Wednesday, September 13, 2023

मोदक

मोदक 
"तात्यानो पोस्टिंगची ऑर्डर इली ? "हातातील कागद नाचवत महेश नाईक जोरात ओरडला.
"म्हंजे यावेळी पण तू गणपतीत घरात नाय ? "तात्या नाईक थोड्या नाराजीने बोलले.
"कधी असतंय ? यावेळी पोस्टिंग सियाचेनला असा . महेंश आश्चर्याने कागदावर नजर फिरवीत म्हणाला ."म्हणजे एक महिना ट्रेनिंग आणि तीन महिने सियाचेनच्या उंच बर्फाळ भागात."
"अरे देवा,.आता थयसर कित्याक जातस ? मागच्या वर्षी त्या वाळवंटात आणि आता बर्फात. तुका बरा असल्याचं जागा सापडतात काम करूक "तात्या चिडून म्हणाले.
खरेच होते ते.कॅप्टन महेश नाईक भारतीय सैन्यात होता.मुळात साहसी स्वभाव असल्यामुळे खडतर ठिकाणी पोस्टिंगसाठी प्रयत्न करायचा .
मूळ कोकणातील असल्यामुळे गणपती बाप्पावर प्रचंड श्रद्धा .पण गणपती येतात तेव्हाच याची पोस्टिंग व्हायची.यावर्षीही काही वेगळे नव्हते . गणपतीच्या मखराची सुरेख सजावट त्याने तयार केली आणि पोस्टिंगची ऑर्डर हातात पडली.
"तात्यानु , आपण सर्वच असे सण साजरे करत राहिलो तर देशाची रक्षा कोण करेल ? कोणीतरी तिथे जायला हवे, मग मी का नाही " तात्यांच्या खांद्यावर हात ठेवीत तो गंभीरपणे म्हणाला.
"ताबी खराच हाय .तू जा इथला काय ता आम्हीच बघतो ."
तात्यांच्या हातावर बसून तो घराजवळ आला आणि धूप अगरबत्तीच्या वासाने मन प्रसन्न झाले. तात्या नाईककडे यायला त्याला हेच कारण पुरेसे असते.स्वच्छ प्रसन्न वातावरण .बसायला मोठा चौरंग ,ऐसपैस मखर .समोर चार प्रकारचा प्रसाद .हा कोकणी माणूस खिसा फाटका असला तरी माझ्यासाठी हात सुसाट सुटतो. मनोमन आशीर्वाद देत चौरंगावर आरामात बसला.
"इथे आल्यावर जास्तच खुश असतोस " समोरच्या नैवेदाकडे आशाळभूत नजरेने पाहत उंदराने विचारले.
"अरे का नाही ? बघ किती प्रसन्न वातावरण आहे .मुलगा घरी नाहीय ,तो परत येईल की नाही याची खात्री नाही. तरीही तात्या किती हौसेने आपले आदरातिथ्य करतात बघ. गेली चार वर्षे मी बघतोय महेश घरी नाही .त्याला उद्याची खात्री नसते तरीही आपली तयारी करून तो जातो .उरलेले काम तात्या पूर्ण करतात ." तो हसत म्हणाला.
" यामागे तुम्हीच आहात. तुम्हीच हे घडवून आणता ना ? उंदराने अंग चोरीत विचारले.उंदराने अंग चोरताच तो चमकला आणि त्या दिशेने त्याने पाहिले .बाजूच्या खिडकीच्यावर मांजराचे चित्र होते. हाहा करीत तो हसला.
"होय ,तरुणपणी माझ्यासमोर वेडेवाकडे अंगविक्षेप करीत केलेल्या नाचाची शिक्षा म्हणून पाच वर्ष माझ्यासमोर न येण्याची शिक्षा आहे ही.अरे अशी शिक्षा केल्याशिवाय तरुणपिढी सुधारणार नाही .पण बघ, तो सैन्यात गेला आणि कोणीही सहजपणे काम करणार नाही अश्या ठिकाणी काम करतोय ".तो कौतुकाने महेशच्या फोटोकडे पाहत म्हणाला.
" पण यावेळी बर्फात ?? आहो तिथे फक्त त्यांचीच तुकडी असते म्हणे.कमरेइतक्या बर्फात एकमेकांना दोरी बांधून चालत असतात ."उंदीर आश्चर्याने म्हणाला.
" मग काय झाले.कोणीतरी जायलाच हवे . मग हा का नको ? देशाची सेवा म्हणजेच माझी सेवा " ताटातील मोदक उचलत तो म्हणाला .
सियाचेनच्या बर्फाळ प्रदेशात महेश नाईकची तुकडी आपल्या कॅम्पवर  गणेशोत्सवाची तयारी करीत होती. महेशने आपल्या सामानातून छोटी मूर्ती आणली होती.आजूबाजूच्या बर्फाचा वापर त्यांनी मखराच्या सजावटीसाठी केला होता.
आज गणपती उत्सव .बर्फाच्या मखरात ती छोटी मूर्ती विराजमान झाली .नेहमीप्रमाणे त्यांना शिधा घेऊन येणारे हेलिकॉप्टर कॅम्पच्या डोक्यावर आले.पण यावेळी हेलिकॉप्टरमधून सामानाची पॅकेट पडली नाहीत तर एक तरुण शिपाई दोरीच्या साहाय्याने सरसर खाली उतरला .त्याच्या हातात मोठा बॉक्स होता.
" कॅप्टन महेश नाईक, हे खास तुमच्यासाठी आलंय आणि तुमच्याच  हातात द्यायची ऑर्डर आहे ." तो तरुण शिपाई कडक सॅल्युट करून हसत म्हणाला.त्याचे हास्य खूपच आश्वासक आणि मधुर होते आणि हसताना कोपऱ्यातील एक तुटका दात लक्ष वेधून घेत होता .
आश्चर्यचकित होऊन महेशने तो बॉक्स खोलला तर त्यात उकडीचे मोदक होते.
"कोणी पाठविले हे ?" त्याने भावुक होऊन विचारले.
" मुंबईतल्या कोणी दानशूर व्यक्तीने तुमच्यासाठी पाठविले आहेत .नाव माहीत नाही  आणि हो तुमच्या त्या गणेश मूर्तीला जाड वस्त्र नेसवा .बिचारा थंडीने कुडकूडेल तो". हसतहसत त्या शिपायाने परतीचा सॅल्युट मारला आणि दोरीवरून सरसर चढत हेलिकॉप्टरमध्ये चढला.
तात्यांच्या घरातील मखरात तो शिरला तेव्हा थंडीने कुडकुडत होता.
"फिटली का हौस त्या बर्फात फिरायची.नशीब मला नाही घेऊन गेलात .ते हेलिकॉप्टर वापरलेत आणि त्याला सॅल्युटही मारलात. ही कसली हौस, मोदक त्याला तिथे बर्फात नेऊन द्यायचे. इथे आपल्यालाच कमी पडतायत माहीत आहे ना."कमरेवर हात ठेवून शेपटी जोरजोरात हलवीत उंदीर बडबडला.
" बापरे , कसे राहतात ते तिथे. नेहमीच्या अवतारात गेलो असतो तर बर्फच झाला असता माझा.आणि ते मोदक मुंबईतील एका दानशूर व्यक्तीने विकत घेऊन दिले मला. माझ्याकडे कुठे पैसे असणार ? मी नेहमीप्रमाणे गळ्यात पाठी अडकवून नाक्यावर उभा राहिलो .भारतीय सैन्याला उकडीचे मोदक पाठवायचे आहेत . ताबडतोब दोन तीन जणांनी आणून दिले.भारतीय सैन्याला मदत करायला सगळे तत्पर असतात बघ आणि सॅल्युट मारला तर काय झाले .मायभूमीच्या रक्षणासाठी त्या खडतर वातावरणात पहारा करणारा शूर शिपाई आहे तो. आपल्याला नमस्कार करतातच ना ? आणि माझ्यामुळे तुझाही जयजयकार होतो फुकटचा " छद्मीपणे हसत तो म्हणाला.
संध्याकाळी त्याच्या गळ्यातील हार बदलताना मूर्ती इतकी थंड का लागते ? हा प्रश्न तात्यांना पडला होता .
© श्री.किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment