Thursday, September 14, 2023

सेवा

सेवा
शेठ जयचंद परदेशी , एक प्रसिद्ध उद्योगपती. भारतीय उद्योगविश्वात त्यांचे वरचे स्थान .माणूस वरून साधा चांगला वाटायचा पण आतून काळा कपटी.अर्थात  बिझनेसमध्ये जितका सरळ राहत येईल तितके राहत होताच पण कधी कधी वाकडे मार्ग ही शोधावे लागतात तेव्हा तो त्या मार्गाचा वापर ही करायचा.
समुद्रकिनारी असलेल्या आलिशान बंगल्यात तो राहायचा .सारी सुखे त्याच्या पायाशी होती.गणेशोत्सव तर त्याच्याकडे दणक्यात साजरा व्हायचा. हो, पण त्यात देवाच्या भक्तीचा काही संबंध नव्हता. त्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने त्याची बरीच कामे व्हायची .चार मोठ्या लोकांच्या ओळखी व्हायच्या.
 वर्षीचा गणेशोत्सव तर त्याच्यासाठी विशेष होता.काही महिन्यांपूर्वी त्याने शहरात कॅन्सरचे मोठे हॉस्पिटल उभारणार असल्याची घोषणा केली होती .त्यासाठी जागेची निवडही करण्यात आली होती .जागेचे थोडे वाद होते पण ते काहीतरी सेटलमेंट होऊन मिटतील याची खात्री होती त्यांना.
सकाळी आठ वाजता तो पालखीत बसला .पालखी कसली, तर मोठी आलिशान गाडीच होती ती.चारी बाजूने काचेच्या बॉक्समध्ये त्याला बसविले होते.बॉक्स वातानुकूलित होताच.मिरवणुकीत तर सर्व काही होते. ढोलताशा पथक, लेझीम ,.बँड , बेधुंद नाचणाऱ्या मुली.
तो मस्त सिंहासनावर बसून आजूबाजूचे दृश्य पाहत होता. खाण्यापिण्याची रेलचेल होती.खुश होऊन त्याने शेजारी बसलेल्या आपल्या उंदराकडे प्रेमाने पाहिले. तो ही खुशीत समोरचा शेंगदाण्याचा लाडू चवीने खात होता. 
नशीब या शेठकडे जाताना हा टोमणे मारीत नाही .पण आपल्याकडे ढुंकूनही पाहत नाही याचा त्याला संताप आला.आपल्याकडे ही निदान शंभर वर्षाने तरी वाहन बदलण्याचा कायदा करा असा महादेवांकडे आग्रह करावा असे निश्चित केले.
मिरवणुकीमुळे सगळीकडे ट्रॅफिक जाम होते.आज त्याचाच दिवस होता. आपले भाऊबंद सगळीकडे त्याला दिसत होते.कोणी डोक्यावरून तर कोणी हातावर तर कोणी टॅक्सी मोटारीतून जात होते.लोकांच्या चेहऱ्यावर अमाप उत्साह दिसत होता.गणपती बाप्पा मोरया असा जयजयकार सगळीकडे निनादत होता.
"अरे , आज तर वेशभूषा स्पर्धेत भाग घेतल्यासारखे वाटतेय " पेढा खाणाऱ्या आपल्या उंदराच्या डोक्यावर टपली मारत तो म्हणाला .
"तर काय ? हल्ली तुमचे मूळ रूपच मी विसरून गेलोय बघा ".उंदराने शेपटी हलवत म्हटले.
" तो बघ काशिनाथ चव्हाण ,"रस्त्यावर ट्रॅफिक कंट्रोल करणाऱ्या हवालदारकडे हात दाखवीत तो म्हणाला ."आज ही सुट्टी नाहीच त्याला.बिचारा या गाड्यांच्या गजबजाटात धूर आणि धूळ खात आपली ड्युटी करतोय."त्याही गोंधळात आपल्याकडे पाहून हात जोडणाऱ्या काशिनाथला मनोमन आशीर्वाद देत तो म्हणाला.
" मग आता काय हा ट्रॅफिक कंट्रोल करायला जाणार का तुम्ही ? समोरचे दोन तीन मोदक भरजरी अंगरख्याच्या खिशात कोंबत उंदीर भयचकित नजरेने म्हणाला.
" छेरे ,आज तर आपण श्रीमंत पाहुणचार घेणार आहोत .शेठ जयचंदकडे .पाच दिवस नुसता दंगा चालतो तिथे.नाच गाणी ,जागरण ,खाणे पिणे सर्वच काही आलिशान उंची.यावर्षी काही परदेशी पाहुणेही येणार आहेत म्हणे ",तो धुंदीत जात म्हणाला .
खरेच शेठ जयचंदकडे त्याच्या पाहुणचाराची जय्यत तयारी होती.नेहमीप्रमाणे पाच मिनिटात आरती करून शेठ जयचंद मिटिंगसाठी निघून गेले.त्यांनी नीट त्याच्याकडे पाहिलेही नव्हते.त्यानंतर घरातील नोकरवर्गाकडे त्याची जबाबदारी दिली गेली.
आज त्या चाळीत मोठी सभा भरली होती.शेठ जयचंद स्वतः त्या सभेत हजर होते. चाळीतील रहिवासी आपल्या घरातील गणपती सोडून सभेला हजर होते.
कॅन्सर हॉस्पिटलसाठी ती जमीन शेठ जयचंद याना हवी होती. आज स्वतः चाळीचा मालक त्यांना भेटायला येणार होता. शेठ जयचंद स्वतः बोलणी करायला आले तरच जागेचे डील होईल असा स्पष्ट निरोप चाळीच्या मालकाने दिला होता.
हातातील घड्याळाकडे पाहत मनोमन शिव्या घालीत शेठ जयचंद मालकाची वाट पाहत होते. एकदोनदा चिडून त्यांनी पायाजवळ घुटमळणार्या उंदरांना चिडून लाथा ही घातल्या होत्या. 
इतक्यात चाळमालक त्यांच्यासमोर येऊन बसले.वातावरणातील बदल त्यांना फारसा जाणवला नाही .पण चाळमालकाची नजर त्यांना ओळखीची वाटली .त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य खूपच आश्वासक होते.
"ही जमीन तुम्हाला देईन. पण माझ्या काही अटी आहेत." चाळ मालक गंभीर आवाजात म्हणाले. 
"तुमच्या ज्या काही अटी आहेत त्या मान्य आहेत.डबल पैसे हवे आहेत का ? तुम्ही पेपर वर सही करा आणि मोकळे व्हा.मला आज परदेशी जायचे आहे."शेठ जयचंद घाई घाईत म्हणाले.
"आहो तुमच्याकडे गणपती आहे ना ? तरीही तुम्ही कामासाठी बाहेर जाताय ?"चाळमालक आश्चर्याने म्हणाले.
"गणपती आहेत पण त्यासाठी मी कशाला तिथे हजर हवा.सर्व मोठ्या इव्हेंट कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट दिले आहेत.अगदी त्याला घरी आणण्यापासून समुद्रात विसर्जनापर्यंत सर्व प्रोग्रॅम रेडी आहे.त्यासाठी मी का हवाय. माझ्या असण्याने काय फरक पडणार आहे ?" शेठ चिडून म्हणाले.
"खरंय , म्हणूनच माझी एक अट अशी आहे  हॉस्पिटल बांधल्यावर इथे दरवर्षी गणेशोत्सव साजरा व्हावा आणि किमान दोन दिवस तुम्ही त्याची पूजा करावी आणि दिवसभर भक्तांचा पाहुणचार करावा .शिवाय या चाळकऱ्यांना इथेच पक्की घरे बांधून द्यावी"अतिशय शांत आवाजात चाळमालक म्हणाले.
"ही कसली अट ? मला नाही जमणार." शेठ जयचंद ताडकन उत्तरले.
" मग जमिनीचा विचार सोडा "असे म्हणून चाळमालक उठले .कुठून तरी दोन उंदीर त्यांच्या पुढे धावत गेले.
" सर ,आपणास जे अपेक्षित होते त्या मानाने ह्या अटी काहीच नाहीत .वर्षातून दोन दिवसांचा तर प्रश्न आहे .पुढे करू काहीतरी ऍडजस्ट "एक सहाय्यक हळूच त्यांच्या कानात कुजबुजला.
काहीतरी विचार करून त्यांनी होकार दिला आणि दोघांनी आनंदाने पेपरवर सह्या केल्या.
"तूच चाळमालक बनून गेलेलास ना ?"आपले भरजरी कपडे बदलत उंदीर छद्मीपणे म्हणाला.कशाला पाहिजे तो दोन दिवस आपल्या सेवेला .आहेत तेच जास्त आहेत.
 "अरे याना देत गेलो तर शेफारून गेलेत हे. मान्य आहे लोकपोयोगी काम करतायत पण समाजाला वेळ द्यायलाही हवा. पैसे तर सर्वच देतात. आज आपल्यासाठी तो सर्व काही करतो कुठेच कमी पडू देत नाही पण ते सर्व पैश्याच्या जोरावर.आपला चेहरा तरी त्याला आठवतो का ? तुला ही लाथा घातल्या त्याने."हसू दाबत तो म्हणाला.
"आठवण ही काढू नका त्याची .किती जोरात बसली माहितीय का ? तुमच्यासाठी मार खायचा बाकी होता तेही आज पूर्ण झाले." हाताने कुशीत दाबत उंदीर म्हणाला.
रात्री जागेचे पेपर गणपतीच्या पायाशी ठेवताना तो हसला का याचे कोडे रात्रभर शेठ जयचंदला सताविणार होते.
© श्री.किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment