Saturday, September 23, 2023

मॅगी

मॅगी
त्या एकमजल्या चाळीत रवी कामतच्या हातावर बसून तो आत शिरला तेव्हा रविना वहिनीने गोड हसून त्याचे स्वागत केले.घरात ती एकटीच त्याच्या स्वागताला होती.अर्थात गेले पाच सहा वर्षे हीच परिस्थिती होती म्हणा .पण त्याला ते आवडायचे .कारण ते दोघे जी मनापासून त्याची सेवा करायची तेच आवडायचे त्याला .
आजही त्यात फरक पडणार नव्हता. रविना वहिनी खूप छान दिसत होती ते रवीच्या नजरेवरूनच त्याला कळत होते.साधी साडी,गळ्यात फक्त काळ्या मण्यांचे एक वाटीचे मंगळसूत्र .पण चेहरा हसतमुख आणि टापटीप होता . फक्त पावडरचा हलका हात फिरवला होता.रवी मुळातच हँडसम , कब्बडी खेळाडू .त्यामुळे शरीर कमावलेले होते.दोघांची जोडी शोभत होती.
"आता काय करायचे ?"मखरात फक्त गूळखोबरे पाहून त्याचा उंदीर चिडला .
"अरे ,सध्या नाही परिस्थिती त्यांची .पुढे करतील काहीतरी चांगले ." तो आजूबाजूला पाहत म्हणाला .साधा वेगवेगळ्या साड्यांची सजावट केलेला मखर होता. आपल्याला इतका ऐसपैस मखर देऊन हे दोघे झोपणार कुठे हीच चिंता त्याला पडली होती .
"हो पुढे देतील काहीतरी. हाच विचार करत गेली पाच वर्षे येतोय इथे. पण इथे आरतीच्या नावाखाली बोंबा मारायला ही कोणी नाही.अरे मागच्या वर्षी तुझा जयजयकार ही मलाच करायला लागला .उंदीरमामा की जय हे मलाच म्हणावे लागते."तो शेपटी आपटीत म्हणाला.
याला हजारो वर्षे आपण कसे सहन करतोय हाच विचार करीत तो शांत बसला.
रवी आणि रविना कामत यांचा संसारच तसा होता.रविना गावाहून शहरात आलेली तर रवी मूळ मुंबईतला.
 गिरणी कामगार संपातील फटका वडिलांना बसला पण त्यातही नुकसान लहानग्या रवीचेच झाले.शिक्षण सुटले. मग सोसायटीत गाड्या धू, पेपर टाक , दूध पोचव अशी वेगवेगळी कामे करतच मोठा झाला .शिक्षण नाही पण परिस्थितीने प्रॅक्टिकल होणे शिकवले. गावातील मुलगी मुंबईत ऍडजस्ट करणार असा अंदाज बांधूनच रविनाशी लग्न केले.
रविनाची परिस्थिती ही फारशी चांगली नव्हती.गावी घर होते पण बाकी काही नाही .तीही तिथे मजुरी करायची.आपले केवळ नाव रविना आहे रविना टंडन नाही हे पक्के मनात ठेवून होती ती.
रवी तिला आवडला .व्यसन नाही .कामात कष्ट करायची तयारी .दोघांचा संसार बऱ्यापैकी चालू होता.अजूनही बाळाचा विचार केला नव्हता .आपलेच भागत नाही तर मुलाचे कसे करणार या भीतीनेच पुढे पाऊल टाकत नव्हते.
सकाळी आठला दोघेही घराबाहेर पडायचे ते रात्री आठला घरी यायचे.या बाबतीत ते पक्की वेळ पाळीत होते.तो एका सोसायटीत सिक्युरिटी होता आणि तिथून सुटल्यावर दोन तास स्वीगीचा डिलिव्हरी बॉय म्हणून एक दोन ऑर्डर करायचा .तर रविना त्याच सोसायटीत दोन तीन घरात कामे करायची .दोन मुलांना पाळणाघरात सोडायची.
आताही दोघे त्याची पूजा आरती करून घराला कुलूप लावून बाहेर पडले. ते बाहेर पडताच तो मखरातून टुणकन उडी मारून बाहेर पडला .
"चल ये रे ,आपलेच राज्य आहे आता .चल क्रिकेट खेळू."कोपऱ्यातील छोटी बॅट हातात घेऊन त्याने उंदराला ऑर्डर सोडली. 
"म्हणजे बॅटिंग तू करणार आणि बॉलिंग मी करायची " तो चिडून म्हणाला.
" हे बघ, ही अशी संधी फक्त इथेच मिळते आपल्याला .इथेच आपण मनसोक्त आपल्या मनाप्रमाणे वागू शकतो.काळजी करू नकोस .खेळून झाल्यावर मी तुला मॅगी करून देईन " त्याने लालूच दाखवली तसा उंदीर खुश झाला आणि बॉल घेऊन त्याच्या समोर उभा राहिला .
खेळून झाल्यावर त्याने मॅगी बनवली आणि दोघांनी जमिनीवर बसून खाल्ली .मग तिथेच झोपून गेले.
 संध्याकाळी रवी सोसायटीतून बाहेर पडला आणि स्वीगीला जॉईन झाला.पण नेहमी पाच मिनिटात मिळणारी ऑर्डर आज पंधरा मिनिटे झाली तरी मिळाली नव्हती. तो गेटजवळच बसला होता.
तेव्हाच प्लॅस्टिकचा बॉल त्याच्या डोक्यावर आदळला.चिडून मागे वळून पाहिले तर एक छोटा मुलगा हातात बॅट घेऊन उभा होता.
" काका ,बॅटबॉल खेळणार का ?" त्या छोटुने निरागसपणे विचारले . खरे तर आज एक ऑर्डर कमी करावी लागेल याचीच चिंता त्याच्या डोक्यात होती.त्यामुळे तो चिडून नाही म्हणाला .
त्याचे नाही उत्तर इतक्या जोरात आले की छोटू बावरला .
"माझ्याशी खेळायला कोणी नाही .पप्पा असते तर खेळले असते "तो डोळ्यात पाणी आणून उत्तरला. त्याचा चेहरा पाहून रवी मनातून हलला.
"चल खेळू ,तू बॅटिंग कर .मी बॉलिंग करतो "असे म्हणत त्याने बॉल हाती घेतला.आज त्याच्याशी खेळताना एक अनामिक आनंद त्याला होत होता. आठ वाजत आले तसा त्याने खेळ बंद केला आणि छोटूने बॅगेतून खाण्याचा डबा काढला .
"काका या मॅगी खाऊ " असे म्हणत डबा पुढे केला .त्या मॅगीची चव रविनाच्या मॅगी सारखीच होती.
तिथे रविनाही दोन घराची कामे आटपून पाळणाघरात पोचली .
"बर झाले बाई तू आलीस .जरा वेळ या मुलांकडे लक्ष देतेस का ? मी समोरच्या सोसायटीत जाऊन बाप्पाला नमस्कार करून येते."पाळणाघरातील बाईने विचारले.
तिने हो म्हटले.
तीन चार लहान मुले होती . साधारण तीन चार वर्षांनी .ती त्यांच्यात रमून गेली .त्यातल्या एका गोड मुलीने बॅगेतून डबा काढला आणि रविनाच्या हातात दिला .कुतूहलाने तिने तो डबा उघडला तर त्यात मॅगी होती. त्या मुलीने एक चमचा मॅगी रविनाला भरविली आणि रविनाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले .रवी अशीच मॅगी बनवतो .
नेहमीप्रमाणे आठ वाजता ते कुलूप उघडून घरात शिरले तेव्हा वेगळ्याच आनंदात होते.तिने घाईघाईने नैवेद्याची तयारी केली आणि त्याच्यासमोर ठेवला .दोघांनी मिळून त्याची आरती केली .
"बाप्पा पुढच्या वर्षी आरतीसाठी तिसरा माणूस घरात येऊ दे "असे दोघेही एकदम म्हणाले आणि चमकून एकमेकांकडे पाहिले.
"होय किती दिवस आपण आपलाच विचार करत बसणार .आता जसे दोघे जगतोय तसे तिघे जगू.पण आपल्याला बाळ हवेच "रवी तिला मिठीत घेत म्हणाला .
"घ्या, मगितलेच काहीतरी .बाप्पा तुला सांगतो इथे सर्व स्वार्थी आहेत.आपण त्यांची मॅगी खाल्ली तर बदल्यात त्यांनी हे मागितले."तो उंदीर चिडून म्हणाला.
"काय हरकत आहे रे .दोघेही कष्ट करतायत .त्यांना मूल जन्माला घालण्याचा अधिकार आहे.अशी कित्येक जोडपी आहे ज्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे पण मुलांना वाढवितातच ना ? अरे आपण तशी व्यवस्थाच करून ठेवलीय यांच्यासाठी.त्यांना आतापर्यंत तो आत्मविश्वास नव्हता पण आज आपण त्यांना तो दिलाय .हेच तर त्यांच्या मनापासून केलेल्या निस्वार्थी सेवेचे  फळ आहे." तो आशीर्वाद देत म्हणाला.
रात्री साफसफाई करताना फळीवरील मॅगीचे पाकीट डस्टबीनमध्ये रिकामे कसे आले ? याचाच विचार रविना करत होती.
© श्री.किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment