Friday, September 15, 2023

" दादा !! ते आले ना "

" दादा !! ते आले ना "
खोताच्या चाळीत गणेशोत्सवाची गडबड चालू होती. गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष नेहमीपेक्षा जास्त गडबडीत दिसत होते.वय वर्ष साधारण पासष्ट,तरीही उत्साह तरुणांना लाजवेल असा. 
तशी खोतांची चाळ जुनीच. दरवर्षी गणपती येतो तसा बिल्डर यायचा आणि गणपती जातो तसाच दहा बारा मिटिंग घेऊन निघून जायचा. आता फक्त पुरातत्व विभागाने त्यांना ऐतिहासिक वास्तू म्हणून सर्टिफिकेट देणे बाकी होते.
वासुदेव निगुडकर उर्फ वासूकाका बरीच वर्षे मंडळाचे आणि चाळीचे अध्यक्ष होते. बरीच वर्षे ? यासाठीच की नवीन कोण ही जबाबदारी स्वीकारायला तयार नव्हता आणि तसेही तरुणवर्ग या चाळीत राहत नव्हताच. 
मुले मोठी झाली, चांगली नोकरी लागली,की चाळीचा विकास होईल तेव्हा होईल आपण आपला विकास करू असे म्हणत दुसरीकडे मोठा फ्लॅट घेऊन निघून जायचे.तर काहींची लग्ने चाळीत राहतो म्हणून जुळत नव्हती म्हणून दुसरीकडे भाड्याने फ्लॅट घेऊन राहायचे.
तसा खोतांच्या चाळीला फार इतिहास नव्हता .कोणीतरी म्हणायचे  लोकमान्य टिळक एकदा चाळीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला भेट देऊन गेले .पण इतिहासात कुठे नोंद नाही.
त्या संध्याकाळी तो तरुण कोणालातरी शोधत चाळीत शिरला तेव्हा वासूकाका मंडप बांधणार्यांना विविध सूचना करीत होते.मध्येच हातातील मोबाईलवरून कोणाला तरी झापत होते. तो तरुण नेमका त्यांच्यासमोर उभा राहिला आणि हळू आवाजात वासूकाका म्हणून हाक मारली.
आपल्या नावाने कोण बोंब मारतोय हे पाहण्यासाठी वासूकाका वळले आणि त्याला पाहताच स्तब्ध झाले. "पवारांचो झील ना रे तू ?" ते चेहऱ्यावर ओळखीचे हास्य आणत म्हणाले.
"नाही हो ,मी या चाळीतील नाही .पण माझे काम होते तुमच्याकडे ."तो चेहऱ्यावर हास्य आणीत म्हणाला .
"अरे ,आम्हालाच वर्गणी कमी पडतेय तर तुला काय देऊ ? इथे खोल्या आहेत भरपूर पण काम करणारे कमीच आहेत.आहेत ते फक्त काकाकाकी,  आजीआजोबा, मामामामी , ते काय वर्गणी देणार तुला ? " वासूकाका आपले पत्ते ताबडतोब दाखवून मोकळे झाले.
"काका मला वर्गणी नकोय.मला इथे एकपात्री कार्यक्रम करायचा आहे " तो म्हणाला.
"म्हणजे वऱ्हाड निघालय लंडनला सारखे "प्रा. लक्ष्मणराव देशपांडे करायचे तसे."वासूकाकानी आश्चर्याने विचारले. 
"तसेच काहीसे."
"छान , पण आमचे कार्यक्रम फुल आहेत " थोड्या ताठ्यातच वासूकाकांनी उत्तर दिले.
" काका काहीही प्रोग्रॅम नाहीत तुमचे ,रात्री बारापर्यंत सगळे जेष्ठ नागरिक इथे वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करतात, कधी पत्ते खेळात रात्री दोन नंतर फक्त उंदीर फिरतात इथे " कोनाड्यात फिरणाऱ्या उंदराकडे पाहत तो म्हणाला.
तसे वासूकाका गंभीर झाले."पोरा, खरे बोलतोस तू .पण तुझ्या कार्यक्रमाला द्यायला पैसे नाहीत आमच्याकडे ".
"काका मला पैसे नकोत.स्वातंत्र्यकाळातील संगीत नाटके यावर अभ्यास चालू आहे माझा.त्याकाळी बालगंधर्व स्त्री वेशात नायिकेची भूमिका करायचे.अजूनही काही पुरुष स्त्रीपात्राची भूमिका करायचे.संगीत नाटकात गाणी स्वतःच्या आवाजात तेही लाईव्ह म्हणायचे.अगदी चार पाच तास ही नाटके चालायची.मलाही स्त्रीवेशात त्या काळातील संगीत नाटकाची गाणी म्हणायची आहेत .नाट्यप्रवेश करायचे आहेत . तुमच्याकडे बापू वाडेकर म्हणून जुने नट राहतात असे कळले .त्यांच्यासमोर काही सादर करता आले तर आनंदच होईल "तो तरुण हात जोडून म्हणाला.
"अरे देवा ,त्यांचीच आठवण व्हावी का तुला ?" कपाळावर आठ्या पडत वासूकाका पुटपुटले.
"का हो ? बरे आहेत ना ते ? " तरुणाने काळजीने विचारले.
"आहो ते तोंडाने चांगले आहेत .म्हणजे म्हातारपणी काहींचे हातपाय चालणे बंद होते तर काहींचे तोंड .यांचे हातपाय चालत नाहीत पण तोंडाचा पट्टा सतत चालू बघा आणि गणेशोत्सव आला की येणाऱ्या जाणाऱ्यांना ओरडून जवळ बोलावतात आणि जुन्या आठवणी उगाळत बसतात .बालगंधर्वांसोबत गायचे म्हणे .टिळकांनी यांच्याही पाठीवर कौतुकाची थाप दिली असे सांगतात .कोणी पाहिलंय म्हणा.म्हातारा फेकत असतो असे सर्व म्हणतात ." वासूकाका हसत म्हणाले.
"वयाची पंचावन्न वर्षे पूर्ण झाली की सगळेच म्हातारे " तरुण खोचकपणे म्हणाला तसे वासूकाका गप्प बसले.
"ठीक आहे ,ये तू कधीही. हो, पण तुझे सामान तूच आणायचे .इथे फक्त माईक आणि स्टेज मिळेल तुला.कार्यक्रम अकरापर्यंत संपव आणि कसलीही तक्रार करायची नाही "वासूकाकांनी ताबडतोब नियमावली तयार केली .
कधी नव्हे तो गणपतीच्या मंडपात बाहेरचा कार्यक्रम होणार म्हणून चाळकरी खुश झाले .त्या रात्री बापू वाडेकर तर तल्लीन होऊन तो एकपात्री प्रयोग पाहत होते.स्त्रीच्या भूमिकेत तो तरुण सुंदर दिसत होताच पण बेधुंद होऊन नाट्यसंगीत गात होता.अचानक त्याने "दादा ! ते आले ना "असा प्रसिद्ध डायलॉग मारला आणि बापू खाडकन जागे झाले.त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.त्या तरुणांकडे पाहून त्यांनी हात जोडले. त्यानेही बापूंकडे पाहून मान डोलावली .
बरोबर अकरा वाजता प्रयोग संपला .बापूनी त्याला जवळ बोलावले.
"कोण आहेस तू "त्यांनी हात जोडून विचारले.
"बापू ओळखले नाहीत का ? आहो कित्येक प्रयोग आपण एकत्र केलेत.टिळकांनी पाठीवर कौतुकाची थाप मारली तेव्हा बाजूला मीच होतो. बापू, चला आता. बरेचजण आहोत तिथे .तुमचीच कमी आहे , पुन्हा एकदा सौभद्र , मानापमान ,संशयकल्लोळ करू .
"होय देवा ,नक्कीच येईन मी " असे बोलून त्यांनी हात जोडले.त्याच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू पुसून तो तरुण निघून गेला.
आज तो उदास चेहऱ्याने मंडपात बसला होता."आता नाटकात काम करायची हौसही फिटवून घेतली का ? गाणेही गात होतात " बाजूच्या उंदराने शेपटी आपटत नाराजी व्यक्त केली."कालच्या तुझ्या नाटकामुळे आज सकाळचा नैवेदही आला नाही अजून"
"आज नैवेद मिळणार नाही आपल्याला " उदास चेहऱ्याने तो म्हणाला आणि डोळ्यातील अश्रू पुसत समोरच्या दिशेकडे बोट दाखविले. मंडपाबाहेर बापूंच्या अंत्ययात्रेची तयारी चालू होती.
© श्री.किरण कृष्णा बोरकर.

No comments:

Post a Comment