Monday, February 25, 2019

पहिला वाढदिवस

पहिला वाढदिवस
आज त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता . ते दोघेच साजरा करणार आहेत . पण आपणही त्यांच्यात सामील होऊ .
ती...काय रे ह्याच हॉटेलमध्ये बोलावतेस पार्टीला ..?? दुसरे नव्हते का ..??
तो.. अग पण तुला हेच हॉटेल आवडते ना ..?? लग्नाआधी कितीवेळा बोललीस तू माझे आवडते हॉटेल ..
ती ..हो कारण तुझ्या आवडीचे ड्रिंक इथे मिळत होते आणि तुला नाराज करायचे नव्हते मला. मला तर कधीच आवडले नाही  हे हॉटेल  आणि हे काय त्या दिवशी मी दिलेला शर्ट का नाही घातलास तू ...?
तो.. कोणता तो रेड ..?? ह्या काय तो कलर .. मला फार आवडत नाही तो ...? शिवाय फिट ही फार होतो
ती.. पण लग्नाआधी तर तुला रेड कलर आवडत होता..आणि साईझ ही तीच आणलीय.
तो.. हो ग ते तुला नाराज करायचे नव्हते म्हणून मी घालायचो .
ती..बरे राहू दे आता . पुढच्यावेळी लक्षात ठेवेन . आणि प्लिज ती सिगारेट ओढू नकोस  इथे .
तो .. अरे ... आपण दोघेही लग्नाआधी सिगारेट ओढायचो की. आज बघ तुझा ब्रँड आणलाय आणि तोच पिणार मी . खरे तर तुझा हा बायकी ब्रँड मला कधीच पटला नाही . तुझ्यामुळे पीत होतो .
ती.. मीही तुला कंपनी द्यायलाच पीत होती . तेव्हा मजा म्हणून तुला कंपनी दिली . आता तर वास ही सहन होत नाही .
तो.. ठीक आहे मी माझा ब्रँड पीतो.
ती.. काही गरज नाही तुला प्यायची . मला अजिबात आवडणार नाही .
तो...ह्या.... आणि हा कुठला केक घेऊन आलीस  ..??
ती.. अरे आपण पहिल्यांदा भेटलो तेव्हा तूच म्हणाला होतास मला आवडतो हा केक म्हणून तोच ऑर्डर केला .
तो.. कारण माझ्या खिशाला तेव्हा तोच परवडत होता आणि तुही मलाही आवडतो म्हणालीस . त्यानंतर कधी खाताना पाहिलेस का मला हा केक ...?
ती.. मग आता काय फेकून देऊ का ...??
तो... राहूदे आता .तू काय पिणार ..??
ती.. बियरच घे ..
तो ..अरे तुला टकीला आवडते ना ...? लग्नाआधी किती पियाचो आपण .
ती.. हो कारण पार्ट्या चालू असायच्या आणि आपल्यात न पिणारा बावळट ठरतो म्हणून पीत होते मी .टकीला बरी पडते . एका घोटात संपते .आणि अर्ध्या तासात थोडी उतरते . मग पुन्हा एक शॉट.. पण तुझे काही कमी झाले नाही . वाटले जबाबदारी आली की तू सुधारशील . तुझे पिणे आहे तेव्हडेच आहे .
तो... विषयच काढला आहेस म्हणून बोलतो . बऱ्याच गोष्टी बदलल्या आपल्यात . खरेतर आपला प्रेमविवाह. आपण कोणतीही गोष्ट एकमेकांपासून लपवून ठेवली नाही . तेव्हा एकमेकांना कधीच आपण विरोध केला नाही . पण हल्ली प्रत्येक गोष्टीला विरोध .
ती .. हो खरे आहे .. आता बघ ना तू ऑर्डर केलेली डिश मला आवडत नाही पण लग्नाआधी बऱ्याच वेळा आपण ती डिश खाल्ली आहे .
तो .. तुला आईस्क्रीम खाल्ले की सर्दी होते पण माझ्याबरोबर खाण्यास कधी नकार दिला नाहीस . दुसऱ्या दिवशी सर्दीने नाक लाल व्हायचे तुझे .
ती .. हल्ली आपले शारीरिक संबंध ही कमी झालेत .. असे का... ?? लग्नाआधी ही आपल्यात संबंध होते .
तो ... खरे तर तुझी आक्रमक वृत्ती मला झेपत नाही . तुला पाहिजे तेच तू करायला सांगतेस . आणि तुला हवे तेव्हा तू येतेस .माझा विचारच करीत नाहीस
ती.. मग लग्नाआधी तू कधी माझा विचार केलास . रूम रिकामी मिळाली की बोलावं आणि हवे तसे ओरबाडून काढायचास ..तेव्हा मी तुला विरोध केला नाही . आणि हो हल्ली माझ्या घरच्यांशीही तू तुसडेपणाने वागतोस . लग्नाआधी भारीतली मिठाई घेऊन यायचास आता रिकाम्या हाताने येतोस कधी आणलेस तर पाव किलो वेफर्स .
तो.. तू ही लग्नाआधी घरी यायचीस तेव्हा माझी आई माझी आई करीत गोंडा घालयाचीस आता बेसिन मधले कप ही बराच वेळ तिथे पडून असतात . दहावेळा हात धुतेस पण कप धुत नाहीस.
ती.. म्हणजे हल्लीएकमेकांच्या  बऱ्याच गोष्टी आपल्याला आवडत नाहीत तर ...
तो.. हो कदाचित ...
ती....माझ्या सहकारी पुरुषांशी जास्त बोललेले ही हल्ली तुला आवडत नाही .. लग्नाआधी आपण सर्व एकत्रच पार्टी करायचो . त्यातील काहींना हाताशी धरूनच मला प्रपोज केले होतेस तू ..
तो.. थोडेसे आवडत नाही हे खरे आहे पण माझ्याही शाळेतील जुन्या मैत्रिणीशी बोललेले तुला कुठे आवडते . बऱ्याचवेळा आपण त्यांच्या घरीही गेलो होतो . माझ्या एका मैत्रिणीचा पुनर्विवाह ही तूच पुढाकार घेऊन केलास .
ती... म्हणजे थोडक्यात आपण एकमेकांवर हक्क गाजवू लागलो तर .....??
तो.. हो आपल्यातील पोसिटीव्ह गोष्टी बाजूला ठेवून आपण निगेटिव्ह गोष्टीचाच विचार करतोय तर ..??
ती.. लग्नाआधी तू पहिला माझा मित्र होतास तेव्हा तू जे काही करायचास त्याने मला काही फरक पडत नव्हता . नंतर प्रियकर झालास तेव्हा तू नेहमी खुश रहावास असे मला वाटू लागले तेव्हा तुझ्या सर्व गोष्टी स्वीकारल्या मी . तुझे सुख तुझा आनंद हा माझा मला वाटू लागला . मग नवरा झालास ..
तो.. हो मग आपण एकमेकांना गृहीत धरू लागलो. एकमेकांना मालकी हक्काचे वाटू लागलो. अरे आता ही कुठे जाणार आहे मला सोडून असा भ्रम झाला . मग न आवडलेल्या गोष्टीत नकार देऊ लागलो. आपण जेव्हा लग्न केले तेव्हाच आपण एकमेकांना गृहीत धरले .आपल्या आवडी निवडी ,सवयी पुन्हा मूळ जागी म्हणजेच आपल्यात परत आल्या .
ती.. खरे आहे ...मग यावर उपाय काय ...
तो ... वेगळे व्हायचे का ...?? आणि परत मित्र बनूया
ती.. की आपल्या सवयी आवड स्वप्ने ऍडजस्ट करत एकत्र राहूयात ...?? पैश्याचा तर प्रॉब्लेम नाही ..
तो .. पण कितीही झाले तरी आपली कोणतरी काळजी घेतेय.,घरी वाट पाहतेय ही भावना सुखद असते .  तिच्या डोळ्यातील काळजी आणि प्रेम पाहून सर्व टेन्शन विसरून जायला होते .
ती .. खरे आहे रे . ... अंगात ताप असला की तू उठू नकोस झोपून राहा माझे मी आटपतो असे म्हणत स्वतःची तयारी करणारा आणि नंतर  गरम चहा स्वतःच्या हाताने पाजणारा नवरा असला की वाटते यासारखे सुख नाही . बाहेर पडल्यावर कधी फोन न करणारा यावेळी मात्र दर दोन तासांनी फोन करतो .
तो ...मग काय विचार आहे...  टकीला की बियर ..
ती ... तू हा केक खाणार असशील तर मी टकीला शॉट मारेन...
तो ..ओके डन ...वेटर दोन टकीला शॉट प्लिज .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment