तिथे काका रहातात आम्ही जात नाही जास्त...."त्याने उत्तर दिले
"मग इथे काही मालमत्ता....??
"फ्लॅट बुक करायचा आहे पण इथे घेण्याइतपत बजेट नाही म्हणून थोडे लांबच घेणार  आहे ..."त्याचा स्वर हळू हळू उतरू लागला.
"मागे कोण ..."? तिचा पुढचा प्रश्न.
"एक भाऊ आणि एक बहीण ...."त्याने सहज उत्तर दिले .
आजूबाजूला कुजबुज सुरू झाली ."ही काय पद्धत आहे ......"? मोठा काका ओरडला "आम्ही आहोत हे सर्व पाहायला .....तुला विचारण्याची गरज नाही "तिने नुसते हात वर करून त्यांना थाबवले.
"आता ह्याच प्रश्नांची उत्तरे मी देते.माझा पगार तुझ्या पगारापेक्षा 60% जास्त आहे .मला फक्त एक बहीण आहे . गावी माझ्या वडिलांनी दोन एकर जमीन स्वबळावर घेतलीआहे .मी याच विभागात दोन बेडरूमचा फ्लॅट दोन वर्षांपूर्वीच बुक केला आहे . कदाचित या एक दोन महिन्यात चावी मिळेल. इतके सर्व असताना लग्नाचा सर्व खर्च ही आम्हीच करावा.....??? का ...?? केवळ मुलीची बाजू म्हणून ..?? रीतिरिवाज आहेत म्हणून ...."? इथे बसलेले आमचे नातेवाईक किती आणि।कसली मदत करणार आहेत आम्हाला ...."??सर्व शांत बसले .
मुलगा हसला "तुझ्याकडे काय उपाय आहे यावर "??
" मी तुला एक वर्ष देते ..एका वर्षात तू माझ्यापेक्षा जास्त कमावून दाखव नाहीतर तुम्ही म्हणाल तसे आम्ही सर्व खर्च करू पण मग फक्त तू तुझ्या घरच्यांना सोडून आमच्याबरोबर नवीन घरात राहायला ये ...."
तिचा निर्णय ऐकून सगळीकडे कुजबुज सुरू झाली . मुलाचे वडील संतापले "हे काय चालू आहे ..?? पूर्वापार चालत आलेले रितिरिवाजच आम्ही पाळतोय ना ..?? काय चुकीचे मागतोय...??
"मी ही काय चुकीचे बोलतेय. पूर्वी मुलगी कमवत नव्हती .तिच्याकडे शिक्षण नव्हते .प्रत्येकाकडे शेती होती ..सोने स्वस्त होते. संसार करायला टीव्ही फ्रीज लागत नव्हते .आता सोने कशाला हवे .मी गेली कित्येक वर्षे गळ्यात एक चेन घालतेय. पंचवीस तोळे सोने घेऊन काय करू मी ..??कशाला हवे इतके सोने .आम्हा दोघांचा संसार आहे मग आम्हाला लागेल त्या वस्तू आम्ही आमच्या मनाने घेऊ . तुम्ही दिलेल्या वस्तू का गळ्यात मारून घेऊ आमच्या . आणि इतके करूनही मी माझ्या आईवडिलांना सोडून तुमच्याकडे का यायचे ..?? म्हणून म्हणते माझ्यापेक्षा वरचढ हो आणि तुमच्या रितिरिवाजप्रमाणे लग्न करा .माझ्या आईवडिलांचा कष्टाचा पैसा असा एका लग्नात घालविणार नाही मी आणि माझ्यामागे लहान बहीण ही आहे हे विसरू शकत नाही मी ..."
तिच्या या निर्णयामुळे घरात शांतता पसरली . मुलगा शांतपणे उभा राहिला "तुझी सूचना नक्कीच विचार करण्यायोग्य आहे .आम्ही विचार करून लवकरच निर्णय घेऊ "असे बोलून सर्व बाहेर पडले.
आईवडिलांनी दोन्ही मुलींना जवळ घेऊन म्हणाले "मुलगा नाही याचे कधीच दुःख नव्हते मला.. पण आज अश्या मुली आहेत याचा अभिमान वाटतो.
© श्री.किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment