Sunday, July 16, 2023

मुंबईकर आणि लग्न

मुंबईकर आणि लग्न 
च्यायला, ह्या मुंबईच्या गर्दीत नीट चालता येत नाही आणि त्यात आमच्या म्हातारीला घेऊन जायचे म्हणजे डोक्याला ताप. त्यात आम्ही पडलो लोकलवाले .म्हणजे 8.40 पकडायची घाई.फास्ट चालायची सवय .सवयीप्रमाणे तिलाही लोकलने घेऊन जायचे ठरवले पण पोरगा ओरडला. म्हणतो ओला करून जा .त्यानेच बुक करून दिली .
काय म्हणता ही म्हातारी कोण ? आहो, आमच्या मातोश्री.नाही.. नाही सौ.ला म्हातारी म्हणण्याचा विचार मी स्वप्नातही करू शकत नाही . तुमच्या मनात असा विचार येतोच कसा ? त्या दिवशी नुसते तिला म्हटले पोरगा मोठा झालाय आता आपण म्हातारे होऊ .तर दोन दिवस डब्यात कारल्याची आणि शेपूची भाजी दिली हो. राहू दे तो वेगळा विषय झाला .
तर मी कुठे होतो ? आईला घेऊन लग्नाला निघालो होतो.आहो, नाना सावर्डेकरच्या मुलीचे लग्न होते.त्या दिवशी पत्रिका द्यायला घरी आला आणि समोर मातोश्री.ती नुकतीच गावावरून आली होती. मग काय ? नाना पाहिले दहा मिनिटे डोळ्यातून पाणी काढीत होता.
नाना मुंबईत आला तेव्हा आमच्या म्हातारीनेच तीन वर्षे आमच्याकडे ठेवून घेतला होता त्याला .काही पैश्याची बोलणी नाही कसली लिखापढी नाही.नाना जे काही देत होता ते ती घेत होती. त्यानंतर त्याने भाड्याने खोली घेतली ,लग्न केले मग हळूहळू संबंध कमी होत गेले . पण दोघेही एकमेकांचे नाव काढतात हो .
पोरींचे लग्न म्हणून नाना खुश होता.त्याने आईला घेऊनच जायची तयारी दाखवली पण त्याच्या उत्साहाला मी आवर घातला .लग्नघरात तिला कुठे सांभाळणार ,तिचे पथ्यपाणी ,औषधे वेळेवर द्यायला हवे असे सांगून त्याला गप्प केले .सौची नजर पाहून नंतर घडणाऱ्या प्रसंगाची मानसिक तयारी ही केली.
लग्नाच्या दिवशी विचार केला दुपारी हाफडे जावे. पण दुपारी कधी नव्हे ते पोटभर जेवून ऑफिसमध्ये झोपाल त्यापेक्षा सुट्टी घ्या असा सल्ला सौने दिला.अर्थात माझ्यापेक्षा तीच मला चांगली ओळखते म्हणून मुकाटपणे सुट्टी टाकली.
पोराने बुक केलेली ओला दारात आली तरी म्हातारीची तयारी नाही.8.40 चुकली आणि 8.44 लेट झाली की जशी चिडचिड सुरू होते तशी माझी झाली .पण सौने ऑफिस नाही तर लग्नाला जातायत अशी आठवण करून दिली .
शेवटी त्या ओलामध्ये बसून म्हातारीच्या जुन्या आठवणी ऎकत हॉलमध्ये पोचलो.नानाने लग्नासाठी खूप पैसे खर्च केले आहेत हे हॉल पाहूनच लक्षात आले. हा मोठ्ठा दोन मजली हॉल. खाली जेवण तर पहिल्या मजल्यावर स्वागत समारंभ.
आम्हाला पाहताच नाना खुश झाला .नानांची बायको तर धावत येऊन आईच्या मिठीत शिरली.थोडा वेळ डोळ्यातून पाणी काढणे झाले. नानांची पोरगी वधूवेशात सुंदर दिसत होती .आमच्याकडे पाहून हसल्यासारखे केले आणि त्या मेकअप करणाऱ्या बाईला सूचना देऊ लागली. बाजूचा फोटोग्राफर तिचे फोटो घेत होता .नानाने तीनदा सांगितल्यावर त्याने चेहऱ्यावर त्रासिक भाव आणून आमचा फोटो काढला ."अरे चेडवाक घे फोटोत "असे मातोश्री म्हणताच "नको माझी तयारी चालू आहे नंतर काढू" असे उत्तर तिने दिले.
मी हॉलमध्ये कोपऱ्यात एक खुर्ची पाहून आईला बसविले पण नानाने आग्रह करून तिला पहिल्या रांगेत सोफ्यावर बसविले.हॉलमध्ये तीन ठिकाणी सेल्फी पॉईंट होते .सगळीकडे ही गर्दी .सगळे हातातील मोबाईलवरून फक्त फोटो काढीत होते.
हे काय ?? नवरा नवरी मंडपात आले पण त्यांचेही तिथेच फोटोशूट सुरू ? आहो विधी करायचे आहेत ना ?? 11.32 चा मुहूर्त आहे 11 तर इथेच वाजले .अक्षता वेळेवर डोक्यावर पडायला हव्या.
शेवटी मनसोक्त फोटो काढून झाल्यावर पुढचे विधी सुरू झाले.नवरा नवरीने एकमेकांच्या गळ्यात हार घातले तेव्हा बरोबर 11.50 झाले होते. सर्व विधी पार पडले आणि नवरानवरी फोटोशूटमध्ये मग्न झाले. आता नाना दिसेनासा झाला होता .ओळखीचे कोण दिसत नव्हते म्हणून आईला जेवायला घेऊन गेलो.
खाली जेवायला ही गर्दी.
तिथेही सेल्फी पॉईंट. 
सुरवात कुठून होतेय तेच कळत नव्हते. शेवटी तो डिश देणारा सापडला .अरे देवा.. सॅलडचे आठ दहा प्रकार होते.नंतर दहा ते बारा प्रकारचे पदार्थ मुख्य जेवणात.
मोजकेच पदार्थ डिशमध्ये घेऊन आईला दिले तर तिने "अरे तो पिझ्झा आण मला "अशी ऑर्डर दिली.मी चमकून पाहिले तर खरेच एक माणूस पिझ्झा खात होता.मी पिझ्झाच्या शोधात निघालो तर पुढे अजून काही काउंटर होते त्यावर वेगवेगळे पदार्थ होते .पावभाजी, डोसे, पाणी पुरी,इडली ,सँडविच अजून बरेच काही .मी पिझ्झा घेऊन आईला दिला.खरे तर इतके पदार्थ पाहून माझी भूकच मरून गेली. म्हातारी एका जागेवर बसून मला ऑर्डर सोडत होती. च्यायला लोक म्हणतील हा पोरगा आईला जेवायला घालत नसेल . 
शेवटी तिचे जेवून झाले आणि डिश ठेवायला गेलो .तिथे लोकांच्या भरलेल्या डिश कचऱ्यात जाताना पाहून मन उदास झाले.
आहो ते सँडविच बाहेर कमीतकमी पंचवीस रुपयाला मिळते ते तुम्ही पोट भरले म्हणून फेकून देतायत हे पाहून चीड आली. आणि हे काय अजून फोटोसेशनच सुरू .आता ही आत कधी जातील कपडे बदलून कधी येतील .स्वागत समारंभतर तीन वाजता संपणार.लोकांनी बघा जेवून रांग लावल्या आहेर देण्यासाठी आणि हे फोटोच काढतायत .
मी बाजूला गप्प बसून म्हातारीचे लग्नावरचे लेक्चर ऐकत होतो. आमच्या वेळी असा काय नव्हता हो असे दर चार वाक्यानंतर येत होते.मध्येच माझ्या लग्नात त्यांचे कसे अपमान झाले हे ही कळत होते.देवा हिला पंचवीस वर्षांपूर्वीच्या गोष्टीही अजून आठवतायत मग सौ ला काय काय आठवत असेल ?? ही संध्याकाळ बहुतेक अशीच जाणार तर ?
हुश्शह .. आले बाबा शेवटी नवरा नवरी स्टेजवर .दोघेही आधुनिक पोशाखात सुंदर दिसत होते .
अरे पण हे काय ? सर्वाना थांबून पुन्हा स्टेजवर फोटो सेशन सुरू .आता तर रांगेतील लोकांनी खुर्च्या आणून त्यावर बसले.तर बरेचजण सतत घड्याळाकडे पाहून मूकपणे निषेध व्यक्त करू लागले. 
मी ही चुपचाप रांगेत उभा राहिलो. माझ्या पुढ्यातील सुंदर स्त्री आपल्या मैत्रिणीला सांगत होती जेवणात पन्नास पदार्थ ठेवले म्हणून हवे तसे वागायचे नसते आम्हालाही बाहेर कामे आहेत आणि फुकट काही खात नाही आहेर देणार आहोत. हे ऐकून मी बाकीच्या इतर स्त्रियांकडे लक्ष वळविले.
थोड्या वेळाने आहेर सुरू झाले तर दुसऱ्या बाजूने भलतीच माणसे घुसून आहेर देऊ लागली.आहेरची रांग नियंत्रित करणाराही कोणाला जाऊ देत नव्हता . शेवटी हॉल खाली करण्याची पहिली घंटा झाली .
मी रांग सोडून बाहेर आलो आईला म्हटले नानाला भेटून येतो .नानाला भेटून त्याच्या हाती आहेर दिला .ते पाहून नाना कसेनुसे हसला .गर्दीतून बाहेर आला आणि आईला दरवाज्यावर भेटला .
"बरा वाटला हो तुका भेटून "असे डोळ्यात पाणी आणून म्हणाला .
"नाना खूप मोठा हो .ह्या तुझ्या डोळ्यातील पाणीच माका खेचून आणता बघ "असे बोलून आईने त्याच्या डोक्यावर हात ठेवला.समोर आलेल्या टॅक्सीत बसून आम्ही घरी निघालो.
© श्री.किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment