Tuesday, September 12, 2023

भीड

BHEED
 भीड 
एक अस्वस्थ करणारा अनुभव
करोनाच्या पहिल्या लाटेचा लॉकडाऊन सुरू झाला आणि सर्व व्यवहार ठप्प झाले.अनेक गरीब मजूर ,कामगार आपल्या कुटुंबासाहित मूळ गावी परतू लागले .पण वाहतुकीची सगळी साधने बंद होती.त्यातच राज्यांच्या ,जिल्ह्याच्या ,शहरांच्या सीमा सील केल्या होत्या.मजुरांना पायी आणि मिळेल त्या साधनांचा वापर करीत जाण्याशिवाय गत्यंतर नव्हते.
सुर्यकुमार सिंह हा तरुण पोलीस इंस्पेक्टर .खालच्या जातीचा म्हणून थोडा संवेदनशील. करोनाच्या साथीत आपली जबाबदारी निष्ठने पूर्ण करतोय.
 एका राज्यातून दुसऱ्या राज्यात मजुरांचे लोंढे आपल्या कुटुंबासह निघालेत. या गर्दीत सर्व प्रकारची लोक आहेत. हायवेवर कडक पोलीस बंदोबस्त आहे म्हणून या सगळ्यांनी आडमार्ग स्वीकारला आहे.
यात एक तरुण मुलगी आपल्या दारुड्या बापासोबत सायकलवरून प्रवास करतेय .तर एक श्रीमंत स्त्री आपल्या मुलीला हॉस्टेलमधून घरी आणण्यासाठी कारमधून ड्रायव्हरसोबत निघालीय. त्रिवेदी नावाचा खाजगी सिक्युरिटी ऑफिसर आपल्या काही लोकांना एकत्र करून कुटुंबासह एका खाजगी बसने निघालाय.
सुर्यकुमारसिंहला तो आडमार्ग माहीत आहे ,म्हणून तो आपल्या सिनियरला सांगून तिथे चौकी उभारतो .त्यालाच त्या चौकीचा इनचार्ज बनविले जाते. रेणू शर्मा सुर्यकुमारसिंह प्रेयसी .ती डॉक्टर आहे.तिचीही ड्युटी त्याच चौकीवर लावली जाते.
हळूहळू त्या चौकीवर सगळ्या वाटसरूची गर्दी जमा होते.कोणालाच अपेक्षा नसते तिथे चेकपोस्ट उभारले जाईल.सुर्यकुमारसिंहलाही कल्पना नसते की इतकी गर्दी जमा होईल. चेकपोस्टच्या अलीकडेच सर्वाना अडविले जाते.यात ती कारमधील स्त्री आहे .त्रिवेदीची खाजगी बस आहे.पत्रकार आहेत. अल्पसंख्याक लोकांची बस आहे.
पुढील आदेश मिळेपर्यंत कोणीही चेकपोस्टच्या पुढे जाणार नाही असे सुर्यकुमारसिंह सर्वाना सांगतो. पण मग गर्दीतील आजारी लोकांचे काय ? सर्वांची खाण्यापिण्याची व्यवस्था कोण करेल ?? स्त्रियांच्या टॉयलेटची व्यवस्था कशी होणार ??
चेकपोस्टच्या बाजूला एक बंद मॉल आहे .त्या मॉलमध्ये खाण्याचे पदार्थ आहेत हे त्रिवेदीला माहीत आहे .पण सुर्यकुमारसिंह ते आणायला नकार देतो.
एक सरकारी सिमेंट मिक्सरला पुढे जाण्याची परवानगी मिळते. पण त्या मिक्सरमध्ये काही माणसे लपून प्रवास करीत असतात. त्यात ती मुलगीही आपल्या दारुड्या बापासोबत असते.
हळूहळू तिकडे तणाव वाढतोय. त्रिवेदी आपल्या कुटुंबाला भुकेलेला ठेवू शकत नाही.ती तरुण मुलगी आपल्या बापाला जखमी अवस्थेत तिकडे ठेवू शकत नाही.तिने दुसरा मार्ग शोधलाय. सायकलवर आपल्या बापाला बसवून ती निघालीय.तो मार्ग अजूनच खडतर आहे याची तिला जाणीव आहे .पण तिला आपल्या घरी जायचेच आहे.
काय होणार त्या गर्दीचे ??
हे सर्व पाहताना आपण अस्वस्थ होतो.आपण त्या गर्दीतले एक भाग बनतो कारण कुठेतरी आपण असे अनुभव करोना काळात घेतले आहे.आपल्या कुटुंबासोबत पायी चालत जाणारी अनेक लोक आपण पाहिली आहेत कधीकधी आपणही त्यातील एक हिस्सा बनलो असणार.
या गर्दीतही जातपात, उच्चनीच सुरवातीला पाळले गेले पण नंतर ते गळून पडले आणि सुरू झाली फक्त जगण्याची धडपड .पण कोणी माणुसकी विसरले नाही.जगण्याचा हक्क सर्वाना आहे हे कोणीही विसरला नाही.
हा संपूर्ण चित्रपट ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आहे त्यामुळे भीषणता जास्त जाणवते.
सतत अस्वस्थ असणारा सुर्यकुमारसिंह राजकुमाररावने प्रभावीपणे रंगविला आहे.तर हताश झालेला कुटुंबाची काळजी घेणारी त्रिवेदी पंकज कपूर आहे.भूमी पेडणेकर डॉ. रेणू शर्माच्या भूमिकेत आहे.
भीड आपल्याला अस्वस्थ करेल हे नक्की.
चित्रपट नेटफ्लिक्सवर आहे.

No comments:

Post a Comment