Thursday, September 21, 2023

मित्र

मित्र
दरवर्षी ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये ते सुट्टीवर यायचे. यायचे म्हणजे पाठविले जायचे. मग जो तो आपापल्या घरी जायचा .वर्षातून एकदाच पोरगा घरी येतो म्हणून उत्साहाने स्वागत व्हायचे त्यांचे.
आज तो आपल्या मित्राला भेटायला अमृतबागेत जाणार होता.खरे तर त्याचा मित्र दरवर्षी त्याला भेटायला बोलावयाचा.पण याचे त्या सुट्टीतही काम चालायचे थोडीफार समाजसेवा झाली पाहिजे असे त्याचे म्हणणे.बाकीचे त्याला वर्क फ्रॉम होम करतो असे कौतुकाने म्हणत. हा हसण्यावारी न्यायचा.
खरे तर नुसते बसून काय करायचे हाच त्याच्यासमोर मोठा प्रश्न होता.तो येणार म्हणून भरपूर  नातेवाईक  भेटायला यायचे.गेट टूगेदर व्हायचे. टाईमपास तर भरपूर होत होता.पण हा काही त्यात रमत नव्हता.शेवटी त्याला अमृतबागेच्या मित्राची आठवण आली .दरवर्षी म्हणतो माझे घर बघ तर एकदा ? 
खरे तर लोकांना अमृतबाग कुठे आहे ? हे विचारायची गरजच भासली नाही. साधारण एक किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या .
"अरे बापरे ! याला वेळ आहे का आपल्याला भेटायला . किती लोकांचे कुटुंब आहे याचे. तो मनात पुटपुटत प्रवेशद्वारातून आत शिरला आणि कोणतरी त्याच्या कॉलरला पकडून मागे खेचले.
"ओ महाराज , कुठे चाललात ? " मागून आवाज आला .
त्याने दचकून मागे वळून पाहिले .तर एक मंडळाचे टी शर्ट आणि डोक्यावर टोपी घातलेला तरुण त्याला विचारत होता.
"त्याला भेटायला "त्याने भोळा चेहरा करीत सांगितले.
"काय पास ,पावती आहे का ? "त्याने पुन्हा विचारले. 
"पास पावती कश्यासाठी ? हे कधीपासून सुरू झाले .लहानपणी यायचो तेव्हा डायरेक्ट घरातच जायचो "तो प्रश्नांकित चेहरा करून म्हणाला.
"बरोबर आहे तुमचे. पण आता तुम्ही मोठे झालात .परिस्थिती बदलली .हे रांगेत उभे असलेले सर्व तिथेच जातायत  आणि जे महत्वाचे आहेत त्यांना आम्ही पास देतो पण त्यासाठी मोठे योगदान द्यावे लागते मंडळासाठी "त्या तरुणाने उत्तर दिले.
इतक्यात प्रवेशद्वाराशी गडबड झाली .कोणीतरी ओरडले सुपरस्टार विनायकुमार आलाय .तसे त्या तरुणाने त्याला बाजूला ढकलले .
"बाजूला हो, सुपरस्टार येतोय.त्याच्यासाठी रस्ता मोकळा कर ." तो त्याच्यावर खेकसत म्हणाला.
तो हेलपटत बाजूच्या दुकानाच्या शेडखाली उभा राहिला. सुपरस्टार विनायकुमार कार्यकर्त्यांच्या गराड्यात येत होता.मध्येच त्याच्यासोबत सेल्फी काढायला काही तरुणतरुणी आड येत होते.मंडळाचे कार्यकर्ते कुशलतेने त्यांना बाजूला काढत होते. पण स्वतः कॅमेऱ्यासमोर कसे येऊ याची पुरेपूर काळजी घेत होती. 
"साहेब ,तुमची ओळख आहे का ?"शेजारून नाजूक आवाजात प्रश्न आला आणि तो दचकला .एक तरुण स्त्री चार वर्षाच्या मुलाला घेऊन बाजूला उभी होती. "लांबून आलोय आम्ही ,याच्या दर्शनासाठी .हा लोकांचे ऐकतो असे म्हणतात.तीन तास उभे आहोत आम्ही .पण सतत कोण ना कोणी सेलिब्रेटी येते आणि आम्हाला थांबविले जाते. आमचा नंबर कधी येईल.नवस करायचा होता हो "ती स्त्री त्याच्यासमोर हात जोडून विनंती करत होती.
"घरी नवस करायचा. त्यासाठी इथे यायची काय गरज होती."तो तडकून म्हणाला.
" हा सर्वांच्या इच्छा पूर्ण करतो असे ऐकून आहोत."ती नरमाईने म्हणाली. "ह्यांनी सरकारी परीक्षा दिलीय ती चांगल्या मार्कनी पास होऊ दे " असा नवस करणार आहे.
" त्यासाठी नवस कशाला ? चांगला अभ्यास केला असेल तर चांगले मार्क मिळून पास होणारच .हा काय करणार ? जादू करून पास करणार का ? तुला माहितीय बारा लाख लोकांनी हा नवस केलाय ? बारा लाख जागा तरी आहेत का ?" तो चिडून म्हणाला .
त्याच्याकडेच आज दिवसभरात नऊजण हीच इच्छा घेऊन आले होते.
"हे बघा ताई ,तुम्ही घरी जा ? या मुलाला घेऊन किती वेळ उभ्या राहणार .त्याऐवजी मीच त्याला सांगतो तुमची इच्छा आणि घरी गेल्यावर देव्हाऱ्यासमोर मनोमन नमस्कार करून हीच इच्छा बोला "तो समजावणीच्या सुरात म्हणाला.
"पण मी यासाठी अनवाणी घरून आलेय "ती त्याच्या चपलांकडे पाहत म्हणाली .
"ताई तुम्ही निघा.तुमच्या मुलाला किती त्रास होतोय पहा ."असे म्हणून हातातील मोदक त्या मुलाला दिला .
त्याला नमस्कार करून ती स्त्री मागे फिरली .पण ती जाणार नाही याची खात्री होती त्याला .
मित्रासमोर खूपच गर्दी दिसत होती.दोन पुरुष आणि दोन स्त्रिया त्याच्या दोन्ही बाजूला उभे होते .त्यांची भरदार शरीरयष्टी पाहून त्यांना उलट बोलायची हिंमत कोणाच्यात नव्हती.
भेटायला येणार्यांना कोणत्याही व्यक्तीला त्याच्यासमोर पाच सेकंदापेक्षा जास्त वेळ उभे राहता येणार नाही याची पुरेपूर काळजी ते घेत होते. त्यासाठी हाताला धरून बाजूला फेकण्याचीही परवानगी त्यांना होती.
पुन्हा एकदा प्रवेशद्वाराशी गडबड उडाली .याचा फायदा घेऊन आपण आत घुसावे असे त्याने ठरविले.देशातील मोठे उद्योजक आणि नेते यांची एन्ट्री झाली.त्यात होणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन तो आत घुसला .त्याला पाहून बाकीच्यांनी ही हिंमत केली आणि आत घुसू लागले.ताबडतोब मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते अजूनच सक्रिय झाले.तसेच नेत्यांचे बॉडीगार्डही पुढे सरसावले.समोर येईल त्याला लाठीचा आणि हाताचा वापर करून हुसकावून लावण्यात आले.यांच्याही पाठीवर दोन लाठ्या पडल्या आणि शर्टाचा खिसा फाटला गेला. जसा त्या गर्दीत घुसला त्याच्या दुप्पट वेगाने तो गर्दीच्या बाहेत फेकला गेला .पुन्हा त्या दुकानाच्या शेडखालीच तो उभा होता.
कसेनुसे स्वतःशी हसत त्याने डोळे मिटले आणि मित्रांचे स्मरण केले तसा मंडपात बसलेला तो अचानक जागा झाला.डोळे वर करून त्याने त्याच्याकडे पाहिले आणि केविलवाणे हसला .खजील होत त्याने मनोमन मित्राला आशीर्वाद दिला आणि पुन्हा समोरच्यांकडे पाहू लागला .
"खरेच सुट्टी मिळूनही काहीजणांना विश्रांती नाहीच.आपण बरे "असे पुटपुटत तो घरी आला आणि मखरात जाऊन बसला.
"आता मारही खाऊन आलात का ? हद्द झाली ."कोपरापासून नमस्कार करीत बाजूचा उंदीर म्हणाला .
"अरे इथे काहीजणांना भरपूर काम आहे तर माझ्यासारखे बरेचजण नुसते आराम करतायत बघ.लोक त्याला भेटण्यासाठी काय काय करतील त्यांचे त्यांना माहीत. ती एक स्त्री आपल्या लहान मुलाला घेऊन अनवाणीच चालत आली होती बघ "तो मोदक खात सांगत होता.
"मग तिला तुम्ही तुमच्या चपला दिल्यात का ?" उंदीर त्याच्या अनवाणी पायाकडे पाहत कुत्सित स्वरात म्हणाला.
त्याने चमकून आपल्या पायाकडे पाहिले तर चपला गायब झाल्या होत्या .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment