Monday, February 18, 2019

अशीही श्रद्धांजली

अशीही श्रद्धांजली
आज त्या स्मशानातील वडावर मोठी गडबड दिसत होती.आजूबाजूच्या झाडावर बरेच कावळे बसून होते . काही कावळ्यांनी वडाच्या ढोलीत मेलेले उंदीर,बाजारातील मासे ,पिंडावरील भात आणून ठेवला होता .एकंदरीत वडाच्या झाडावर काहीतरी गडबड होणार हे नक्की.अर्थात सर्वसामान्य माणसांना याचा काही पत्ता नव्हता.ती बिचारी स्वतःच्या दुःखातच मग्न होती. पण आज सगळ्याच पिंडांना कावळे पटापट कसे शिवतात याची नेहमीच येणार्यांना उत्सुकता वाटत होती.
इतक्यात आकाशात काहीतरी गडबड उडाली . आजूबाजूचे सगळे कावळे सावध झाले .काव.....काव.. करीत त्यांनी इतरांना इशारा दिला आणि अखिल भारतीय कावळे संघटनेचे अध्यक्ष श्री. का. ळा. काक यांचे आगमन झाले.त्यांच्यामागून देशाच्या विविध राज्यातील कावळे संघटनेचे प्रतिनिधी येऊ लागले . श्री.काक केवळ अखिल भारतीय कावळे संघटनेचे अध्यक्ष नव्हतेच तर महाराष्ट्रातील कावळा संघटनेचे ही अध्यक्ष होते .  पूर्ण देशातील प्रतिनिधी एकत्र म्हणजे विशेष काही घडले आहे हे नक्की याची खात्री आजूबाजूच्या कावळ्यांना झाली .मीटिंग ला ताबडतोब सुरवात झाली.
"मित्रानो .....तुम्हाला माहीतच असेल की आपल्या देशातील काही जवानांवर नुकताच एक भ्याड हल्ला  झालाय . बेसावध क्षणी झालेल्या त्या हल्ल्यात आपले  42 जवान मारले गेले.आता तुम्ही म्हणाल आपला काय संबंध .....?? ते मानव आहेत .त्यांचे ते बघतील . पण त्या मानवांमुळे आपणही जगतोय . ते आपल्याला खायला देतात . आपल्याला दशक्रिया विधीला मोठा मान देतात.मुख्य म्हणजे ते आपल्याला कधीही मारत नाहीत. आपली शिकार करीत नाहीत. तर ...आपण त्या शाहिद जवानांसाठी काहीतरी केले पाहिजे ".
सर्व प्रतिनिधी अवाक झाले.ह्यासाठी आम्हाला लांबून बोलावले ....?? "तुमच्यामते काय केले पाहिजे ..."??एक प्रतिनिधी म्हणाला.
"मुळात आपले काम काय आहे ...??? श्री काक यांनी प्रश्न विचारला .
"मृत व्यक्तींच्या पिंडांना आपण चोच मारतो तेव्हा त्यांच्या आत्मास शांती मिळाली ..मुक्ती मिळाली.. असे समजले जाते .."?? दुसरा प्रतिनिधी उत्तरला.
" आणि नाही चोच मारली तर ....."?? परत काक यांनी प्रश्न केला .
"तर त्यांचे नातेवाईक पिंडासमोर त्यांच्या अपूर्ण इच्छा पूर्ण करू अशी वचने देतात ......??? आपल्याला अर्थात मृत व्यक्तींचे ऐकून चोच मारावी लागते...".त्या प्रतिनिधीने उत्तर दिले .
"ठीक आहे ...मग यापुढे त्या 42 जणांच्या पिंडाला आपण स्पर्श करायचा नाही.असेही त्यांचे आत्मे अतृप्तच आहेत. या अश्या मृत्यूने त्यांचे आत्मे कधीच मुक्त होणार नाही त्यांना बदला घ्यायचाय आणि जोपर्यंत त्याच्या दिवसाला आलेले पिंडासमोर हात जोडून बदला घेऊ असे म्हणत नाहीत तोपर्यंत आपण पिंडाला चोच मारायची नाही.."श्री . काक यांनी संतापाने काव काव करीत आपले म्हणणे स्पष्ट केले .
"पण त्याने काय होईल ....."?? एका प्रतिनिधीने शंका काढली .
"त्याने किती फरक पडेल ते माहीत नाही ... पण भारतात सोशल मीडियाचे प्रमाण जास्त आहे . जे दिसेल त्याची विडिओ शूटिंग काढून ते प्रसारित करण्याची वाईट खोड आहे . माणूस काय करतोय याच्याशी आपल्याला मतलब नाही. पण या देशात आपण राहतो . ही माणसे आपला तिरस्कार करतात ..किळसवाण्या नजरेने पाहतात .पण योग्य ठिकाणी आपल्याला मान ही देतात .आपण कोणाच्या खिडकीत गेलो की काहीतरी आपल्या पुढ्यात टाकतात.दशक्रियेच्या दिवशी आपल्यापुढे हात जोडतात .आज त्याचाच फायदा घेऊन आपण अशी श्रद्धांजली त्या शाहिद जवानांना द्यायची आहे . बोला आहे मंजूर ....?? श्री . काक यांनी खणखणीत आवाजात विचारले .सर्वांनी काव काव करून पाठिंबा दर्शविला.हा ठराव आपल्या राज्यातील कावळ्यांना सांगण्यासाठी सर्वांनी आकाशात झेप घेतली आणि परतीच्या वाटेला निघाले .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment