Monday, August 26, 2024

हिट स्प्रे

हिट स्प्रे
आज श्रीकृष्ण जन्माष्टमी होती. त्यामुळे आमची छोटी दिपा खुश होती. आज तिच्या आवडत्या देवाचा वाढदिवस नव्हता का .
सात वर्षाची दिपा नेहमी आपल्या दप्तरात श्रीकृष्णाची छोटी प्लास्टिकची मूर्ती आणि तिच्या आवडीचे द्रौपदी वस्त्रहरणचे पुस्तक ठेवायची. शाळेत गोष्ट सांगायची वेळ आली की अगदी अभिनयासह तीच गोष्ट सांगायची.
दिपा तशी मध्यमवर्गीय .एक मजली चाळीत राहणारी. वडील छोट्या कंपनीत क्लार्क तर आई दुसर्याकडे जाऊन जेवण करायची. दीपा आता चौथीला होती. दिसायला आईच्या वळणावर ,गोरी , गोल चेहरा ,हसल्यावर कोणाचेही लक्ष वेधून घेणारी ,चेहऱ्यावर बालपणाचे निरागस भाव. चाळीत सर्वांची लाडकी . कोणाच्याही घरात शिरून हक्काने वावरणारी. घरात एकटी असली की वेळ मिळेल तेव्हा श्रीकृष्णाशी आपल्या मनातले बोलणारी. तश्या तिच्या मैत्रिणी खूप पण घरात एकटे असल्यावर कोणाशी बोलणार ?
हल्ली  गेले काही दिवस ती थोडी अबोल आणि गंभीर झाली होती. मैत्रिणीशी फार बोलत नव्हती आणि बोलली तरी मोजून मापून . मनातून फारच अस्वस्थ असल्यासारखी दिसत होती.आई वडील तर त्यांच्या कामात बिझी.तरीही बाबा रात्री जेवायला बसल्यावर तिच्याशी गप्पा मारायचे .
 शेजारचे काका त्यांच्याघरी रोजच गप्पा मारायला यायचे. खरे तर दिपाला ते फार आवडायचे . नेहमी दिपासाठी  चॉकलेट ,कुरकुरे  आणायचे .तिला जवळ घेऊन शाळेतील गमतीजमती विचारायचे.
दिपाच्या शाळेत गुड टच बॅड टच शिकवू लागले होते.मुलींची शारीरिक ठेवण , शरीराच्या विविध भागांचे वर्णन ,त्यांचा उपयोग असा बराच अभ्यास शाळेत सुरू झाला होता. तेव्हापासून त्या काकांचा वेगळाच स्पर्श जाणवू लागला होता.
याविषयावर मैत्रिणींशी बोलली पण त्यांनाही काहीप्रमाणात असाच अनुभव येत होता. त्याही घरी बोलत नव्हत्या.मग शेवटी हिने आपला मित्र श्रीकृष्णाशी बोलायला सुरुवात केली. ती त्याला हे सर्व सांगायची .काही वाईट घडले की तो करेल मदत अशी तिची भाबडी समजूत झाली होती.
त्या दिवशी घरात झुरळ खूप झाली म्हणून बाबांनी हिटचा मोठा स्प्रे आणला होता. आईने तिला जुना रिकामा स्प्रे कचऱ्यात टाकायला दिला . पण ही त्या स्प्रेशी खेळत बसली . मच्छर दिसला की त्यावर स्प्रे मार असेच तिचे चालू होते .अचानक तिच्या पाठीवर आईचा धपाटा बसला ." कार्टे खेळत काय बसलीस ,फेकून दे तो . तोंडात गेला तर जीव जाईल " 
रडवेला चेहरा करून पाठ चोळत तिने आईकडे पाहिले आणि स्प्रे घेऊन खाली उतरली. लवकरच जन्माष्टमीचा उत्सव येणार होता.चाळीतील वातावरण उत्साही होते.रस्त्यावर एक व्यक्ती श्रीकृष्णाचा  अवतार करून बासरी वाजवत होता . ती भान हरपून  त्याच्याकडे पाहत राहिली .
थोडयावेळाने त्याचे तिच्याकडे लक्ष गेले "काय ग पोरी,  किती वेळ उभी राहणार ? आणि हातात काय आहे ? हिट का ? सांभाळून ,खूप धोकादायक आहे ते. डोळ्यात गेले की डोळे कामातून जातील आणि पोटात गेले की जीव जाईल .फेकून दे आणि घरी गेल्यावर हात स्वच्छ धू "भारावून जात तिने मान डोलावली.
घरी आल्यावर तिने टीव्ही सुरू केला आणि आवडते कार्टून चॅनेल लावले.टॉम अँड जेरीचे कार्टून सुरू होते. त्यात टॉम हातात हिट घेऊन जेरीच्या मागे फिरत असतो . तो जेरीच्या डोळ्यावर हिटचा फवारा मारतो आणि जेरी गडबडा लोळू लागतो. नंतर तिला बऱ्याच ठिकाणी हिट दिसू लागले.एका  जाहिरातीत तर श्रीकृष्णाने द्रौपदीला हिट गिफ्ट केले असे दाखविले होते.त्यात तिला म्हणतो  प्रत्येकवेळी  मी काही तुझे रक्षण करायला येणार नाही तुलाच तुझे रक्षण करावे लागेल.
आज श्रीकृष्ण जन्माष्टमी होती. दिपा रात्रीपासूनच आनंदात होती. पण सकाळीच काका त्यांच्या घरी आले होते. त्यांची नजर पाहताच दीपा शहारली. 
"आमची दिपू राणी शाळेत नाही गेली अजून " त्यांनी तिच्याकडे पाहत विचारले.
" ही काय चाललीच आहे .आहो भाऊ , आज रात्री एक वाजेपर्यंत दिपाकडे लक्ष द्याल का ?? आज मालकीणबाईकडे जन्मोत्सव आहे .तिथेच रात्री एक पर्यंततरी थांबावे लागेल आणि हिचे बाबा ही गोविंदयाची पहिली हंडी फोडणार आहेत .त्यामुळे रात्री उशिर होईल.तुम्ही लक्ष द्याल का तिच्याकडे ? " आई केविलवाणा चेहरा करून काकांना विचारत होती.
" हो ,तुम्ही काळजी करू नका तिची .मी आहे तिच्यासोबत .आम्ही दोघे मज्जा करू " काका नजर रोखून दीपाकडे पाहत उत्तरले."तसेही आज मलाही जागेच राहावे लागणार आहे".
" चला एक चिंता मिटली असे म्हणून " बाबा बाहेर पडले.
संध्याकाळी दीपा उशिराच शाळेतून निघाली. आता तिला खूपच अस्वस्थ वाटत होते. काकांची ती नजर आणि चेहरा सारखा डोळ्यासमोर येत होता .शेवटी रस्त्यात पडलेल्या हिटच्या रिकाम्या डब्यावर फुटबॉल खेळत ती घरी पोचली.
ती दिसताच काका गोड हसत पुढे आले "आलीस बाळा "असे म्हणून कुरकुरेचे पाकीट तिच्या हाती दिले . 
" तू फ्रेश हो मग मी येतो " असे बोलून बाहेर गेले.तिला ते कुरकुरेचे पाकीट फोडावेसेच वाटेना.कशीबशी ती फ्रेश होऊन अभ्यासाला बसली.
रात्री काका फराळाचा डबा घेऊन आत शिरले. यावेळी त्यांनी दरवाजा लावून घेतला .तिला प्रचंड दडपण आले होते.
" काय करतेय दिपूराणी " म्हणत ते तिच्या बाजूला बसले आणि खांद्यावर हात ठेवला. त्यांचा हात हळूहळू तिचा खांदा आणि नंतर पाठ कुरवाळू लागला. ती शहारली एक पाल अंगावरून फिरतेय असा भास तिला होऊ लागला . तिने त्यांच्यापासून दूर व्हायचा प्रयत्न केला पण आता त्यांच्या चेहऱ्यावर वेगळेच भाव दिसू लागले.त्यांनी तिचा हात पकडून जवळ खेचले आणि मिठीत घेण्याचा प्रयत्न करू लागले .तिने हातपाय झाडत प्रतिकाराचा प्रयत्न केला आणि त्याच गडबडीत ती खाली कोसळली. ती खाली झोपलेली पाहतच काका तिच्यावर झेपावले .त्यांनी एका हाताने तिचे तोंड बंद केले .
इतक्यात तिला कॉटखाली कोपऱ्यात ठेवलेला हिट स्प्रे दिसला .कसाबसा हात लांबवित तिने तो स्प्रे हातात घेतला आणि पूर्ण ताकदीने काकांच्या तोंडावर फवारला .
एका क्षणात काकांची पकड सुटली . डोळ्यावर दोन्ही हात धरीत ते किंचाळले आणि गडबडा लोळू लागले. तिला ते पाहून टॉम अँड जेरीची आठवण झाली रागाच्या भरात तिने पुन्हा तो स्प्रे त्यांच्या तोंडावर फवारला .आता मात्र काकांची भीतीने गाळण उडाली .त्यांनी कसाबसा दरवाजा उघडला आणि बाहेर पळाले.
ते जाताच तिने ताबडतोब दरवाजा लावून घेतला .
दुसऱ्या दिवशी काका कुठेच दिसले नाही .बाबांनी तिला गोविंदा पथकात नेले .वाटेत तिला तोच श्री कृष्णाच्या अवतारातील माणूस बासरी वाजवताना दिसला .ती जवळ आल्याची जाणीव होताच त्याने बासरी वाजवायचे थांबून डोळे उघडले आणि मंदपणे हसून " काय ग हिट जागच्या जागी ठेवलेस ना " म्हणून विचारले आणि डोक्यावरचे मोरपीस काढून तिच्या हातात दिले.
" तू तिच्या आईवडिलांना सांगून किंवा प्रत्यक्षात जाऊन ही घटना टाळू शकला असतास "  एका पायाने अधू मित्र त्याच्या खांद्यावर हात ठेवीत म्हणाला .
मी देव आहे रे ,पण जादूगार नाही.आपण प्रत्यक्षात काही करू शकत नाही .आपण फक्त इकडचे तिकडे करतो जस्ट लाईक ट्रेडिंग.त्यांच्या नशिबात घडणाऱ्या घटना आपण बदलू शकत नाही .अरे कितीवर्षं मी त्यांच्या मदतीला धावणार आता त्यांच्यासाठी त्यांनाच लढू दे की.आपण बाहेरून मदत करू .तिच्या हातात हिट पाहिले आणि डोक्यात कल्पना आली मग आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात एआय च्या साहाय्याने तिला सगळीकडे हिट आणि त्याचा वापर कसा दिसत राहील त्याचे आयोजन केले. मग काय त्या हुशार मुलीने त्याचा योग्य वापर केला की नाही "तो हसत डोळे मिचकावत म्हणाला .
" धन्य आहेस तू देवा चल या खुशीत मी तुला दही आणि लोणी देतो " मित्र म्हणाला आणि ते दोघे एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून समोरच्या श्रीकृष्ण डेअरीकडे निघाले.
© श्री.किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment