Tuesday, September 26, 2023

शवागृह

शवागृह
"साहेब ,बॉडी लवकर मिळेल ना ? "तो वयस्कर गृहस्थ हात जोडून विष्णूला विचारत होता.विष्णूने नेहमीसारखे प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिले.
"तसे नाही हो .उद्या गणपती येणार आहेत .कोणाचा खोळंबा नको. शिवाय प्रेताला चार माणसे तरी यायला हवीत."तो गृहस्थ म्हणाला .
"मी माझे काम करून ठेवतो .बाकी सगळे डॉक्टरांवर आहे ."थंड आवाजात विष्णूने उत्तर दिले आणि शवागृहात शिरला .
होय, विष्णू शवागृहातच कामाला होता .रात्री प्रेताची राखण करायची तर कधीकधी पोस्टमार्टेमची प्रेतही फाडून द्यायच्या .
आता डॉक्टर कुठे प्रत्येक शव फाडत बसणार .ते फक्त विष्णूला सूचना देऊन जायचे  हळूहळू विष्णुच शिकला शवाला कसे कुठून फाडायचे ,कवटी कशी कापायची. 
त्याच्याशी मेलेली माणसे बोलतात असे बरेचसे त्याला ओळखणारी माणसे बोलायची .खरे खोटे देव जाणे पण त्याला कोणी विचारले "भीती वाटत नाही का ?" तर "भीतीची सवय झालीय "असेच म्हणून चालू लागायचा .
प्रेतांच्या संगतीत राहून त्याच्या शरीरालाही विशिष्ट वास येऊ लागला होता.आता हरी,बंड्या सारख्या माणसांना तो वास परिचयाचा होता .कारण त्यांनाही अंत्यसंस्काराची हौस होती.कुठे प्रेत झाले म्हटले की हे दोघे तिरडी बांधायला हजर .
गणेशोत्सव जवळ आला होता .अर्थात विष्णूला त्याच्याशी मतलब नव्हते . याचा अर्थ तो देवाला मानीत नव्हता असे नाही पण गणेशोत्सव असला तरी मरायचे कोण थांबतो का ?? आणि हॉस्पिटलमध्ये एक दोन शव पोस्टमार्टेमला येणार हे नक्की होते.
पहिल्यांदा वाईट वाटायचे असे सणासुदीला कोणी मरताना पाहून. पण आपण फक्त त्यांना फाडायचे काम करू शकतो हे मनात पक्के बसल्यावर काहीच वाटेनासे झाले. 
शवागृहात गार्डची ड्युटी कशाला ? ती प्रेत काय पळून जाणार आहेत ? असे ही प्रश्न नातेवाईक विचारायचे .पण ते पळून जाणार नाहीत त्यांना पळवणारे भरपूर आहेत हे अनुभवाने माहीत झाले होते.
उद्या गणपती येणार म्हणून  रस्ते गजबजलेले होते. दुपारी जेवून विष्णू शवागृहात हजर झाला तेव्हा दोन प्रेते त्या टेबलावर झाकून ठेवली होती. 
सवयीने त्याने  शवागृहातील देव्हाऱ्यात बसलेल्या गणपतीला नमस्कार केला आणि पिशवीतील हार काढून त्याला घातला .हातातील पेढ्याचा बॉक्स समोर ठेवला आणि नंतर  प्रेतावरचे पांढरे कापड हटविले.
एक साठीचा वृद्ध तर तरुण स्त्री .
त्या वृद्ध पुरुषाला आधी घे. अटॅकने गेलाय आणि दुसरी कॅन्सरने .साध्या केस आहेत मी येणार नाही गणपतीची तयारी करतोय .अशी डॉक्टरची चिट्टी होती. म्हणजे आता पुढे दरवर्षी डॉक्टरचे काम ही मीच करायचे ?
अप्रान घालून त्याने कवटी कापायला करवत हाती घेतली आणि दार लोटून तो तरुण डॉक्टर आत शिरला.
"आता हा कोण नवीन ?" विष्णूच्या कपाळावर आठ्या पडल्या.
"काका , मी डॉक्टर अथर्व. मोठ्या डॉक्टरांनी सांगितलं तुम्हच्या मदतीला जायला"तो प्रेताकडे बघत तोंड कसेनुसे करत म्हणाला .
"मला मदत ?? अरे , मलाच माहिती नाही किती प्रेतांचे पोस्टमार्टेम केले आहे मी ?"कामात व्यक्तय आल्यामुळे विष्णू चिडला .
"मला शिकायचे आहे पोस्टमार्टेम कसे करतात ते " तो तरुण म्हणाला .
"ठीक आहे ये .पण हीच वेळ मिळाली का ?? उद्या गणपती .म्हणजे आज पोस्टमार्टेम करून उद्या त्याची पूजा करणार का " देव्हाऱ्याच्या दिशेने हात दाखवीत विष्णूने विचारले.
देव्हाऱ्यात गणपतीची मूर्ती पाहून तो तरुण हसला .
"काय काका " इथेही त्याला आणलेच का ?? या असल्या जागेत त्याची पूजा तरी कशी करता ? आणि समोर काय तर ही फाडलेली प्रेत ? कसे जमते हो तुम्हाला ??" डॉ. अथर्व हसत म्हणाला.
"ही पण कामाचीच जागा आहे ना ? इथेच मृत्यूची कारणे शोधली जातात .माणूस आपल्या शरीराची वाट कशी लावतो हे इथेच कळते .तर आत्महत्या आणि खुनाचे वेगवेगळे प्रकार इथेच समजतात आणि त्याचा तपास ही इथे होतो .पण म्हणून काय देवाला इथे आणायचे नाही का ? " विष्णूने प्रश्न केला.
"कबूल ,पण तुम्ही कसे राहता इथे ? आणि तुमच्या घरी गणपती येत नाही का ?" त्या तरुणाने उत्सुकतेने विचारले.
"येतो ना .पण गावी. इथे माझ्या अंगाला येणारा वास पाहून आजूबाजूची माणसे दूर जातात मग हा कसा राहील तिकडे . त्यापेक्षा इथेच त्याची पूजा करतो ," देव्हाऱ्यात पाहून विष्णू म्हणाला . 
"चल आता काम सुरू कर लवकर " असे बोलून दोघेही कामाला लागले. ते काम करताना त्या तरुणाला मळमळून येत होते .शेवटी एकदाचे काम संपले .
"चला निघतो मी. हात जोडून तो तरुण म्हणाला आणि दरवाजाच्या दिशेने चालू लागला .
"डॉक्टर अथर्व , खणखणीत आवाजात विष्णूने हाक मारली .तिकडे कुठे चाललात .तुमची जागा सोडून ?"
अथर्व वळला त्याच्या नजरेत आश्चर्य होते.विष्णूचे हात देव्हाऱ्याकडे होता .
"मी नाही समजलो " तो म्हणाला 
"अथर्व नावाचा कोणीही डॉक्टर या हॉस्पिटलमध्ये नाहीय.नवीन तर मुळीच नाही .पण तू कोण हे ओळखले मी .हार घातलेल्या फुलाची पाकळी अजून तुझ्या कॉलरवर आहे. तर पेढ्याचे कण तुमच्या उंदराच्या तोंडाला लागलेय" सहजपणे विष्णू उद्गारला 
"खरे आहे ,तो मीच आहे .बरीच वर्षे बघतोय तुला .इतरांना तिरस्कारणीय असणारे काम तू करतोयस . तुझ्या अंगाला येणारा वास घेऊन लोक नाके मुरडतात .सुट्टी नाही म्हणून मलाही गावी पाठविलेस . कधी कधी वाटते तुझ्यातील भावना मेल्यात ,एक दगड ,यंत्र बनून राहिलास तू .पण आज ज्या तत्परतेने काम करून त्या माणसाच्या नातेवाईकांनाही मोकळे केलेस ते पाहून खुश झालो मी म्हटले तू काय घरी येत नाहीस मग मीच भेटायला जाईन " टेबलावरील गृहस्थाच्या प्रेताकडे बोट दाखवून तो म्हणाला .
"पण मला पाहून तुला काहीच वाटले नाही का ?? भीती आनंद ?? " अथर्व आश्चर्याने म्हणाला 
" काय वाटणार .मुदड्यांच्या सहवासात राहतो मी .मला भेटणारा जिवंत आहे की मुडदा हे एका नजरेत ओळखतो .तुझे वेगळेपण आत शिरताच जाणवले. थोडा वेळ का होईना एक प्रसन्न वातावरण इथे निर्माण झाले. पण माणूस ही नाही भूत ही नाही मग तिसरा कोण असणार हे कळले मला "हात जोडत विष्णू म्हणाला "बरे झाले रोज रोज त्या भुतांशी बोलून कंटाळा आलेला आज तू भेटलास".
त्याला आशीर्वाद देत अथर्व निघून गेला .
तिकडे गावी तो विष्णूच्या घरात शिरताच अचानक काही लोकांनी नाक मुरडली हे त्याच्या लक्षात आहे .
विष्णूच्या मुलाने तर "आये बाबा इले की काय ?" असे ही विचारले .
"आता मेलेल्यांचे शरीरही फाडायला लागलात तुम्ही " दोन्ही हाताने नमस्कार करीत त्याच्या शेजारचा उंदीर ओरडला ."हीच कामे करायला येता का इकडे .तुमच्या सोबत राहून हे असे काही पहायची पाळी येईल असे वाटले नव्हते आणि यावेळी त्याने तुम्हाला ओळखलेच ना " उंदराच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला.
"काय झाले रे, त्याला मदत केली तर.समाजात मोजकीच माणसे आहेत अशी कामे करणारी.दिवसरात्र, सणवार न पाहता त्यांना असली कामे करावी लागतात .कधीकधी त्यांच्याच जवळच्या नातेवाईकांचे पोस्टमार्टेम करावे लागते .त्यांच्या कामामुळे आणि वासामुळे लोक दूर पळतात. तर ते आपल्याजवळ येत नाहीत म्हणून मीच त्याच्याकडे गेलो आणि हो, या पुढे काहीही खाल्यावर तोंड व्यवस्थित पुसत जा .त्याने पेढा ठेवल्यावर पटकन तोंडात घातलास मला तयारीसाठी वेळ ही दिला नाहीस " रागाने उंदराकडे पाहत तो म्हणाला आणि तबकातील मोदक खात समोरच्या भक्तांना आशीर्वाद देत बसला.
© श्री.किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment