Thursday, October 31, 2024

गोलम

Golam
गोलम
व्ही टेक इंटरनॅशनल ही छोटी आय टी कंपनी. यात सगळे मिळून सोळा कर्मचारी आहेत. आयझॅक जॉन कंपनीचा एमडी आहे आणि तो व्ही लॅब या फार्मा कंपनीचा भागीदारही आहे. सगळ्या कर्मचाऱ्यांचे नेहमीचे रुटीन चालू असते. कंपनीतर्फे सर्वाना चहा बिस्कीट देण्यात येतात. एन्ट्री करायला बायोमेट्रिक पंचिंग मशीन आहे. 
नेहमीप्रमाणे कंपनीत रुटीन चालू आहे. पण आज  जॉन कॉफी पॅन्टवर सांडल्यामुळे  त्याच्या खाजगी टॉयलेटमध्ये गेला आणि  बराच वेळ बाहेर आला नाही.सगळ्यांनी त्याला हाका मारल्या पण उत्तर मिळाले नाही.वॉचमनकडून दुसरी चावी आणली गेली आणि दरवाजा उघडला तेव्हा आतमध्ये जॉन मरुन पडला होता.
सगळ्यांना वाटले की जॉन पाय घसरून पडला आणि त्याचे डोके फुटले . पण पोलीस अधिकारी संदीपला पक्की खात्री आहे की ही हत्या आहे.
त्याने सर्व स्टाफला बाहेर जाण्यास मनाई केली आणि प्रत्येकाची चौकशी सुरू केली. पण त्यातून वेगळेच सत्य बाहेर आले.
हे सत्य भयानक आणि डोके सुन्न करणारे आहे .इंस्पेक्टर संदीप ही हत्या आहे हे सिद्ध करेल का ??
हा चित्रपट आगाथा ख्रिस्तीच्या रहस्यकथेसारखा आहे.अतिशय शांतपणे कुठेही आरडाओरड न करता या प्रकरणाचा तपास चालू आहे. उगाच कोणाच्या अंगावर धावून जाणे नाही की घसा ताणून कोणावर ओरडणे नाही.फक्त चौकशी चालू आहे आणि त्यावरून तर्क मांडले जातायत .
याचा दुसरा भाग ही येणार हे चित्रपटाच्या शेवटी कळते.
ज्यांना मर्डर मिस्टरी पहायची आवड असेल त्यांनी नक्की हा चित्रपट पहा.
चित्रपट प्राईम व्हिडिओवर हिंदी भाषेत आहे.

Wednesday, October 30, 2024

दो पत्ती

Do Patti
दो पत्ती
विद्या ज्योतीची  उत्तराखंड राज्यात पोलीस ऑफिसर म्हणून बदली झाली.अतिशय प्रामाणिकपणे काम करणारी ,कायद्याने वागणारी असा तिचा लौकिक होता. ती वकीलही आहे. 
एके दिवशी तिला एक फोन येतो.एका तरुणीला नवऱ्याकडून मारहाण होत असते.ती तरुणी आपल्या मानलेल्या आईसोबत माजी सोबत राहतेय.तिचा नवरा प्रसिद्ध मंत्र्यांचा  मुलगा आहे.पॅराग्लायडिंग या साहसी खेळाचा त्याचा व्यवसाय आहे.त्याची पत्नी सौम्या शांत स्वभावाची थोडी बुजलेली ,डिप्रेशनमध्ये असणारी तर तिची जुळी बहीण  शैली अगदी तिच्या उलट बिनधास्त स्वभावाची आहे.
सौम्याचा पती द्रुवला खरेतर शैली आवडते पण वडिलांच्या आग्रहखातर तो सौम्याशी लग्न करतो.पण पुढे पुढे त्याला तिचा कंटाळा यायला लागतो आणि मारहाण सुरू होते.
माजी हे सर्व विद्या ज्योतीला सांगते आणि  विद्या त्यांच्यावर लक्ष ठेवून असते.
होळीच्या दिवशी सौम्याला द्रुव पॅराग्लायडिंगला नेतो पण वरती जाताच सौम्याचा सेफ्टी बेल्ट सुटतो आणि दोघेही सुसाट वेगात खाली येतात . नशिबाने दोघेही एका ब्रिजवर अडकतात. पण काहीजणांनी या घटनेची व्हीडिओ शूटिंग केलेली असते.खाली उतरताच सौम्या द्रुवने आपल्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला असे विद्याला सांगते .विद्याला तेच हवे असते .ती ताबडतोब त्याला अटक करते .इतकेच नव्हे तर कोर्टात सरकारी वकील बनून द्रुवला तेरा वर्षाची शिक्षाही ठोठावते.
पण हे इतक्या सहज सोपे आहे का ?? सर्व पुरावे सहज कसे मिळाले ? या केसला फारसा विरोध का झाला नाही ? जी पत्नी आपल्या पतीविरुद्ध बोलत नव्हती तिने अचानक आपला पवित्रा बदलला का ? विद्याला असे बरेच प्रश्न पडतात .पण त्याची उत्तरे तिला मिळतील का ??
काजोल इन्स्पेक्टर विद्या ज्योतिच्या भूमिकेत फिट बसली आहे.आपल्या भूमिकेचा आत्मविश्वास तिच्या वागण्यातून जाणवतो.कीर्ती सोमण स्वतः निर्माती असल्यामुळे  दोन टोकाच्या दुहेरी भूमिकेत आहे. तन्वी आझमी माजीच्या  गूढ भूमिकेत आहेत.तर  देखणा शाहीर शेख द्रुवच्या भूमिकेत आहे.
चित्रपट नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे.

Tuesday, October 29, 2024

सिटाडेल डायना

Citadel Diana
सिटाडेल डायना 
सिटाडेल ही खाजगी गुप्तचर एजन्सी.जीने संपूर्ण जगात शांतता असावी असे ध्येय ठेवले आहे.पण या जगात अजून मॅन्टिकोर नावाची  एक एजन्सी आहे जी जगाला युद्धाच्या खाईत लोटू इच्छिते.ही एजन्सी इटली फ्रांस आणि जर्मनी या तीन देशांची आहे.हे नवीन हत्यारे शोधतात ज्यामुळे जगात युद्ध घडेल आणि त्यानंतर जगावर संपूर्ण नियंत्रण ठेवता येईल.
डायना आपल्या बहिणीसोबत राहते.एके दिवशी घरी परतत असताना त्यांच्या आईवडिलांचा विमान अपघातात निधन होते.हा अपघात नसून जाणीवपूर्वक केलेला अतिरेकी हल्ला आहे याची डायनाला खात्री आहे आणि ती या प्रकरणाचा शोध घेत असते.त्याचवेळी सिटाडेलचा एक एजंट तिला भेटतो आणि सिटाडेल जॉईन करायची ऑफर देतो.ती पूर्ण तयार झाल्यावर तो डायनाला मॅन्टिकोर एजन्सीत शिरकाव करून देतो.आता सिटाडेलमध्ये डायनाचे कोणतेही रेकॉर्ड नाही .
मॅन्टिकोर एक दिवशी सिटाडेलच्या मुख्यालयात हल्ला करते आणि त्यांच्या सर्व एजंटला मारते.सिटाडेल एक गुप्त शस्त्र बनवीत आहे त्याचा फॉर्म्युला घेऊन मॅन्टिकोर नवीन अत्याधुनिक शस्त्र बनवित आहे.
या गोष्टीला आठ वर्षे झालीत.डायना अजूनही सिटाडेलच्या इतर एजंटचा शोध घेतेय.मॅन्टिकोरने ते शस्त्र वापरल्यास जगात हाहाकार उडेल आणि जगाचे संपूर्ण नियंत्रण मॉन्टीकोरच्या हाती येईल.
डायना त्यांची योजना पूर्ण होवू देईल का ??
एक ऍक्शनने भरलेली ,थ्रिलर अशी सिरीज प्राईम व्हिडिओवर हिंदी भाषेत आहे.

Friday, October 25, 2024

द स्ट्रेंजर्स

The Strangers : Chapter 1
द स्ट्रेंजर : चॅप्तर 1
माया आणि रायनची एकत्र राहण्याचे पाचवे वर्ष आहे त्यानिमित्ताने  दोघेही तीन दिवस कारने बाहेर फिरतायत. फिरत असताना ते व्हीनस गावात शिरतात.या गावात एकूण साडेचारशे लोकवस्ती आहे. गाव थोडे विचित्र दिसतेय.माया आणि रायन लंच करून बाहेर पडतात आणि त्यांची गाडी बिघडते. सुदैवाने तिथे मेकॅनिक असतो पण तो गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी मिळेल असे सांगतो. गावात राहण्यासाठी हॉटेल नाही पण एक रिकामा बंगला आहे. तो बंगला एका शिकाऱ्याचा आहे. 
दोघेही त्या बंगल्यात एका रात्रीसाठी थांबायचे ठरवितात .पण त्या बंगल्यात काही विचित्र घडतेय.दोघांच्या हालचालीवर कोणाचेतरी लक्ष आहे. 
अचानक तीन मुखवटे घातलेल्या व्यक्ती त्यांच्या मागे लागतात.
पुढे काय होईल ??
माया आणि रायन त्यांच्याशी लढा देऊन स्वतःची सुटका करून घेतील ??
एका रात्रीत घडलेली ही अंगावर काटा आणणारी घटना आपण श्वास रोखून पाहतो .चित्रपट नेहमीच्या भयपटासारखा संथ आहे.पुढे काय होईल याची उत्कंठा वाढत जाते.
याचा दुसरा भाग येणार असल्यामुळे हा चित्रपट अपूर्ण सोडला आहे.
प्राईम व्हिडिओवर हा चित्रपट हिंदी भाषेत आहे.

Wednesday, October 23, 2024

खेल खेल मे

Khel Khel Main
खेल खेल मे
मोबाईलने सर्वांच्या आयुष्यात क्रांती आणली आहे. काहीजणांनी फसवणुकीसाठी तर काहींनी फायद्यासाठी वापर केला. असेच काही उच्चभ्रू मित्र लग्नासाठी जयपूरला आपल्या फॅमिलीसोबत एकत्र आलेत.
डॉ. ऋषभ मलिक एक सर्जन आहे .तो  अतिशय सफाईने खोटे बोलतो.त्याची पत्नी वर्तिका  लेखिका आहे.दोघांच्यात थोडा तणाव आहे.त्यांच्यात घटस्फोटाची प्रक्रिया चालू आहे.
कबीर देशमुख प्रसिद्ध क्रिकेट कोच आहे.तो एकटाच लग्नाला आलाय.
हरप्रित सिंहची गाड्यांची डीलरशिप आहे.त्याची पत्नी हॅप्पी साधी गृहिणी आहे.
समर तन्वर आपल्या सासर्याच्या कंपनीत ब्रँड मॅनेजर आहे .त्याची नैना एका ब्युटीकची मालकीण आहे.
हे सर्व वर्तिकाच्या बहिणीच्या लग्नाला  जयपूरला एकत्र  येतात.गप्पा मारताना वर्तिका सर्वांसमोर एक खेळ खेळायची योजना मांडते.त्यानुसार सर्वांनी आपले मोबाईल टेबलवर ठेवायचे आणि प्रत्येकाच्या फोनवर येणारे मेसेज ,इमेल ,फोन कॉल उघडपणे वाचायचे .
गंमत म्हणून सुरू झालेला हा खेळ प्रत्येकाच्या आयुष्याला कलाटणी देणारा कसा ठरतो हे चित्रपटातच बघावे लागेल.
या चित्रपटातील संवाद अतिशय प्रभावशाली आहेत.कधी कधी हसू येते तर कधी गंभीर होतो. 
अक्षयकुमार, फरदिन खान, तापसी पनू , वाणी कपूर ,आदित्य सील,  प्रमुख भूमिकेत आहेत.
हळूहळू उत्कंठा वाढवणारा ,कधी हसविणारा तर क्षणात गंभीर करणारा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे.

Monday, October 21, 2024

डबल इस्मार्ट

Double ismart
डबल इस्मार्ट
ज्यांनी इस्मार्ट शंकर पाहिला असेल त्यांच्या हा चित्रपट पटकन लक्षात येईल. शंकर एक टपोरी तरुण.त्याच्या डोक्यात पाठीमागे युएसबी पोर्ट आहे.दुसऱ्यांची मेमरी त्याच्या डोक्यात ट्रान्स्फर करण्यासाठी शंकरचा वापर रॉकडून झालेला असतो .आता शंकर पुन्हा आपल्या मूळ स्वभावात आलाय.
बिग बुल भारताला हवा असलेला मोस्ट वॉन्टेड अतिरेकी.तो जगभरात सर्व प्रकारचे ड्रग ,हत्यारे पुरवितो.भारतात त्याचे बरेच बेकायदेशीर धंदे चालू आहेत.शंकर त्याचे पैसे लुटत असतो.त्यामागे ही काही कारणे असतात. 
एक दिवस बिग बुलला ट्युमरचे निदान होते आणि तो हादरतो.काहीही करून आपण जिवंत राहायला पाहिजे असे ठरवून तो यावर उपाय शोधत असतो .त्याचवेळी डॉ. थॉमस त्याला मेमरी ट्रान्स्फरची कल्पना देतो .योग्य माणसाचा शोध घेताना त्याला शंकर सापडतो.
 जन्नत इडी ऑफिसर आहे .ती बिग बुलच्या पैशावर नजर ठेवून आहे त्यासाठी ती शंकरची मदत घेते.
पण बिग बुल शंकरला पकडून आपली मेमरी त्याच्या मेंदूत ट्रान्सफर करतो.आता शंकरच्या हातात फक्त चार दिवस आहेत.त्यानंतर तो पूर्णपणे बिग बुल बनेल.
बिग बुलच्या डोक्यात बरेच काही प्लॅन आहेत.तो भारतावर सतत आक्रमण करणार आहे. पण शंकर बिग बुलचा डाव हाणून पाडेल का ?? तो मध्येच शंकर बनतो तर मध्येच बिग बुल .
हा चित्रपट थोडा कॉमेडी ऍक्शन थ्रिलर आहे. संजय दत्तने बिग बुलची मोठी प्रभावी भूमिका केली आहे .तर सयाजी शिंदे ,मकरंद देशपांडे हे मराठी अभिनेते आहेत.
राम पोटीनेनी इस्मार्ट शंकर च्या प्रमुख भूमिकेत आहे. काव्या थापर जन्नतच्या भूमिकेत शोभेची बाहुली दिसते.
चित्रपट जिओ सिनेमावर हिंदी भाषेत आहे.