Friday, February 22, 2019

मुमताज

मुमताज
" अरे मुमताज .....!! यहा किधर..... ?? कितने सालों बाद आज दिखाई दी तुम......?
"माफ कीजिये.... मैं मुमताज नही हु.माझे नाव अनघा आहे.आपण मुमताज का म्हणालात.....???
"ओ हो ....!! सॉरी..मला वाटले तुम्ही मुमताज आहात.
" पण का असे वाटल....?? सांगा तर.... मी रागावणार नाही "
"खरे म्हणजे साधारण वीस वर्षांपूर्वी पनवेलच्या नाईट क्वीन बारमध्ये एक डान्सर होती ती तुमच्यासारखी दिसायची.मला वाटले त्या तुम्हीच ..माफ करा मला "
"हरकत नाही....खरे तर तीच आहे मी .पण खूप वर्षे झाली.हे नाव आता विसरते मी.. पण तुम्ही कोण...?? आता तेव्हडे आठवत नाही.... !"
"बरोबर आहे, खूप जणांशी रोज तुमचा संबंध... पण फाटक्या नोटा फेकल्या तरी तुम्ही मला किस द्यायचा ..आठवले का आता ???
"अरे हो....आता आठवले. हा..! हा..! हा.. !तूच तो.. फटी नोटवाला.... आम्ही तुला नाव ठेवले होते. े"निर्लज्ज कुठला....""
"आता काय चालू आहे ...."???
"काही नाही..अचानक डान्स बार बंदी झाली. आम्हाला तर तेव्हढेच येत होते.एका रात्रीच रस्त्यावर आलो.पैसा कमावला होता भरपूर.... पण साठवायची आणि गुंतवायची अक्कल नव्हती. ऐशआरामाची चटक लागलेली..आठवड्यात कंगाल झालो.... ".
"मग त्या नंतर काय केलेस....."??
"अरे त्या वेटर अनिल बरोबर लग्न केले मी.दुसरा कोण स्वीकारणार आम्हाला...?? जो तो रात्रीपुरता मागायचा .पण मी तेव्हा कधीच कोणाबरोबर गेले नाही.संसार करावा..मुलेबाळे असावीत इतकेच स्वप्न होते माझे ...पण या बंदीमुळे जमिनीवर आपटले मी. नशीब डोक्यावर छप्पर होते .सगळे माहित असणारा समजून घेणारा  नवरा आहे ..एक मुलगी आहे.."
"अरे वा ....! छान.... !"
"मग काय....!!  पुढे पैसे मिळवण्यासाठी कष्ट करायला सुरवात केली .मिळेल ते काम केले .हळू हळू सावरले, पैशाचे महत्त्व कळले. तेव्हा नको त्या वयात नको इतका पैसा कमावला पण अक्कल नव्हती.तुझ्या महिन्याच्या पगराइतके पैसे एका रात्री कमवायचे मी....असो तू काय करतोस आता... ???
"मी....? ओके ...नोकरी करतोय ...संसार आहे ..बाकी सगळे बंद"
"छान....!!  माझी मुलगी आता आर्किटेकच्या लास्ट वर्षात आहे .कदाचित पुढे अच्छे दिन आयेंगे..खूप भोगले मी आयुष्यात .लोकांची पैसे कमांवण्याची धडपड पहिली .खूप घृणा येते मला माझी .त्याच्या कष्टाचे पैसे ते आमच्यावर उडवायचे .आज खूप बरे वाटते , गरिबीत का होईना माझ्या मुलीला कष्टाच्या पैशाने वाढवतेय...पण एक सांग... तू नेहमी फाटक्या नोटा कुठून आणायचास..."?? मालक खूप चिडायचा आमच्यावर कोणी आणल्या ह्या नोटा म्हणून.. "??
"मग तू कधी बोलली नाहीस त्याला... ??माझे नाव सांगितले नाहीस....??
"नाही सांगितले...??? माहित नाही का ...?? कुठेतरी तरी मनाने खूप मोकळा आणि चांगला वाटलास.तुझे तिथे येणेही इतरांसारखे नव्हते .खूप व्यवहारी  वाटलास तू,...गुंतत नव्हतास तू कशात ..नाही दारू ..नाही समोरची बाई...," आताही तुझ्याशी बोलताना मोकळेपणा वाटतो . मनापासून ऐकून घेतोस तू माझी गोष्ट.."
"अरे ....? थँक्स...., असे काही नाही.त्यावेळी तरुणपणाचा जोश होता . पण खिश्यात पैसे नसायचे. म्हणून कंट्रोल करत जास्त मज्जा कुठे मिळेल ते पाहायचो .मित्रांचे किराणा मालाचे दुकान होते. तो फाटक्या नोटा ही स्वीकारायचा . म्हणायचा जाऊ दे रे गरीब माणसांकडून कुठे नोटा बदलून घेऊ. मग तुमच्या बारमध्ये त्याच नोटा घेऊन यायचो . तुही काही न बोलता त्या नोटा घ्यायचीस तेव्हा आश्चर्य वाटायचे .थोडे  फील झाले आणि त्या  आठवणी  अजूनही आहे .म्हणून अचानक दिसलीस आणि राहवले नाही. ठीक आहे. भेटू पुन्हा कधी...".
"नाही सॉरी....!!  आपण पुन्हा कधीच भेटणार नाही, मागील भूतकाळातील वाईट पान पालटून मी खूप पुढे निघून आले आहे. माझ्या भूतकाळाची काळी छाया आता माझ्या मुलीच्या भविष्यावर नको , त्यामुळे आपली हि शेवटची भेट आहे. राग मानू नकोस. पण तू समजून घेऊ शकतोस. मी माझ्या भूतकाळाला ओळख देत  नाही आणि कोणाशीही या विषयावर बोलत नाही ..."
"अगं ठीक आहे... मी नक्कीच समजू शकतो. राग धरण्याचा तर प्रश्नच नाही. कारण काही असो पण त्या नरकातून तुझी सुटका झाली आणि आज ताठ मानेनी तू जगत्येस हे बघून खरंच खूप बरं वाटलं."..... बाय .

(C) श्री. किरण  कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment