Monday, August 12, 2024

दि व्हॉल्ट ऑफ विष्णू

दि व्हॉल्ट ऑफ विष्णू
अश्विन सांघी
अनुवाद..संकेत लाड
मेहता पब्लिशिंग हाऊस
समुद्रसपाटीपासून 14 हजार उंचीवर असलेल्या डोकलामच्या पठारावर 17 माऊंटन डिव्हिजनचे भारतीय जवान डोळे फाडून समोरच्या दृश्याकडे पाहत होते.खरेतर ते मनातून खचले होते.बर्फाळ वारा आणि गारांचा पाऊस त्यांच्या चेहऱ्यावर आदळत होता.पण त्याहून भीषण होते समोरून येणारी चीनी सैन्याची अद्यावत तुकडी. ते सैनिक सामान्य चिन्याप्रमाणे नव्हती. ते असामान्यरित्या उंच आणि बलदंड होते. सर्वांच्या डोक्यावर रडार यंत्रणा असणारी हेल्मेट होती.वजनाने हलक्या पण संहारक रायफली होत्या. डोळ्यावर नाईट व्हिजन गॉगल होते. संपूर्ण शरीरावर अत्याधुनिक चिलखत होते. त्यांचा हल्ला जोरदार होता.काही मिनिटातच त्यांनी भारतीय जवानांना ठार मारले . पण ते स्वतः मात्र किरकोळ जखमी झाले होते. त्यांच्या हालचाली अतिशय चपळ होत्या.फक्त सूऱ्याचा वापर करीत त्यांनी भारतीय तुकडीला कापून काढले होते. जे जसे वाऱ्याच्या वेगाने आले तसेच निघून गेले होते. भारतीय भू भागावर त्यांनी कोणताही ताबा ठेवला नाही.
भारतीय संरक्षणदलाच्या मिटिंगमध्ये वरिष्ठ अधिकारी ही घटना श्वास रोखून पाहत होते.सर्वच जण हादरून गेले होते.संरक्षण सल्लागार जनरल  जय ठाकूर अध्यक्षस्थानी होते.या प्रकरणाचा तपास करण्यासाठी त्यांनी डीआरडीओची तरुण ऑफिसर परमजीत खुराना उर्फ पॅमची निवड झाली. पॅम कर्नल आकाश खुरानाची मुलगी होती .कर्नल खुराना शांतिसेनेत असताना अपघातात ठार झाले होते.
मुळात हे चिनी सैनिक आहेत का ?? असले तरी, इतके चपळ आणि ताकदवान कसे ?? हाच प्रश्न पॅमला पडला आहे आणि ती त्या दृष्टीने तपास सुरू करते. ती आपला मित्र मार्कच्या मदतीने कांचीपुरम येथे गुप्तपणे राहत असलेल्या डॉ राव आणि त्यांची मुलगी अनुपर्यंत पोचते. डॉ.राव तिला तीन माकडाचा संदर्भ देतात आणि एका चिनी बौद्ध भिक्खू च्या यात्रेची कागदपत्रे देतात.
रामायणात लक्ष्मण जखमी झाला होता तेव्हा त्याला वाचवायला हनुमानाने पर्वत उचलून लंकेत नेला होता. त्यावेळी पर्वतावरील काही दुर्मिळ वनस्पती खाली पडल्या .त्या वनस्पतीचे रक्षण एक आदिवासी जमात करतेय ज्यांना आताच्या बाहेरच्या जगाशी काहीही संबंध नाहीय.
भारतातील चीन चे हस्तक अनेक वर्षांपासून डॉ रावचा तपास घेतायत. ते पॅम आणि मार्कच्याही मागावर आहेत.
इसवी सन 622 ला शियान झान नावाच्या बौद्ध भिक्षुने भारताची यात्रा सुरू केली होती.चीनच्या सम्राटानेच त्याला पाठिंबा दिला होता. तो भारतात नालंदा विद्यापीठात दोन वर्षे शिकला. अखेर तेरा वर्षाची खडतर यात्रा पूर्ण करून शियान परतला तेव्हा त्याच्याकडे बुद्ध मुर्त्या आणि बुद्धाचे काही मूळ ग्रंथ होते पण त्यासोबत एक कलश होता जो अतिशय मौल्यवान होता. पण त्याचा या घटनेशी काय संबंध आहे ?
पॅम या रहस्याचा शोध घेईल का ? मुळात तो विष्णूचा पेटारा कुठे आहे आणि त्या पेटाऱ्यात नक्की काय आहे ?? 
अश्विन सांघीची नेहमीप्रमाणेच गूढ ,रहस्यमय आणि थरारक अशी कादंबरी जी आपल्याला सहाव्या शतकात फिरवून आणते आणि तिचा संबंध आताच्या काळात जोडते.
एकदा वाचायला सुरुवात केली की खाली ठेवू शकणार नाही अशी कादंबरी.

No comments:

Post a Comment