Thursday, February 7, 2019

व्हॅलेंटाईन डे

व्हॅलेंटाईन डे
"तुला व्हॅलेंटाईन डेला काय गिफ्ट हवे ...."?? त्याने तिला व्हाट्स अप केला.ती समोरच स्वयंपाकघरात उभी राहून चपात्या भाजत होती.आज यायला थोडा उशीर झालेला म्हणून अंगावरची साडी न बदलतात तिने चपात्या भाजायला घेतल्या.आता कपडे बदलण्यात वेळ गेला तर पुढचे सारेच गणित चुकणार याची खात्री होती तिला .पदर खोचून एका हाताने चहाचे घुटके घेत मध्येच गरम चपातीचा तुकडा तोंडात टाकत ती चपात्या भाजत होती.मोबाईल तिच्या नेहमी बाजूलाच असायचा.हो .....कोणाचा फोन ..मेसेज आला तर शोधायची धावाधाव नको. मेसेज येताच तिने पटकन उचलून मेसेज वाचला आणि डोळे आश्चर्याने मोठे केले.तशीच नजर वळवून त्याच्याकडे पाहिले आणि भुवया उडवून काय ...??अशी खूण केली.
"हे काय आता नवीन ...."?? तिचा रिप्लाय
"बोल ग ....काहीतरी असेलच तुझ्या मनात .. ?त्याचा मेसेज .
"यावेळी शेंगदाण्याची एक पुडी घेण्याऐवजी दोन घ्या म्हणजे माझ्या वाट्याला पुरेसे येतील" तिने रिप्लाय दिला आणि स्मायली टाकले .
त्याने रागाची स्मायली दिली तसे तिने बदामाची आणि लाल ओठांची . तसा तो खुलला.
"यावर्षी काहीतरी वेगळे देतो तुला ... त्याने रिप्लाय दिला आणि तिच्याशी नजरानजर होताच त्याने पटकन डोळा मारला . तिने कावरीबावरी होत आजूबाजूला पाहिले आणि जीभ बाहेर काढून वेडावून दाखविले .
"तुम्ही यावेळी विचारलेत तेच खूप आहे माझ्यासाठी आणि तुम्ही समोर असणेच माझ्यासाठी व्हॅलेंटाईन दिवस असतो...." तिने भराभर टाईप करून रिप्लाय दिला .
"अग बाई एका वेळी एक काम कर .. ..ती चपाती करपेल ना .. मोबाईलवर काय करतेस ..?? सासूबाई लांबूनच ओरडल्या तसे तिने त्याच्याकडे डोळे वटारून पाहत मोबाईल खाली ठेवला आणि ओठांचा चंबू करून छानसे हसली .
© श्री. किरण कृष्णा बोरकर
( पुढे काय ते सुचत नाही .सुचेल तेव्हा लिहिनच )

No comments:

Post a Comment