Thursday, February 28, 2019

बदलती मुंबई

बदलती मुंबई
दत्तूनाना शिरगावकर कायमचे गावी चालले पण त्यांच्याबरोबर रमाकांत ही जातोय हे ऐकून आम्हाला जास्त धक्का बसला.
रमाकांत... दत्तूनानांचा एकुलता एक मुलगा.इथेही चांगला सर्विसला आहे . पण सर्वच शिरगावकर कुटुंब  कायमचे कोकणात निघून जातायत हा धक्का  आम्हाला काही पचनी पडला नाही.
संध्याकाळी मी आणि विक्रम त्यांच्या घरी गेलो .रम्या खरेदीसाठी बाहेर गेलेला.घरात फक्त दत्तूनानाच होते . "मला वाटलेच ...तुम्ही येणार आज .विकी घरात कोणीच नाही  तेव्हा तूच आत जाऊन चहा कर आपल्यासाठी" नाना हसत हसत म्हणाले.माझ्याकडे चिडून पाहत विक्रम आत गेला.
"नाना ...अचानक गावी स्थायिक होण्याचा निर्णय ....?? मी विचारले .
"इथे काय राहिलय .."?? नानांचा उलट प्रश्न.
"याच मुंबईने तुम्हाला खूप काही दिलय नाना.." विक्रम रिकामा कप हातात घेऊन बाहेर येत म्हणाला.
"मान्य.. पण तेव्हा मुंबईला आमची गरज होती. मी इथे आलो तेव्हा सगळीकडे मोकळे वातावरण होते . सर्वाना कामे मिळायची .महागाई नव्हती. खाण्याचे वेगवेगळे प्रकार नव्हते त्यामुळे चॉईस नव्हता .लोकल रिकाम्या धावायच्या .."नाना हसत म्हणाले.
" म्हणजे आता खाणे परवडत नाही म्हणून चाललात...??? विक्रम हसत म्हणाला. वातावरणातील ताण निवळला . आम्ही सर्व हसलो.
"अरे ....मी मुंबईत आलो तेव्हा हातात एक पिशवी आणि खिश्यात पाच रुपये होते. गिरणगावात आमचे गाववाले राहत होते .त्यांच्यात राहून मी गिरणीत कामाला राहिलो  आणि तेव्हाचे आयुष्य सुखी होते .संध्याकाळी चौकात एकत्र जमायचे . मग कोणी नकला करायचे तर कोणी पोवाडा गायचे . तर काही जण गुत्त्यात बसायचे .हो ...पण कोणाला आग्रह नाही हा दारू प्यायचा. मालवणी मसाल्याच्या वासानेच वातावरण धुंद व्हायचे . इथे कधीही कोणाकडे गेले की घोटभर चहा प्यायल्याशिवाय घरातून बाहेर पाठवीत नसत.मी गिरणीत माझ्या मेहनतीने जॉबर झालो. पण आमच्या गावावल्यानी कधी जाबर केला ते कळलेच नाही". दत्तूनानं हसत हसत जुन्या आठवणीत रमून गेले.
"मग नाना ....आताच का मुंबई न आवडेनाशी झाली ...?? विक्रम गरम चहाचा पेला त्यांच्या हाती देत हळूच म्हणाला .हातातील चहाकडे पाहत पुन्हा दत्तूनान आठवणीत रमले .
"अरे चालू झाला तो भयानक गिरणी संप .. एक आयुष्यभसर न विसरता येणारी काळी आठवण . होत्याच नव्हतं झालं रे .. चूक कोणाची ते माहीत नाही . पण आम्ही भिकेला लागलो .रम्याची आई हिकमती म्हणून कंबर कसून कामाला लागली . मिळेल ती कामे केली . रमाकांतला शिकवले . कधी पापड लाटले तर कधी कोणाच्या घरी लग्नकार्याची खरकटी भांडी घासली . भाऊ ..विचार तुझ्या बायकोला काय हाल काढले तिने आणि तिच्या आईने ... ..?? तरीही सर्व एकत्र राहिलो हो ... एक चपाती ही सर्वांनी मिळून खाल्ली . नंतर नुकसान भरपाई काही मिळालीच नाही . आमचे नशीब थोर म्हणून मुलगा पदवीधर झाला . चांगल्या ठिकाणी नोकरीला लागला . बाकीची पोर गेली गँगवॉर मध्ये . तर कोणी दुकानात सेल्समन .तर कोणी वडापाव विकत .आमची उरलेली आयुष्य पोरांची दुःख बघतच जाणार असे वाटू लागले .."
"असे कसे नाना...??  रम्या आता व्यवस्थित कामाला जातोय .बायको ही चांगली भेटलीय त्याला.मुले ही छान आहेत मुख्य म्हणजे तुमचे संस्कार आहेत त्यांच्यावर "मी म्हणालो.
"हो रे ....ते सर्व कबूल. पण हल्ली ह्या मुंबईत गर्दी किती वाढलीय .आमच्या गिरण्या गेल्या तिथे मॉल आले  सोन्यापेक्षाही जास्त भाव जमिनीला आला . कॉर्पोरेट पार्क आले.  फॅक्टऱ्या बाहेरच्या राज्यात गेल्या . जे कमी शिकलेत त्यांनी हमाली नाहीतर कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करा .. सरकारी नोकरीसाठी वशिलेबाजी सुरू झाली ..मुलांची शाळेची फी किती महाग झाली आणि हो ...ते नवीन काय इंटरनॅशनल स्कूल चालू झालेत . मराठी अनुदानित शाळेत मुलांना पाठविणे कमीपणाचे वाटते हल्लीच्या पालकांना . महानगर पालिकेच्या शाळा तर बंद पडायच्या मार्गावर.अरे ....तुम्ही तर सर्व एकाच शाळेत तेही मराठी माध्यमात शिकलात ना ...?? मग तुम्हाला काही  प्रॉब्लेम नाही आला तो कधी ..नानांनी प्रश्न केला .
"कारण आम्ही आमच्या पालकांची परिस्थिती पाहिलीय. त्यांच्याबरोबर आम्हीही भोगलय म्हणून आम्ही आमच्या कर्तबगारीवर उभे राहिलो .. "मी अभिमानाने म्हणालो.
"हो ...पण ती परिस्थिती तुमच्या मुलांना नाही जाणवू दिली तुम्ही . कॉर्पोरेट पार्कमुळे मोठ मोठ्या लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या मिळू लागल्या . त्यामुळे बाहेरचे मुंबईत येऊ लागले . त्यांच्याकडे शिक्षण होते . पैसा होता त्यामुळे मुंबईतील जागेचे भाव वाढले  मूळ मुंबईकर चढ्या भावाला जागा विकून बाहेरगावी जाऊ लागला . इथे एकटेच राहायला मिळतेय म्हणून तरुण तरुणी त्या स्वातंत्र्याचा उपभोग घेऊ लागले . नको त्या वयात भरमसाठ पगार आणि घरची जबाबदारी नाही ..मग व्यसन आली . आपल्या नाक्यावर बघ कित्येक तरुण तरुणी सिगारेट पीत असतात . काही ठिकाणी तर बार ही मुलीने फुल असतात . रात्रभर पबमध्ये गोंधळ घालायचा  पहाटे नशेत घरी यायचे हेच चालू आहे .गर्दीमुळे ट्राफिक वाढतोय.... दहा मिनिटाच्या प्रवासाला एक तास लागतोय .हवेमध्ये कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण वाढतेय . त्यामुळे ऋतू बदलतायत .प्रदूषण इतके वाढलेय की 90% लोकांना सर्दी खोकल्याचा त्रास आहे . त्यामुळे औषधांच्या किमती वाढल्या. सरकारी हॉस्पिटलमध्ये प्रचंड गर्दी तर खाजगी हॉस्पिटल भरमसाठ फी घेतात. अरे ...!! ह्या मुंबईत प्रदूषणविरहित कोणतीही वस्तू मिळत नाही . मिळते ते विकत घ्यावे लागतेय . पाणी पाहिजे तर फिल्टर घ्या .हवा पाहिजे तर एअर कंडिशन घ्या. गावी असलेला माझा सासरा नव्वद वर्षाचा आहे. तो अजूनही शेतात जातो ..चष्म्या लावीत नाही . कसला आजार नाही आणि मी बघ..?? मधुमेह ..गुढगेदुखी.. असे अनेक आजार घेऊन बसलोय .तेव्हा पुरे झाले हे ...आता गावी जातो . शेती आहे ..कलम आहेत ,वर्षाचे पाच सहा लाख उत्पन्न येईल . तब्बेत चांगली राहील .. पोरही खुश रहातील .."नाना पोटतिडकीने बोलत होते .
"तुमचा मुद्दाही विचार करण्यासारखा आहे नाना.. पण मुंबईतील मूळ माणसेच अशी जाऊ लागली तर मुंबईचे काय होईल ....??विक्रम ने विचारले .
"काही होणार नाही मुला... परिस्थितीनुसार मुंबई बदलली पण तुम्ही ते स्वीकारत नाही. त्यानुसार उपाययोजना करीत नाही .तुम्ही त्यातून मार्ग काढण्यापेक्षा अजून  तिच्यावर बोजा टाकताय..मुबई बदलली आहे तुम्ही ही बदला...."असे म्हणून त्यांनी आम्हाला हात जोडून नमस्कार केला.
मी आणि विक्रमने एकमेकांकडे हताश नजरेने पाहिले आणि बाहेर पडलो .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment