Friday, February 15, 2019

एक पत्र

प्रिय पत्नी
प्रेमदिनाच्या खूप खूप शुभेच्छा....!! खरे तर माझ्यासारख्या नीरस नवऱ्याकडून शुभेच्छा ते ही अश्या पत्ररूपात पाहताना तुला धक्का बसला असेल. लग्न ठरले तेव्हा इम्प्रेशन मारण्यासाठी व्हॅलेंटाईन डेला मिळालेले गिफ्ट पाहून तुला आनंदच झाला असेल . पण तो आनंद नंतर काही मिळाला नाही.  इंजिनियर नवरा मिळाला याचा आनंद लग्नानंतर काही दिवसच टिकला जेव्हा पहिल्या सणाला मी इतरांसारखा घरी न राहता कामावर गेलो आणि त्यानंतर अजूनपर्यंत तेच चालू आहे.
कष्ट करून जगण्याची सवय तुला पूर्वीपासून होतीच . शिक्षण अर्धवट सोडून तू घरची जबाबदारी उचललीस स्वतःच्या स्वप्नांना तिलांजली दिलीस .लग्नानंतर परिस्थिती बदलेल अशी तुला आशा होती . पण फारसा काही  फरक पडला नाही .इथेही अडजेस्टमेंट कराव्या लागल्याच.
एक समजून घेणारा नवरा इतकीच माझी ओळख. कुठे जाणे नाही ..फिरणे नाही.. काम आणि घर हेच आयुष्य राहिले .तुझ्या आवडीनिवडी तू बाजूला सारल्यास. माझे वेळीअवेळी घरी येणे .. माझी व्यसने ..माझा मूड सर्व काही ऍडजस्ट केलेस. मला माझ्या कामात मदत करणारी सहकारी हवी होती तर तुला समजावून घेऊन हळुवारपणे प्रेम करणारा नवरा . एके दिवशी संतापून मशीनसोबत काम करता करता तुही मशीन झालायस असे बोलून गेलीस. पण त्यानंतर पुन्हा त्याविषयावर  शब्द ही बोललीस नाही. माझा स्वतःचा विचार करणे ..तुला न  विचारता निर्णय घेणे ... तुला गृहीत धरणे हे ही तू स्वीकारलेस.
तुझ्या खूपच कमीच  अपेक्षा होत्या माझ्याबद्दल .एक ड्रेस आणून दे असे म्हणालीस आणि मी मुकाटपणे डेबिट कार्ड काढून तुझ्या हाती दिले आणि सांगितले तुझ्या आवडीचा घेऊन ये . तुझा हिरमुसलेल्या चेहऱ्याकडेही कधी लक्ष दिले नाही . पाणीपुरी खायची आहे असे सांगितलेस आणि मी रागाने शी रस्त्यावरचे काय खातेस ,असे बोलून हॉटेलात घेऊन गेलो. पण त्या एका बशीत एकप्लेट पाणीपुरी खायची काय गंमत असते आणि त्यातून तुला किती आनंद मिळतो याचा विचारच मी कधी केला नाही .
दर वर्षी व्हॅलेंटाईन डे ला काय गिफ्ट द्यायचे याचा विचार करता करता तो दिवस पार पडायचा पण तुला गिफ्ट काही मिळाले नाहीच . तिला कधी काही घ्यायला मी नाही म्हटले नाही.... असे बोलून माझी बाजू सेफ करायचो .दोघांनी मिळून चित्रपट कधी पहिला हे ही आठवावे लागते . रात्री फिरायला जायचे का ...?? असे विचारल्यावर हो म्हणायचे इतकेच माझे काम. पण तुझे आटपून येईपर्यंत माझी मध्यरात्र झालेली असते .पण खरे सांगतो मी मशीन नाही ग ... सर्व काही दिसते मला .. तुझे कष्ट ,इतरांना समजून घेण्याची धडपड ....त्याचबरोबर स्वतःच्या माहेरी लक्ष देणे... त्यांचे प्रॉब्लेम समजून ते सोडविणे हे सर्व पाहतोय मी. मी रुक्ष असलो तरी तूझा रसिकपणा अजूनही टिकवून आहेस .
खूप काही बोलायचे असते.पण ते जमत नाही म्हणून हा पत्रप्रपंच. कागदावरची अक्षरे अश्रूने पुसली जातात पण मोबाईलचे तसे होत नाही म्हणून मोबाईल वर पत्र लिहितोय . हे ही तू समजून घेशीलच.
हॅपी व्हॅलेंटाईन डे
तुझा नवरा

No comments:

Post a Comment