Saturday, July 22, 2023

हुकूमशाही

हुकूमशाही
खरे तर ते गाव जणू सरकारने वाळीतच टाकल्यासारखे होते.गावात सर्व काही होते पण कोणाचा कंट्रोल नव्हताच .पोलीस नावालाच .कायदे कानून सगळे धाब्यावर बसविलेले होते. गावात बदली घेऊन आलेला कोणताही सरकारी अधिकारी महिन्याभरात बदली घेऊन जायचा किंवा नोकरी सोडून द्यायचा.
यावेळी तर जिल्ह्याधिकारीच सोडून गेला होता .आता नवीन कोण येणार याचीच चर्चा चालू असताना कार्यालयासमोर एक मर्सिडीज उभी राहिली.सगळेजण आश्चर्याने पाहू लागले.यावेळी गाडीवर लाल दिवा नव्हता .
गाडीतून एक उंच कृश भेदक डोळ्यांची व्यक्ती उतरली .अंगावर कोट आणि डोक्यावर फेल्ट हॅट  शोभून दिसत होती. गाडीतून उतरताच त्याने आपली थंडगार नजर सर्वांवर फिरवून घेतली आणि ऑफीसमध्ये शिरला .
केबिनमध्ये शिरताच त्याने आपल्या खुर्चीच्यावर  भिंतीवर टांगलेल्या महापुरुषांची चित्रे खाली उतरवायची ऑर्डर दिली.
"पण सर, प्रोटोकॉल आणि वरून ऑर्डर आहे हे फोटो लावायची "एक क्लार्क हळूच पुटपुटला .
"तसे बरेच प्रोटोकॉल आणि ऑर्डर असतात .त्या सर्वच पाळतात का तुम्ही ? "त्याच्या आवाजात धार होती."जोपर्यंत मी आहे तो पर्यंत मी म्हणेल तेच होईल इथे." काही न बोलता क्लार्कने मान डोलावली .
त्याचा तो दिवस गावात फेरफटका मारण्यातच गेला .सगळीकडे नुसती धूळ ,कलकलाट दिसत होता .तो  फक्त हे नजरेने टिपत होता.
दुसऱ्या दिवशी गावात शंभर तरुणांची एक तुकडी हजर झाली.
"हे माझे अंगरक्षक आणि खाजगी पोलीस आहेत .याना कोणी विरोध करायचा नाही ".अशी सूचना सगळीकडे गेली.
त्याच दिवशी संध्याकाळी प्रत्येक घरातील टीव्ही बंद झाला .सगळ्यांना कळेना काय झाले अचानक .केबल ऑपरेटरला फोन केला तेव्हा वरून ऑर्डर आहे संध्याकाळी साडेसहा ते साडेनऊ पर्यंत टीव्ही बंद राहील.
"अरे ही काय दादागिरी !"असे म्हणत सगळ्या स्त्रियांनी त्याच्याकडे जायचे ठरविले.
दुसऱ्या दिवशी नऊच्या ठोक्यालाच तो ऑफिसमध्ये हजर होता.
"साहेब का म्हनुन आमचा टीव्ही बंद केलासा "एक तरुण स्त्री मान खाली घालुन पुटपुटली.
"काय ही भाषा ?तो कडाडला. "किती वर्षे झाली स्वातंत्र्य मिळून ? अजून हीच भाषा .घरी आपापसात ठीक आहे पण चारचौघात व्यवस्थित बोलता आले पाहिजे.आणि मान खाली घालुन काय पुटपुटता .हक्कासाठी आलात तर जोरात बोला.मी टीव्ही बंद केलाय तुमचा .जा कोणाकडे जायचेय तिथे जाऊन तक्रार करा .काय मिळते हो तुम्हाला टीव्ही बघून ? त्याच सासू सुनेच्या भानगडी ,अबला नायिका वरचढ होणारी नणंद ,दिर , त्यांची कारस्थाने ,चहात साखर ऐवजी मीठ , भाजीत मसाला जास्त टाकणे हेच बघायचे असते ना तुम्हाला. त्यातच खुश होणार का तुम्ही. कुटुंबातील भानगडी किती दिवस बघणार .स्वावलंबी बना ,नविन काहीतरी पहा "तो चिडून बोलत होता .
"पन आम्ही काय करणार "? ती घाबरून म्हणाली.
"व्यायाम करा, लढायला शिका , मुलांशी बोला ,जगात काय घडते ते पहा त्याचा फायदा आपल्याला कसा होईल याची चर्चा करा. आज संध्याकाळी माझी माणसे गावात फिरतील ते मुलांना फिटनेस शिकवतील तुम्ही ही शिका,पण कोणाकडे टीव्ही चालू दिसला तर चोप ही देतील. गावातील रस्ते उद्यापासून साफ होतील.नवीन विहिरी खणल्या जातील ,पाईपलाईन तयार होईल .प्रत्येकाने ठराविक रक्कम जमा करा ".
"पण हे सगळे सरकार देते ना ?आम्ही का  पैसे भरायचे "?एक पुरुष पुढे येऊन म्हणाला . 
"फुकट काही मिळणार नाही तुम्हाला .इथे मीच सरकार आहे .काहीतरी रक्कम भरावीच लागेल. फुकट मिळते म्हणूनच माजला आहात तुम्ही."तो आपली थंड नजर सर्वत्र फिरवीत म्हणाला .
दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच गावातील वातावरण बदलू लागले . रस्ते दुरुस्त करायला सुरुवात झाली, पडकी घरे पैसे भरून दुरुस्त होऊ लागली. शाळेत मुलांसोबत आयाही जाऊ लागल्या. जो विरोध करेल त्याला काठीचा प्रसाद मिळू लागला. गावात सोयी मिळत होत्या पण मनासारखे स्वातंत्र्य मिळत नव्हते.
त्या दिवशी मात्र गावात ठिणगी पेटली. दोन गटाची लोक रस्त्यावर उतरली. काही ठिकाणी दगडफेक चालू झाली .तेव्हा मात्र तो उघड्या जीपमधून बाहेर पडला . त्याच्या अंगरक्षकांना नुसती खूण केली आणि ते दंगलकर्त्यावर तुटून पडले. त्यांच्या तावडीतून कोणीही सुटले नाही ,ना स्त्रिया  ना मुले ना म्हातारेकोतारे प्रत्येकाला काठीचा आणि अश्रूधुराचा प्रसाद मिळाला.
 "ओ साहेब गर्दीत स्त्रिया आहेत , मुले आहेत ," एक गृहस्थ त्याच्या पुढे हात जोडत म्हणाला .
"मुले, स्त्रिया रस्त्यावर का आले ? त्यांनी दंगलीत भाग घ्यायचे कारण काय ? अश्यावेळी कोणीही शहाणा माणूस घरी बसेल की दंगलीत दगड मारायला येईल " तो हातातील काठीने त्याला मारीत म्हणाला . तासाभरात दंगल आटोक्यात आली .
आता महिना उलटून गेला .तो म्हणेल त्याप्रमाणे गाव वागत होते.गावातील लोकांसाठी उत्कृष्ट सुखसुविधा उपलब्ध झाल्या होत्या .स्त्रिया मुले ही हुशार होऊ लागली आणि त्याला बोलावणे आले.
तो आला तसाच आपल्या मर्सिडीजमधून पुन्हा निघून गेला .
देशातील एका प्रमुख शहरातील कॉर्पोरेट ऑफिसच्या रिसेप्शनमध्ये तो ताठ बसला होता. त्याची भेदक नजर समोरच्या भिंतीवर खिळून होती. गेला अर्धा तास तो समोरच्या भिंतीवर काय पाहतोय हाच प्रश्न त्या रिसेप्शनिस्टला पडला होता.
 त्याचवेळी हातातील साखळी बोटाने गरगर फिरवीत श्री .यशवंत महादेव राज याचे आगमन झाले . त्यांच्या मागे नेहमीप्रमाणे सेक्रेटरी श्री.चिंतामणी त्रंबक गुप्त हातातील लॅपटॉप सावरत धावत होते.ऑफिसमध्ये शिरताना त्यांनी त्याच्याकडे पाहिले आणि निराशेने मान डोलावली.
आत शिरताच थोड्याच वेळाने त्याला बोलावणे आले. "या साहेब,तुम्ही घातलेला घोळ समजला आम्हाला .इथे येऊन ऐंशी वर्ष होत आली तरी तुमचा स्वभाव काही बदलला नाही.अनेक वर्षे तुम्ही पॅरोलची सुट्टी मागत होतात म्हणून यावेळी दया येऊन तुम्हाला चाळीस दिवसाची रजा मंजूर केली तर त्या गावात जाऊन हुकूमशाहीच चालू केली तुम्ही "श्री यमराज हात जोडून उपहासाने म्हणाले.
"त्या देशाला लोकशाहीची नाही तर हुकूमशहाची गरज आहे. पंच्याहत्तर वर्ष झाली स्वातंत्र्य मिळवून पण देशाचा विकास नाही . गरिबी वाढतेय ,मुलांना स्त्रियांना शिक्षण नाही .वाहतुकीला रस्ते नाहीत. देशातील एका भागात पूर येतात पण दुसऱ्या भागात प्यायला पाणी नाही. स्त्रियांना हलकी वागणूक दिली जातेय भर रस्त्यात विटंबना होतेय आणि आरोपी मोकाट सुटलेत. लोकशाही फक्त निवडणूक घेण्यासाठी आहे .या देशाचा विकास करायचा असेल तर माझ्यासारख्या हुकूमशहाच हवा " तो जोशात बोलू लागला .
" पुरे ..! तुझ्यामुळे काय काय भोगावे लागले याची कल्पना तरी आहे का ? दुसऱ्या महायुद्धामुळे जग दहा वर्षे मागे गेले. तू केलेल्या हत्याकांडामुळे आमच्या कित्येक दूताना बोनस इंसेंटिव्ह द्यावा लागला .ह्या चित्रगुप्तांची सगळी कॅलक्युलेशन बिघडली.साठ लाख लोकांच्या हत्येचे आरोप तुझ्यावर आहेत आणि म्हणून तुला आयुष्यभर कारावासाची शिक्षा दिली आहे. तेव्हा श्री.एडॉल्फ हिटलर हा  तुमचा ड्रेस घ्या आणि पुन्हा तुरुंगात चला". श्री यमराज हात जोडून म्हणाले.
तो शांतपणे उठला . समोरचा घडी केलेला लष्करी युनिफॉर्म उचलला आणि ताठ मानेने उभा राहून म्हणाला "मी एडॉल्फ हिटलर जर दहा वर्षात माझ्या देशाचा विकास करू शकतो तर तुम्ही सत्तर वर्षात का नाही करू शकत .आज खरोखरच या देशाला हुकूमशहाची गरज आहे .
थोड्या वेळाने पूर्ण लष्करी युनिफॉर्ममध्ये तो ऑफिस बाहेर पडला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर वेगळेच तेज विलसत होते .
© श्री.किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment