Thursday, August 29, 2024

रायन

Raayan
रायन 
कथावरायन चार  भावंडात सर्वात मोठा.त्याच्या मागे मुथु आणि माणिकम हे भाऊ आणि दुर्गा ही सगळ्यात छोटी बहीण.लहानपणीच त्यांचे आईवडील दुर्गाला जन्म देऊन कुठे गायब झाले. पुजारी तान्ह्या दुर्गाला घेऊन जात होता पण रायनने त्याला ठार केले आणि सर्व भावंडाना घेऊन चेन्नईत आला .त्यानेच कष्ट करून सर्वाना मोठे केले आता त्याची मार्केटमध्ये फास्ट फूडची गाडी आहे.तो स्वतः खूप कमी बोलतो आणि सतत गंभीर असतो पण भावंडांवर प्रेम आहे.
शहरात दोन डॉन आहेत .दुराई आणि सेथु .दोघांच्यात वैर आहे पण एक समजोता ही आहे.त्यामुळे सहसा मारामारी भांडणे होत नाही.दुराई रायनला आणि त्याच्या कुटुंबाला ओळखतो .तो रायनच्या वाटेला जात नाही.शेखर रायनचा गॉडफादर .चेन्नईला त्यानेच रायन आणि कुटुंबाला आसरा दिला होता.
कमिशनर आर.सारगुनम बदली होऊन चेन्नईत आलाय.त्याला दुराई आणि सेथु या दोघांचाही कायमचा बंदोबस्त करायचा आहे पण त्यांच्यात काहीच घडत नाहीय.म्हणून तो स्वतः च त्यांच्यात काहीतरी घडेल अशी योजना आखतो.
दुर्गाचे लग्न ठरले आहे. रायन त्यासाठी पैसे जमवायचे प्रयत्न करतोय.  मुथु एक दिवस दारू प्यायला बारमध्ये जातो .तिथेच दुराईचा मुलगा दारू प्यायला आलाय आणि त्याला मारायला काही गुंड आलेत.पण त्यातील काहीजण मुथुची छेड काढतात आणि तिथे भयंकर हाणामारी होते.मुथु स्वतः ही जखमी होतो.
त्या हाणामारीत दुराईचा मुलगा ठार झाला हे रायनला कळते आणि दुराईला मुथुचे नाव कळते.दुराई रायनला मुथुला त्याच्या स्वाधीन करायची धमकी देतो .
रायनसाठी कुटुंब प्रिय आहे.तो मुथुला दुराईच्या स्वाधीन करेल का ?? आणि त्यामुळे हे प्रकरण शांत होईल का ? सेथुही दुराईचा काटा काढण्याची संधी शोधतोय.त्यालाही रायन हवाय.
कमिशनरला हे गॅंगवॉर हवे आहे कारण त्यामुळेच सर्व गुंड संपून जाणार आहेत.त्यासाठी त्यालाही रायनची गरज भासणार आहे.
रायनला कुटुंब सोडून कोणीच प्रिय नाही. दुर्गा त्याची आवडती बहीण आहे आणि तिच्या सुखासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो .
धनुष रायनच्या प्रमुख भूमिकेत आहे.अतिशय कमी संवाद ,गंभीर चेहरा आणि खुनशी नजर घेऊनच चित्रपटभर वावरला आहे. प्रकाशराज कमिशनर झालाय.तर सुदीप किशनने मुथुची भूमिका केलीय.
चित्रपटात हाणामारी हिंसाचार आणि रक्तपात भरपूर आहे. काहीप्रसंग तर अंगावर येणारे आहेत.
चित्रपट प्राईम व्हिडिओवर हिंदी भाषेत आहे.

Wednesday, August 28, 2024

राजकीय हत्या

राजकीय हत्या 
पंकज कालुवाला
परममित्र पब्लिकेशन 
पंजाबचा गव्हर्नर म्हणून मायकल ओडवायरची नेमणूक झाली. पंजाबात अशांतता होती.
रोलेक्ट ऍक्ट कायदा लागू झाल्यामुळे असंतोष पसरला होता. ओडवायरने विमानातून जनतेवर गोळीबार केला त्यात पंधरा वीस लोक मारले गेले तरीही आंदोलन थांबले नाही.शेवटी त्याने जनरल डायरला बोलावून घेतले.जनरल डायर मुळातच खुनशी होता. 
बैसाखीचा सण पंजाबात उत्साहाने साजरा केला जातो .त्या दिवशी लोक जालियनवालाबागेत जमा झाले.एकच दरवाजा असलेल्या बागेत साधारण वीस हजार लोक जमा झाले होते.त्यात स्त्रिया लहान मुले वृद्ध यांचाही भरणा होता.जनरल डायर सैनिकांची तुकडी घेऊन  बागेत शिरला आणि त्यांनी जमावावर अमानुषपणे गोळीबार केला.गोळ्या संपल्या म्हणून गोळीबार संपला असे त्याने जबानीत सांगितले. 
या प्रकरणामुळे जनरल डायर आणि गव्हर्नर ओडवायर याना इंग्लंडला पाठविण्यात आले.पण उधमसिंह नावाच्या तरुणाने त्यांना शिक्षा करायची प्रतिज्ञा घेतली. त्यासाठी उधमसिंहने किती कठोर परिश्रम घेतले आणि कसे त्यांना मारले ???
थोर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद ब्रिटिशांची डोकेदुखी  बनले होते.त्यांची नेमबाजी अचूक होती.वेषांतर करण्यात ही पटाईत होते. काकोरी ट्रेन खजिना लुटण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता. व्हॉईसरॉय लॉर्ड आयर्विन याना ट्रेनस्फोटातून ठार मारण्याचा त्यांचा प्रयत्न फसला आणि ब्रिटिश सरकार त्यांच्या मागे लागले . त्याचा मृत्यू राजकीय हत्याच आहे.
अफगाणिस्तानचे हफीझुल्लाह अमीन  सोव्हिएत युनियनच्या पाठिंब्यावर राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले पण नंतर त्यांचे धोरण आणि निर्णय सोव्हिएतला खटकू लागले त्यांनी अमीन याना ठार करण्याची योजना बनवली आणि ती अंमलात आणली.
शीख धर्मावर नेहमीच अन्याय होतोय अशी भावना त्यांची झाली होती. शिखांचे स्वतंत्र राष्ट्र असावे यासाठी त्यांनी लढा सुरू केला .त्यासाठी परदेशातील समुदायाने त्यांना आर्थिक मदत केली.
पण पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी ताठर भूमिका घेतली .खलिस्तानी नेते संत भिद्रनवाले सुवर्णमंदिरात ठाण मांडून बसले होते त्यांच्यासोबत 1500 अतिरेकी आणि प्रचंड दारुगोळा होता.शेवटी लष्करप्रमुख अरुणकुमार वैद्य यांच्या मदतीने ऑपरेशन ब्लू स्टार पार पडले .पण शिखांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आणि त्यांच्याच अंगरक्षकानी इंदिरा गांधी यांची हत्या केली.त्यासाठी कोण कसे तयार झाले .या कटाचे प्लॅनिंग कसे झाले ते वाचल्यावरच कळेल.
निवृत्त लष्करप्रमुख जनरल अरुण कुमार वैद्य यांची ही पुण्यात काही वर्षांनी हत्या झाली .
पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या तामिळ अतिरेक्यांनी आत्मघातकी बाँबने केली.त्यासाठी अनेक महिने तयारी चालू होती .
श्रीलंकेचे सॉलोमन भंडारनायके यांची  हत्या कशी केली ??
पाकिस्तानचे जनरल झिया उल हक तसेच बेनझीर भुट्टो यांच्या हत्येमागे कोण आहेत आणि कश्या अमलात आणल्या गेल्या.
लेखकाचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारण आणि इतिहासाचा प्रचंड अभ्यास आहे.त्यांनी अतिशय बारकाईने सगळ्या गोष्टी मांडल्या आहेत.पुस्तक वाचताना लेखक जणू तिथे उभे आहेत असे वाटते.
यासर्व राजकीय हत्या का आहेत याची ही कारणे त्यांनी दिली आहेत. तसेच पुस्तक वाचताना कुठेही कंटाळवाणे होणार नाही याची काळजी घेतली आहे.
संदर्भासाठी घरी संग्रही असावे असे पुस्तक .

Monday, August 26, 2024

हिट स्प्रे

हिट स्प्रे
आज श्रीकृष्ण जन्माष्टमी होती. त्यामुळे आमची छोटी दिपा खुश होती. आज तिच्या आवडत्या देवाचा वाढदिवस नव्हता का .
सात वर्षाची दिपा नेहमी आपल्या दप्तरात श्रीकृष्णाची छोटी प्लास्टिकची मूर्ती आणि तिच्या आवडीचे द्रौपदी वस्त्रहरणचे पुस्तक ठेवायची. शाळेत गोष्ट सांगायची वेळ आली की अगदी अभिनयासह तीच गोष्ट सांगायची.
दिपा तशी मध्यमवर्गीय .एक मजली चाळीत राहणारी. वडील छोट्या कंपनीत क्लार्क तर आई दुसर्याकडे जाऊन जेवण करायची. दीपा आता चौथीला होती. दिसायला आईच्या वळणावर ,गोरी , गोल चेहरा ,हसल्यावर कोणाचेही लक्ष वेधून घेणारी ,चेहऱ्यावर बालपणाचे निरागस भाव. चाळीत सर्वांची लाडकी . कोणाच्याही घरात शिरून हक्काने वावरणारी. घरात एकटी असली की वेळ मिळेल तेव्हा श्रीकृष्णाशी आपल्या मनातले बोलणारी. तश्या तिच्या मैत्रिणी खूप पण घरात एकटे असल्यावर कोणाशी बोलणार ?
हल्ली  गेले काही दिवस ती थोडी अबोल आणि गंभीर झाली होती. मैत्रिणीशी फार बोलत नव्हती आणि बोलली तरी मोजून मापून . मनातून फारच अस्वस्थ असल्यासारखी दिसत होती.आई वडील तर त्यांच्या कामात बिझी.तरीही बाबा रात्री जेवायला बसल्यावर तिच्याशी गप्पा मारायचे .
 शेजारचे काका त्यांच्याघरी रोजच गप्पा मारायला यायचे. खरे तर दिपाला ते फार आवडायचे . नेहमी दिपासाठी  चॉकलेट ,कुरकुरे  आणायचे .तिला जवळ घेऊन शाळेतील गमतीजमती विचारायचे.
दिपाच्या शाळेत गुड टच बॅड टच शिकवू लागले होते.मुलींची शारीरिक ठेवण , शरीराच्या विविध भागांचे वर्णन ,त्यांचा उपयोग असा बराच अभ्यास शाळेत सुरू झाला होता. तेव्हापासून त्या काकांचा वेगळाच स्पर्श जाणवू लागला होता.
याविषयावर मैत्रिणींशी बोलली पण त्यांनाही काहीप्रमाणात असाच अनुभव येत होता. त्याही घरी बोलत नव्हत्या.मग शेवटी हिने आपला मित्र श्रीकृष्णाशी बोलायला सुरुवात केली. ती त्याला हे सर्व सांगायची .काही वाईट घडले की तो करेल मदत अशी तिची भाबडी समजूत झाली होती.
त्या दिवशी घरात झुरळ खूप झाली म्हणून बाबांनी हिटचा मोठा स्प्रे आणला होता. आईने तिला जुना रिकामा स्प्रे कचऱ्यात टाकायला दिला . पण ही त्या स्प्रेशी खेळत बसली . मच्छर दिसला की त्यावर स्प्रे मार असेच तिचे चालू होते .अचानक तिच्या पाठीवर आईचा धपाटा बसला ." कार्टे खेळत काय बसलीस ,फेकून दे तो . तोंडात गेला तर जीव जाईल " 
रडवेला चेहरा करून पाठ चोळत तिने आईकडे पाहिले आणि स्प्रे घेऊन खाली उतरली. लवकरच जन्माष्टमीचा उत्सव येणार होता.चाळीतील वातावरण उत्साही होते.रस्त्यावर एक व्यक्ती श्रीकृष्णाचा  अवतार करून बासरी वाजवत होता . ती भान हरपून  त्याच्याकडे पाहत राहिली .
थोडयावेळाने त्याचे तिच्याकडे लक्ष गेले "काय ग पोरी,  किती वेळ उभी राहणार ? आणि हातात काय आहे ? हिट का ? सांभाळून ,खूप धोकादायक आहे ते. डोळ्यात गेले की डोळे कामातून जातील आणि पोटात गेले की जीव जाईल .फेकून दे आणि घरी गेल्यावर हात स्वच्छ धू "भारावून जात तिने मान डोलावली.
घरी आल्यावर तिने टीव्ही सुरू केला आणि आवडते कार्टून चॅनेल लावले.टॉम अँड जेरीचे कार्टून सुरू होते. त्यात टॉम हातात हिट घेऊन जेरीच्या मागे फिरत असतो . तो जेरीच्या डोळ्यावर हिटचा फवारा मारतो आणि जेरी गडबडा लोळू लागतो. नंतर तिला बऱ्याच ठिकाणी हिट दिसू लागले.एका  जाहिरातीत तर श्रीकृष्णाने द्रौपदीला हिट गिफ्ट केले असे दाखविले होते.त्यात तिला म्हणतो  प्रत्येकवेळी  मी काही तुझे रक्षण करायला येणार नाही तुलाच तुझे रक्षण करावे लागेल.
आज श्रीकृष्ण जन्माष्टमी होती. दिपा रात्रीपासूनच आनंदात होती. पण सकाळीच काका त्यांच्या घरी आले होते. त्यांची नजर पाहताच दीपा शहारली. 
"आमची दिपू राणी शाळेत नाही गेली अजून " त्यांनी तिच्याकडे पाहत विचारले.
" ही काय चाललीच आहे .आहो भाऊ , आज रात्री एक वाजेपर्यंत दिपाकडे लक्ष द्याल का ?? आज मालकीणबाईकडे जन्मोत्सव आहे .तिथेच रात्री एक पर्यंततरी थांबावे लागेल आणि हिचे बाबा ही गोविंदयाची पहिली हंडी फोडणार आहेत .त्यामुळे रात्री उशिर होईल.तुम्ही लक्ष द्याल का तिच्याकडे ? " आई केविलवाणा चेहरा करून काकांना विचारत होती.
" हो ,तुम्ही काळजी करू नका तिची .मी आहे तिच्यासोबत .आम्ही दोघे मज्जा करू " काका नजर रोखून दीपाकडे पाहत उत्तरले."तसेही आज मलाही जागेच राहावे लागणार आहे".
" चला एक चिंता मिटली असे म्हणून " बाबा बाहेर पडले.
संध्याकाळी दीपा उशिराच शाळेतून निघाली. आता तिला खूपच अस्वस्थ वाटत होते. काकांची ती नजर आणि चेहरा सारखा डोळ्यासमोर येत होता .शेवटी रस्त्यात पडलेल्या हिटच्या रिकाम्या डब्यावर फुटबॉल खेळत ती घरी पोचली.
ती दिसताच काका गोड हसत पुढे आले "आलीस बाळा "असे म्हणून कुरकुरेचे पाकीट तिच्या हाती दिले . 
" तू फ्रेश हो मग मी येतो " असे बोलून बाहेर गेले.तिला ते कुरकुरेचे पाकीट फोडावेसेच वाटेना.कशीबशी ती फ्रेश होऊन अभ्यासाला बसली.
रात्री काका फराळाचा डबा घेऊन आत शिरले. यावेळी त्यांनी दरवाजा लावून घेतला .तिला प्रचंड दडपण आले होते.
" काय करतेय दिपूराणी " म्हणत ते तिच्या बाजूला बसले आणि खांद्यावर हात ठेवला. त्यांचा हात हळूहळू तिचा खांदा आणि नंतर पाठ कुरवाळू लागला. ती शहारली एक पाल अंगावरून फिरतेय असा भास तिला होऊ लागला . तिने त्यांच्यापासून दूर व्हायचा प्रयत्न केला पण आता त्यांच्या चेहऱ्यावर वेगळेच भाव दिसू लागले.त्यांनी तिचा हात पकडून जवळ खेचले आणि मिठीत घेण्याचा प्रयत्न करू लागले .तिने हातपाय झाडत प्रतिकाराचा प्रयत्न केला आणि त्याच गडबडीत ती खाली कोसळली. ती खाली झोपलेली पाहतच काका तिच्यावर झेपावले .त्यांनी एका हाताने तिचे तोंड बंद केले .
इतक्यात तिला कॉटखाली कोपऱ्यात ठेवलेला हिट स्प्रे दिसला .कसाबसा हात लांबवित तिने तो स्प्रे हातात घेतला आणि पूर्ण ताकदीने काकांच्या तोंडावर फवारला .
एका क्षणात काकांची पकड सुटली . डोळ्यावर दोन्ही हात धरीत ते किंचाळले आणि गडबडा लोळू लागले. तिला ते पाहून टॉम अँड जेरीची आठवण झाली रागाच्या भरात तिने पुन्हा तो स्प्रे त्यांच्या तोंडावर फवारला .आता मात्र काकांची भीतीने गाळण उडाली .त्यांनी कसाबसा दरवाजा उघडला आणि बाहेर पळाले.
ते जाताच तिने ताबडतोब दरवाजा लावून घेतला .
दुसऱ्या दिवशी काका कुठेच दिसले नाही .बाबांनी तिला गोविंदा पथकात नेले .वाटेत तिला तोच श्री कृष्णाच्या अवतारातील माणूस बासरी वाजवताना दिसला .ती जवळ आल्याची जाणीव होताच त्याने बासरी वाजवायचे थांबून डोळे उघडले आणि मंदपणे हसून " काय ग हिट जागच्या जागी ठेवलेस ना " म्हणून विचारले आणि डोक्यावरचे मोरपीस काढून तिच्या हातात दिले.
" तू तिच्या आईवडिलांना सांगून किंवा प्रत्यक्षात जाऊन ही घटना टाळू शकला असतास "  एका पायाने अधू मित्र त्याच्या खांद्यावर हात ठेवीत म्हणाला .
मी देव आहे रे ,पण जादूगार नाही.आपण प्रत्यक्षात काही करू शकत नाही .आपण फक्त इकडचे तिकडे करतो जस्ट लाईक ट्रेडिंग.त्यांच्या नशिबात घडणाऱ्या घटना आपण बदलू शकत नाही .अरे कितीवर्षं मी त्यांच्या मदतीला धावणार आता त्यांच्यासाठी त्यांनाच लढू दे की.आपण बाहेरून मदत करू .तिच्या हातात हिट पाहिले आणि डोक्यात कल्पना आली मग आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात एआय च्या साहाय्याने तिला सगळीकडे हिट आणि त्याचा वापर कसा दिसत राहील त्याचे आयोजन केले. मग काय त्या हुशार मुलीने त्याचा योग्य वापर केला की नाही "तो हसत डोळे मिचकावत म्हणाला .
" धन्य आहेस तू देवा चल या खुशीत मी तुला दही आणि लोणी देतो " मित्र म्हणाला आणि ते दोघे एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून समोरच्या श्रीकृष्ण डेअरीकडे निघाले.
© श्री.किरण कृष्णा बोरकर

Saturday, August 24, 2024

डीसेप्शन पॉईंट

डीसेप्शन पॉईंट 
डॅन ब्राऊन 
अनुवाद अशोक पाध्ये 
मेहता पब्लिशिंग हाऊस
उत्तर ध्रुवावर आर्टिक महासागराच्या बर्फाळ वातावरणात  अमेरिकन अंतराळसंस्था नासाचा एक महत्त्वपूर्ण प्रकल्प चालू आहे .
आज रात्री आठ वाजता त्या शोधाची अधिकृत घोषणा राष्ट्राध्यक्ष झर्ची हेन्री व्हाईट हाऊसमधून करणार आहेत. हा शोध नासाचे आधीचे अयशस्वी प्रोजेक्ट आणि त्यात वाया गेलेला बेसुमार पैसे वसूल करणारा आहे.अमेरिकन जनतेची नासाविषयीची पूर्वदूषित मते बदलणारी ठरतील.
सेनेटर थॉमस सेक्टन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उभे राहिलेत. नासावर होणारा प्रचंड खर्च थांबवून त्या पैश्याचा उपयोग जनतेच्या भल्यासाठी करावा हा त्याच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा आहे आणि जनतेने काही प्रमाणात तो उचलून धरला आहे.
रॅचेल सेक्टन एनआरओ या गुप्त विभागात डेटा अनलिस्ट म्हणून काम करतेय. सेनेटर थॉमस सेक्टन तिचे वडील. पण दोघात काही फारसे पटत नाही.
आज तिला अचानक व्हाईट हाऊसमधून राष्ट्राध्यक्षाचे आमंत्रण येते .तिच्यासाठी खास विमानाची सोय केली होती. राष्ट्राध्यक्षांनी तिला आर्टिक महासागरावर नासाच्या प्रोजेक्टवर तिला पाठविले . तीचे विमान त्या बर्फाच्या जमिनीवर उतरताच ती हादरून गेली.नासाचा भव्य प्रोजेक्ट त्या हिमनगावर चालू होता.त्या बर्फाची जाडी साधारण तीनशे फूट होती आणि तो शेकडो मैल पसरला होता.
तिथेच मायकेल टॉलंड हा प्रसिद्ध समुद्री शास्त्रज्ञ, कॉरकी मर्लिनसन  खगोलशास्त्रज्ञ, नोराह मँगोर ही ग्लासीलॉजी तज्ञ, आणि वाईली मिंग पुरातन जीवष्म शास्त्रज्ञ त्या प्रोजेक्टवर निरीक्षण करण्यासाठी थेट राष्ट्राध्यक्षांकडून नेमले आहेत. 
रॅचेल समोरच साधारण दोनशे फूट खोल बर्फात गाडलेला दगड बाहेर काढण्यात आला .प्रत्यक्षात तो दगड नसून तीनशे वर्षांपूर्वी अंतळातून पृथ्वीवर पडलेली उल्का आहे आणि या उल्कात 19 कोटी वर्षापूर्वीचे जीवाष्म आढळून आलेत.
रॅचेलने ह्या शोधाची माहिती राष्ट्राध्यक्षांच्या आदेशावरून व्हाईट हाऊसच्या सर्व कर्मचार्यांना दिली. या शोधामुळे राष्ट्राध्यक्ष पुन्हा निवडणूक जिंकतील आणि नासा पुन्हा जोराने अंतराळ मोहिमा चालू करतील.
पण डेल्टा फोर्सचे तीन कमांडो या प्रोजेक्टवर लांबून लक्ष ठेवून आहेत.त्यांचे मधमाशीच्या आकाराचे छोटे कॅमेरे तिथे फिरतायत आणि सगळे रेकॉर्डिंग करतायत.
जिथून उल्का बाहेर काढली तिथे आता दोनशे फूट खोलीची विहीर तयार झालीय. मिंग तिथे गेला असता त्या पाण्यात काहीतरी विचित्र गोष्ट दिसते .कुतूहलाने तो त्या पाण्याची तपासणी करायला जातो .त्याच्यावर नजर ठेवणाऱ्या डेल्टा फोर्सला नाईलाजाने त्याला मारावे लागते.
पण काहीवेळाने रॅचेल आणि बाकी तिघांना ही वेगळेपणा जाणवतो . ते काय आहे हे कळताच चौघेही हादरून जातात. डेल्टा फोर्स आता त्यांच्या मागावर आहेत.त्यांना जिवंत सोडू नका असा स्पष्ट आदेश आहे.
असे काय आहे जे प्रसिद्ध होऊ नये म्हणून काहीजण त्यांच्या जीवावर उठले.आर्टिक महासागराच्या हिमनगावर हा थरार चालू होतो आणि त्याचा थेट संबंध व्हाईट हाऊसशी आहे.
डॅन ब्राऊनची नेहमीसारखी चोवीस तासात अर्धे जग फिरवणारी अत्याधुनिक उपकरणे वापरून रहस्याचा शोध घेणारी एक थरारक उत्कंठा वाढवीत नेणारी वैज्ञानिक कादंबरी .

Friday, August 23, 2024

शेखर होम

Shekhar Home
शेखर होम 
पश्चिम बंगालमध्ये लोनपूर नावाचे छोटे शांत गाव आहे. या गावात तसे काहीच घडत नाही. शेखर होम नावाचा एक गृहस्थ त्या गावात राहतो. तो कोण कुठला हे कोणालाच माहीत नाही पण गावात कोणाची बकरी शोधून देतो किंवा काही छोटे मोठे गुन्हे सोडवून देतो. त्याची निरीक्षणशक्ती अफाट आहे. 
जयव्रत सैनी आर्मीमध्ये डॉक्टर होता. लोनपूरच्या आश्रमात मनःशांतीसाठी आला होता.काही दिवस शेखर होमच्यासोबत रूम पार्टनर म्हणून राहायचे होते.पण शेखरने जबरदस्तीने आपला सहाय्यक म्हणून घेतले.
गावात एक शव मिळाले . गावातील पोलिसांना हा धक्का होता .त्यांनी ही आत्महत्या आहे असे जाहीर करून टाकले पण शेखरने तो खून आहे असे सांगून अजूनही खून होतील असे सूचित केले आणि त्याप्रमाणे घडले आणि  शेखरने खरा खुनी शोधून दिला .
पण शेखरवर काहीजणांची नजर आहे.थायलंडमधील आतंकवादी ग्रुप शेखरच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून आहेत .तर भारतीय गुप्तचर खात्यातील काही अधिकारी ही शेखरवर नजर ठेवून आहे. एम नावाची व्यक्तीही शेखरवर नजर ठेवून आहे.
डॉ. सैनी शेखरला घेऊन खाजगी गुप्तहेर एजन्सी काढतो.ते आजूबाजूच्या गावातील छोट्या मोठ्या केसेस घेतात.
शेवटी ती वेळ येते जेव्हा थायलंडमधील आतंकवादी ग्रुप शेखरच्या घरी पोचतो आणि त्याच्या घरमालकीणीला ताब्यात घेऊन शेखर आणि डॉ सैनिला अशी गोष्ट करायला लावतात जिला शेखर नकार देऊ शकत नाही .
 शेरॉलॉक होम्सवर आधारित ही सिरीज आपल्याला आठ भागात संपूर्ण एक कथा दाखविते.पहिल्या काही भागात शेखरने सोडविलेल्या काही केसेस आहेत नंतर मात्र शेखरचा भूतकाळ चालू होतो आणि त्या लिंक वर्तमानात जोडल्या जातात.
के के मेनन शेखरच्या प्रमुख भूमिकेत तर रणवीर शौरी डॉ सैनीच्या भूमिकेत आहे.
जिओ सिनेमावर ही सिरीज मराठी आणि हिंदी भाषेत आहे.

Thursday, August 22, 2024

मॅन ऑफ ताय ची

Man Of Tai Chi
मॅन ऑफ ताय ची 
ताय ची चीनचा खूप पुरातन  मार्शल आर्टचा प्रकार आहे.साधारण सहाशे वर्ष जुन्या मंदिरात एक भिखु आपल्या एकमेव शिष्याला टायगर चेनला हा प्रकार शिकवतो आहे.पैसे कमविण्यासाठी याचा वापर करायचा नाही ही त्याची मुख्य अट आहे.
डोनाका  मार्क प्रसिद्ध उद्योगपती एक खाजगी फाईट क्लब चालवतो.ही फाईट खाजगी वाहिनीतून अतिशय धनाढ्य व्यक्तींना दाखवली जाते. फाईट एकाच्या मृत्यूपर्यंत चालते.
 डोनाका टायगर चेनला आपल्या फाईट क्लबमध्ये येण्याची ऑफर देतो.तो ऐकत नाही पाहून त्याचे मंदिर  तोडण्याची व्यवस्था करतो.मंदिर वाचविण्यासाठी टायगर  चेनला खूप पैश्याची गरज असते .तो डोनाकाची ऑफर स्वीकारतो.
हाँगकाँगची तरुण पोलीस ऑफिसर सून जिंगला डोनाकावर नजर आहे. तिला त्याचे फाईट क्लब उध्वस्त करायचे आहे. यासाठी ती टायगर चेनची मदत घेते.
पण ते करण्यासाठी खूप काही करावे लागेल. आपल्या आयुष्यातील मोठी आणि निर्णायक फाईट टायगर चेनला करायची आहे.तो यशस्वी होईल का ?? त्याचे मंदिर वाचेल का ??
डोनाकाची खलनायक भूमिका केनु रिव्हने केली आहे.
चित्रपटाचा दिग्दर्शक केनु रिव्ह आहे.
चित्रपट नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे.

Wednesday, August 21, 2024

डबल एक्सएल

Double XL
डबल एक्सएल
राजश्री त्रिवेदी मेरठला आपले आईवडील आणि आजी सोबत राहतेय.तिला स्पोर्ट निवेदिकाबनायचेय..तिला क्रिकेटचे ज्ञान उत्तम आहे. पण ती खूप जाड आहे.
सायरा खन्ना फॅशन डिझायनर आहे. स्वतःचा ब्रँड असावा हे तिचे स्वप्न . त्यासाठी तिला लंडनमध्ये शूटिंग करायचे आहे.पण अचानक काही कारणांनी तिचा कॅमेरामन आणि डायरेक्टर  येण्यास नकार देतात. तीही शरीराने जाड आहे.
राजश्रीला दिल्लीतील मोठ्या चॅनेलकडून इंटरव्ह्यूसाठी बोलावणे येते पण ती जाडी असल्यामुळे इंटरव्ह्यू न होताच तिला नापास केले जाते.
त्याचवेळी सायरा तिला भेटते.राजश्रीचे व्हिडिओ पाहून सायरा तिला आपल्या शूटिंगची डायरेक्टर होशील का म्हणून विचारते. श्रीकांत नवोदित कॅमेरामन आहे .तोही त्यांना जॉईन होतो. लंडनला पोचल्यावर झोरावर त्यांना प्रोड्युसर म्हणून भेटतो.
आता दोघींनाही आपली स्वप्ने पूर्ण करायची आहेत.ती पूर्ण होतील का ??
विनोदी अंगाने बनविलेला हा चित्रपट नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे.
हुमा कुरेशी ,सोनाक्षी सिन्हा, झहीर इकबाल,महंत राघवेंद्र प्रमुख भूमिकेत आहेत.
एक टाईमपास , डोक्याला फारसा त्रास न देणारा ,कुटुंबासोबत एकत्र पाहण्यासारखा चित्रपट .

Tuesday, August 20, 2024

फिर आयी हसीन दिलरूबा

Phir Aayi Hasseen Dillruba
फिर आयी हसीन दिलरुबा
तुम्हाला हा चित्रपट पाहायचा असेल तर आधी हसीन दिलरूबा पहावा लागेल.पहिल्या भागात राणी आणि रिशू गायब झालेत.पोलीस अधिकारी किशोर रावतची बदली होते तेव्हा तो दिनेश पंडितचे पुस्तक वाचतो आणि त्याला कळते नक्की काय घडले असेल.
आता या गोष्टीला पाच वर्षे झालीत.किशोर रावतची बदली आग्राला झालीय.तिथे राणी एका ब्युटीपार्लरमध्ये कामाला आहे.ती एका म्हातारीकडे पेईगगेस्ट म्हणून राहतेय. तिथेच अभिमन्यू म्हातारीचे बीपी ,शुगर चेक करायला येतो. अभिमन्यू कंपौंडर आहे. तो राणीवर मनापासून प्रेम करतो. 
राणी आणि रिशू चोरून एकमेकांना भेटतात. राणीवर आता किशोर रावतची कडक नजर आहे.त्यातच रिशूचे काका आणि निशीचे मामा इन्स्पेक्टर मोंटूसिंह तपासासाठी आग्राला येतात.ते रिशू आणि राणीचे सगळे मनसुबे उधळून लावतात.
नाईलाजाने पुढील प्लॅन करण्यासाठी राणीला अभिमन्यूशी लग्न करावे लागते. राणीच्या प्रेमाखातर अभिमन्यू त्यांच्या प्लॅनमध्ये सामील होतो.
पण सर्व गोष्टी प्लॅनप्रमाणे घडतील का ?? किशोर रावत आणि मोंटूसिंह त्यांना आडवे येणारच .काही गोष्टी अनपेक्षित घडतात.
पण पुन्हा एकदा दिनेश पंडितचे पुस्तक त्यांच्या मदतीला येते आणि पुन्हा चक्रे फिरतात.
अनपेक्षित वळणे घेणारा हा चित्रपट हिंदी भाषेत नेटफ्लिक्सवर आहे.
तापसी पनू,विक्रांत मेसी ,आदित्य श्रीवास्तव हे पहिल्या भागातील मुख्य कलाकार या भागातही आहेत .पण सनी कौशलने अभिमन्यू आणि जिमी शेरगिलने मोंटूसिंह बनून या भागात दमदार प्रवेश केला आहे. चित्रपटाचा तिसरा भाग कदाचित येऊ शकतो.

रात अकेली है

Raat Akeli Hai
रात अकेली है
रात्री त्या सुनसान रस्त्यावर एका कारला मागून आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली . नंतर ट्रकमधून तो माणूस उतरला आणि कारमध्ये जखमी झालेल्या मध्यमवयीन महिलेची आणि ड्रायव्हरची हत्या केली .नंतर त्यांची प्रेते एका फॅक्टरीत गाडून टाकली.प्रेतांची व्हिलेवाट लावताना त्याचे हात ऍसिडने भाजले.
या गोष्टीला पाच वर्षे उलटून गेलीत.इन्स्पेक्टर जटिल यादव त्या छोट्या शहरात बदली होऊन आलाय. एके रात्री त्याला गावातील हवेलीत हत्या झालीय असा फोन येतो.त्या हवेलीत काहीतरी मोठा समारंभ चालू होता.चौकशी करताना असे कळले की ठाकूर रघुवीरसिंहचे लग्न होते आणि त्याचीच कोणीतरी क्रूरपणे हत्या केलीय.
ठाकूर रघुवीरसिंहचे हे  दुसरे लग्न होते.त्यांची ही पत्नी त्यांची रखेली होती आणि त्यांच्यापेक्षा वयाने अर्धी होती. घरात त्यांची बहीण ,तिचा मुलगा, मुलगी तसेच रघुवीरसिंह च्या पहिल्या पत्नीचा भाऊ ,मुलगा ,सून आहेत.
आता सर्व संपत्ती राधा अर्थात त्यांच्या रखेलीला मिळणार म्हणून चिडले आहेत. जटिल यादव राधाला ओळखतो .त्यानेच पाच वर्षांपूर्वी ट्रेनमध्ये तिला वाचविले होते. ती खून करणार नाही याची त्याला खात्री आहे. जटिल यादवला विक्रमवर म्हणजेच त्याच्या भाच्यावर संशय आहे .कारण राधा आणि विक्रमचे एकमेकांवर प्रेम आहे.पण विक्रमचे लग्न तेथील आमदार आणि रघुवीरसिंह चा मित्र मुन्ना राजाच्या मुलीशी होणार आहे.
जटिल या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सत्य शोधून काढतो पण ते सत्य कोणाच्या पचनी पडत नाही.
असे कोणते सत्य आहे ज्यामुळे ठाकूर रघुवीरसिंहची हत्या झाली.पाच वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीला कोणी मारले.
एक रहस्यमय थ्रिलर चित्रपट नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेत आहे.
नवाझुद्दीन सिद्दीकी ,राधिका आपटे, आदित्य श्रीवास्तव यात प्रमुख भूमिकेत आहेत.

Thursday, August 15, 2024

मिशन क्रॉस

Mission: Cross
मिशन क्रॉस 
मी सून सेऊल पोलीस डिपार्टमेंटमध्ये अधिकारी आहे.तिचा नवरा कांग मू साधा स्कुलबस ड्रायव्हर आणि घरची कामे करणारा .तो तिची काळजी घेते कधीकधी तो तिच्या पाकिटातून पैसे ही चोरायचा. 
एक दिवस त्याला ही ज्यू रस्त्यात भेटते.ती त्याच्या जुन्या मित्राची पत्नी असते.चौकशी करताना त्याला आपला मित्र काही गुंडांच्या ताब्यात असल्याचे कळते.त्याच्याकडे एक खास फाईल आहे आणि त्यासाठी त्याचा छळ चालू आहे असे त्याला ही ज्यू सांगते.तो मित्राला सोडविण्यासाठी तिला मदत करायला तयार होतो.
त्यांना एकत्र पाहून मी सूनचे सहकारी चकित होतात आणि तुझ्या नवऱ्याचे अफेयर चालू आहे असे तिला सांगतात.मी सून त्याचा फोन हॅक करते आणि त्यांच्यावर पाळत ठेवते. कांग मू मित्राला गुंडांच्या तावडीतून सोडविण्यात यशस्वी होतो पण मी सूनवर   हल्ला होतो आणि तिला ताब्यात घेतात.
कांग मूला नाईलाजाने आपले खरे रूप मी सूनपुढे उघडावे लागते.तो कोरियन सैन्यात स्पेशल फोर्समध्ये होता.एका मिशनमध्ये अपयश आले म्हणून त्याला सैन्यातून काढून टाकण्यात आले होते आणि याच मिशनमध्ये त्याचा मित्र पकडला गेला होता.
आता भाडोत्री गुंड आणि सेऊलचे काही अधिकारी त्या फाईलसाठी मी सून आणि कांग मूच्या पाठी लागले आहेत.ते दोघे मिळून शत्रूचा खातमा करतील का ??
एक कोरियन  धमाल विनोदी ऍक्शन चित्रपट नेटफ्लिक्स वर हिंदी भाषेत आहे.

Tuesday, August 13, 2024

टुर्बो

Turbo
टुर्बो
देशात हजारो बँक अकाउंट आहेत जी ऍक्टिव्ह नाहीत.त्यात तुमचेही असू शकते.पण तुमच्या अकाउंटमध्ये पैसे भरून ते दुसऱ्या दिवशी ताबडतोब काढून ही घेतले जाऊ शकतात.किंवा तुम्ही कधीतरी कोणाला आधारकार्ड दिले असेल तर तुमचे खोटे बँक अकाउंट काढून त्यात लाखो रुपये भरून ते पुन्हा काढले जाऊ शकतात .
केरळातील छोट्या गावात आज उत्सव चालू आहे .पण  उत्सवात मारामारी झाली नाही तर मजा नाही  आणि त्यात ही तो टुर्बो जोस असेल तर अजून मजा. पण ह्यावेळी जोसच्या आईने त्याला गावाबाहेर पाठविले आहे .आणि जोस आईवर खूप प्रेम करतो. पण उत्सवात यावेळी त्याचा जिवलग मित्र जेरीवर हल्ला होतो आणि त्याला वाचवायला  जोसला यावेच लागते. 
पण यावेळी ही नेहमीची लढाई नव्हती.जेरीच्या प्रेयसीच्या बापाने जेरीला मारायला गुंड पाठविले होते आणि ते इंदूचा दुसऱ्या दिवशी साखरपुडा करणार होते.जोस तसा भोळा आहे तो ताबडतोब इंदूच्या घरी जाऊन तिला उचलून जेरीच्या पुढ्यात आणून ठेवतो .जेरी घाबरून तिला ओळखायला नकार देतो. इंदू चिडून चेन्नई ला निघून जाते.ती एका बँकेत मॅनेजर आहे.इकडे तिचे आईवडील पोलीस तक्रार करतात आणि जोसची आई इंदूला घरी सोडण्याचे फर्मान काढते.तिला आणायला जोस चेन्नई ला येतो.
जेरीही एका बँकेत मॅनेजर आहे. एका कस्टमरच्या अकाउंटमध्ये अचानक सत्तर लाख येतात अशी तक्रार त्याच्याकडे येते .विशेष म्हणजे त्या खातेधारकाचे  फार पूर्वी निधन झालेले आहे.आणि पैश्याचा व्यवहार ही जेरीच्या अकाउंटमधून झालाय. जेरी या प्रकरणाचा तपास घेण्याचे ठरवितो आणि एक मोठे षडयंत्र त्याच्या समोर उघड होते.
त्या षडयंत्रातील माणसे आता जेरीच्या पाठी लागली आहेत.पण टुर्बो जोस आपल्या पाठीशी आहे तोवर काहीही होणार नाही असा जेरीचा विश्वास आहे.
जोस जेरीला वाचवून हे षडयंत्र सर्वांसमोर आणेल का ??
चित्रपटाच्या शेवटी याचा दुसरा भाग ही येईल हे सूचित केले आहे.
सुपरस्टार मामुटी टुर्बो जोसच्या प्रमुख भूमिकेत आहे.थोडासा  भोळा निरागस पण ऐनवेळी डोक्याचा वापर करणारा हा वेगळाच मामुटी आपल्याला दिसतो.नेहमीप्रमाणे सुरेख असे ऍक्शन सीन यात आहेत.आणि सुसाट वेगाने होणारा पाठलाग श्वास रोखून ठेवतो.
सोनी लिव वर हा चित्रपट हिंदी भाषेत आहे.

Monday, August 12, 2024

दि व्हॉल्ट ऑफ विष्णू

दि व्हॉल्ट ऑफ विष्णू
अश्विन सांघी
अनुवाद..संकेत लाड
मेहता पब्लिशिंग हाऊस
समुद्रसपाटीपासून 14 हजार उंचीवर असलेल्या डोकलामच्या पठारावर 17 माऊंटन डिव्हिजनचे भारतीय जवान डोळे फाडून समोरच्या दृश्याकडे पाहत होते.खरेतर ते मनातून खचले होते.बर्फाळ वारा आणि गारांचा पाऊस त्यांच्या चेहऱ्यावर आदळत होता.पण त्याहून भीषण होते समोरून येणारी चीनी सैन्याची अद्यावत तुकडी. ते सैनिक सामान्य चिन्याप्रमाणे नव्हती. ते असामान्यरित्या उंच आणि बलदंड होते. सर्वांच्या डोक्यावर रडार यंत्रणा असणारी हेल्मेट होती.वजनाने हलक्या पण संहारक रायफली होत्या. डोळ्यावर नाईट व्हिजन गॉगल होते. संपूर्ण शरीरावर अत्याधुनिक चिलखत होते. त्यांचा हल्ला जोरदार होता.काही मिनिटातच त्यांनी भारतीय जवानांना ठार मारले . पण ते स्वतः मात्र किरकोळ जखमी झाले होते. त्यांच्या हालचाली अतिशय चपळ होत्या.फक्त सूऱ्याचा वापर करीत त्यांनी भारतीय तुकडीला कापून काढले होते. जे जसे वाऱ्याच्या वेगाने आले तसेच निघून गेले होते. भारतीय भू भागावर त्यांनी कोणताही ताबा ठेवला नाही.
भारतीय संरक्षणदलाच्या मिटिंगमध्ये वरिष्ठ अधिकारी ही घटना श्वास रोखून पाहत होते.सर्वच जण हादरून गेले होते.संरक्षण सल्लागार जनरल  जय ठाकूर अध्यक्षस्थानी होते.या प्रकरणाचा तपास करण्यासाठी त्यांनी डीआरडीओची तरुण ऑफिसर परमजीत खुराना उर्फ पॅमची निवड झाली. पॅम कर्नल आकाश खुरानाची मुलगी होती .कर्नल खुराना शांतिसेनेत असताना अपघातात ठार झाले होते.
मुळात हे चिनी सैनिक आहेत का ?? असले तरी, इतके चपळ आणि ताकदवान कसे ?? हाच प्रश्न पॅमला पडला आहे आणि ती त्या दृष्टीने तपास सुरू करते. ती आपला मित्र मार्कच्या मदतीने कांचीपुरम येथे गुप्तपणे राहत असलेल्या डॉ राव आणि त्यांची मुलगी अनुपर्यंत पोचते. डॉ.राव तिला तीन माकडाचा संदर्भ देतात आणि एका चिनी बौद्ध भिक्खू च्या यात्रेची कागदपत्रे देतात.
रामायणात लक्ष्मण जखमी झाला होता तेव्हा त्याला वाचवायला हनुमानाने पर्वत उचलून लंकेत नेला होता. त्यावेळी पर्वतावरील काही दुर्मिळ वनस्पती खाली पडल्या .त्या वनस्पतीचे रक्षण एक आदिवासी जमात करतेय ज्यांना आताच्या बाहेरच्या जगाशी काहीही संबंध नाहीय.
भारतातील चीन चे हस्तक अनेक वर्षांपासून डॉ रावचा तपास घेतायत. ते पॅम आणि मार्कच्याही मागावर आहेत.
इसवी सन 622 ला शियान झान नावाच्या बौद्ध भिक्षुने भारताची यात्रा सुरू केली होती.चीनच्या सम्राटानेच त्याला पाठिंबा दिला होता. तो भारतात नालंदा विद्यापीठात दोन वर्षे शिकला. अखेर तेरा वर्षाची खडतर यात्रा पूर्ण करून शियान परतला तेव्हा त्याच्याकडे बुद्ध मुर्त्या आणि बुद्धाचे काही मूळ ग्रंथ होते पण त्यासोबत एक कलश होता जो अतिशय मौल्यवान होता. पण त्याचा या घटनेशी काय संबंध आहे ?
पॅम या रहस्याचा शोध घेईल का ? मुळात तो विष्णूचा पेटारा कुठे आहे आणि त्या पेटाऱ्यात नक्की काय आहे ?? 
अश्विन सांघीची नेहमीप्रमाणेच गूढ ,रहस्यमय आणि थरारक अशी कादंबरी जी आपल्याला सहाव्या शतकात फिरवून आणते आणि तिचा संबंध आताच्या काळात जोडते.
एकदा वाचायला सुरुवात केली की खाली ठेवू शकणार नाही अशी कादंबरी.

Sunday, August 11, 2024

किंग्समन :द गोल्डन सर्कल

Kingsaman : The Golden Circle
किंग्समन :द गोल्डन सर्कल
किंग्समन ही इंग्लडची सिक्रेट सर्व्हिस एंजन्सी. बाहेरून तर ती उच्च दर्जाचे कपडे शिवणारी कंपनी आहे पण आतून ती अत्याधुनिक यंत्रणेने सज्ज आहे.
त्यांचा हॅरी नावाचा एजंट मारला गेलाय असे सर्व समजून चालतात. आता त्याचाच शिष्य एगसी किंग्समनचा प्रमुख एजंट झालाय.
एके दिवशी अज्ञात शत्रू त्यांचे दुकान उध्वस्त करतो त्याचसोबत त्यांच्या मित्रांना आणि एजंटलाही ठार करतो.त्या हल्ल्यात फक्त एगसी आणि मर्लिन वाचतात.मर्लिन हा किंग्समनचा मेंदू आहे.तो कॉम्प्युटर एक्सपर्ट आहे तसेच तो प्रशिक्षकही आहे.
किंग्समन आणीबाणीच्या काळात स्टेट्समनला संपर्क करतात. स्टेस्टमन अमेरिकेतील उच्चप्रतीची व्हिस्की बनविणारी कंपनी आहे आणि तेही सिक्रेट सर्व्हिसमध्ये आहेत. 
स्टेट्समन मर्लिन आणि एगसीला मदत करायला तयार होतात .इतक्यात त्यांच्या एका एजंटच्या चेहऱ्यावर निळ्या खुणा उमटतात.हा एक प्रकारचा आजार आहे जो मादक द्रव्यातून दिला गेलाय. हा आजार झालेले फक्त तीन आठवडे जगणार आहेत.अमेरिकेत मादक पदार्थ सेवन करणाऱ्यांची संख्या लाखोंने आहे.त्या सगळ्यांना या आजाराने ग्रासले आहे.हा आजार पॅप्पी नावाच्या स्त्रीने पसरविला आहे .ती ड्रग पुरवणारी सर्वात मोठी माफिया आहे.तिने ड्रग अधिकृत करावे अशी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाकडे मागणी केलीय.
आता हे सर्व थांबविण्याची जबाबदारी किंग्समनवर आलीय..एगसी आणि मर्लिन पॉप्पी कडून अँटीडोट मिळवतील का ?? त्या अँटीडोटमुळे लाखो आजारी लोकांना नवीन जीवन मिळणार आहे.
बॉण्डपटापेक्षाही अत्याधुनिक उपकरणे ,वेगवान सुसाट पाठलाग ,अप्रतिम फाईट चित्रीकरण या चित्रपटात पाहायला मिळेल.