Wednesday, September 27, 2023

LUPIN

LUPIN
लुपिन
बाबकर डिओप हा सरळ साधा पण स्वाभिमानी गृहस्थ .आपल्या चौदा वर्षाच्या मुलांसोबत राहतोय.अस्साने डिओप त्याचा मुलगा हा त्यांच्यासारखाच शांत आणि हुशार आहे.
बाबकारने त्याला लुपिनचे पुस्तक वाचायला दिलंय. लुपिन हा सभ्य बदमाश आणि हुशार चोर आहे .तो अतिशय हुशारीने चोऱ्या करतो आणि नेहमी सर्वांच्या दोन पावले पुढे असतो.
बाबकर पेल्लेग्रीनी नावाच्या उद्योगपतीकडे ड्रायव्हर असतो . आपल्या मुलाला तो नेहमी त्याच्याकडील लायब्ररीमधून पुस्तके वाचायला द्यायचा .पेल्लेग्रीनीकडे एक अतिशय दुर्मिळ हिऱ्यांचा नेकलेस आहे .त्याची किंमत करोडो रुपयात आहे.एक दिवस तो हार चोरीला जातो आणि त्याचा आळ बाबकरवर येतो. बाबकर गुन्हा कबूल करतो आणि त्याची त्याला मोठी शिक्षा होते. तो निराश होऊन तुरुंगात आत्महत्या करतो .त्याच्या मुलाची अस्सानची  रवानगी अनाथाश्रमात होते.पण पेल्लेग्रीनी पत्नी त्याच्या शिक्षणाची जबाबदारी घेते.
पंचवीस वर्षानंतर  अस्सान मोठा होतो आणि लुपिनप्रमाणेच चोऱ्या करू लागतो . पेल्लेग्रीनीकडे असलेल्या त्या दुर्मिळ नेकलेसचा पुन्हा लिलाव होतो .यावेळी अतिशय शिताफीने अस्सान तो हार पळवतो.त्यावेळी त्याला कळते आपल्या वडिलांना यात मुद्दाम गोवण्यात आलेय.त्यांना बळीचा बकरा बनविण्यात आलेय.तो हळूहळू या प्रकरणाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो आणि  सर्व पुरावे जमा करतो .
खरे तर ही सरळ साधी रहस्य कथा आहे .पण तिचे सादरीकरण उत्तम आहे .अस्सानचा नेकलेस चोरीचा प्लॅन, त्यानंतर तुरुंगात जाऊन बाबकरच्या मित्राला भेटणे,  त्याच्या सामानातून वडिलांचे पुस्तक घेऊन तुरुंगातून पलायन करणे, हे सर्व कसे करतो ते बघण्यासारखे आहे.
पाच भागाची ही मालिका हिंदी भाषेत नेटफ्लिक्सवर आहे .पाच पाच भागाचे दोन सीजन आहेत . यात फारशी ऍक्शन गोळीबार नाही पण वेगवेगळ्या युक्त्या आहेत.पाहायला कंटाळा येत नाही.

No comments:

Post a Comment