Saturday, August 3, 2024

डिजिटल फॉट्रेस

डिजिटल फॉट्रेस 
डॅन ब्राऊन 
अनुवाद ..अशोक पाध्ये 
नॅशनल सिक्युरिटी एजन्सी अर्थात एनएसए अमेरिकेची  प्रबळ गुप्तचर संघटना. या संस्थेला सरकारने प्रचंड पैसा आणि अधिकार बहाल केले होते. जगातील कोणत्याही आणि कसल्याही गूढ संदेशाची उकल करण्याचा महासंगणक त्यांच्याकडे होता.शत्रूराष्ट्राने कोणत्याही भाषेत ,गूढ लिपीत ,गूढ चिन्हांद्वारे  पाठविलेला संदेश हा ट्रान्सलेटर महासंगणक काही मिनिटात उकल करत असे. हा ट्रान्सलेटर जगातील कोणत्याही व्यक्तींचे इ मेल ,एसएमएस वाचू शकत असे. स्ट्रॉथमोर या विभागाचा प्रमुख आणि  संस्थेच्या दुसऱ्या स्थानी होता.
सुसान एनएसएच्या क्रिप्टो डिपार्टमेंटची प्रमुख . शनिवारी तिला अचानक कार्यालयात बोलावून घेतले गेले. स्ट्रॉथमोर तिथेच होता. ट्रान्सलेटर नेहमीप्रमाणे एका गुप्त फाईलची उकल करत होता पण गेले पंधरा तास तो त्या फाईलवर काम करतोय.
एन्झेई टंकाडो मूळ जापनीस वंशाचा .हिरोशिमा अणुबॉम्ब हल्ल्यात त्याची आई मेली. रेडिएशनमुळे टंकाडो विकृत शरीराचा झाला. पण तो कॉम्प्युटरमध्ये किडा होता. एनएसएच्या ट्रान्सलेटरवर त्याने खूप काम केले होते. पण अमेरिकन नागरिकांच्या गोपनीयतेवर ट्रान्सलेटर लक्ष ठेवून आहे हे त्याला मान्य नव्हते.अमेरिकन नागरिकांचा प्रत्येक इमेल ,मेसेज  ,ट्रान्सलेटर वाचू शकत होता.त्याने याविरुद्ध आवाज उठवला आणि त्याची नोकरी गेली.
आता टंकाडोने एक असे सॉफ्टवेअर बनविले आहे जे डाऊनलोड केले तर ट्रान्सलेटर त्या कॉम्प्युटरमधील कोणतीही  माहिती चोरू शकणार नाही.थोडक्यात जगातील कोणीही माणूस आणि कोणतीही संस्था त्या कॉम्प्युटरमध्ये घुसू शकणार नाही. ट्रान्सलेटर निरुपयोगी बनेल.सध्या त्यानेच अशी फाईल ट्रान्सलेटरला पाठवली आहे जीची उकल गेले पंधरा तास ट्रान्सलेटर करतोय आणि पुढेही किती वेळ लागेल हे कोणीच सांगू शकणार नाही .टंकाडोने आपल्या प्रोग्रॅमला डिजिटल फॉट्रेस असे नाव दिले.आपल्या जीवाला धोका झाला तर तो हा प्रोग्रॅम जगाला फुकट देईल अशी धमकीही त्याने एनएसएला दिली.
डेव्हिड सुसानचा मित्र. तो कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे. तो खाजगी कामेही करतो. टंकाडोचा स्पेनमध्ये अचानक ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले म्हणून त्याच्याकडील सर्व वस्तू ताब्यात घेण्यासाठी स्ट्रॉथमोरने त्याला स्पेनमध्ये पाठविले आहे.डिजिटल फॉट्रेसची पास की त्याच्याजवळ असेल ती घेऊन यायची सूचना डेव्हिडला दिल्या होत्या.
डेव्हिडला टंकाडोच्या सामानात कोणतीही पास की सापडली नाही पण त्याच्या बोटातील अंगठी गायब झाली होती.त्या अंगठीवर पास की असेल याची डेव्हिडला खात्री होती.आता तो त्या अंगठीच्या मागावर निघाला .
डॅन ब्राऊनची नेहमीच्या शैलीतील एक थरारक ,पुस्तक संपेपर्यंत खाली न ठेवू देणारी एक रहस्यमय शोधयात्रा.

No comments:

Post a Comment