Tuesday, July 19, 2016

अजिंक्य

तो नेहमीच हळू वर्गात यायचा. त्याची उपस्तिथी कधी जाणवलीच नाही.सोडलेला हाफ शर्ट, ढगळ पॅन्ट,   खांद्यावर शबनम बॅग अश्या एखाद्या पत्रकाराच्या अवतारात तो असायचा,मोजकेच मित्र. अजिंक्य सिद्धये असे कधीही न ऐकलेले आडनाव. कधी lectures लवकर संपली तर हा कधी निघून जायचा कोणाच्या लक्षातही कधी यायचं नाही. आम्ही आपले टिंगलटवाळ्या करत थांबायचो. पण हा कधीच आम्हाला join व्यायचा नाही. हा मात्र सरळ घर गाठणारा इसम.

आम्ही वर्गातली टारगट पोरं पण ह्याच्या चेहऱ्याकडे बघून खेचायला जात नव्हतो. कशाला गरीब बिचार्याची चेष्टा करा असे म्हणून  सोडून द्यायचो. आमचे बरेच उद्योग चालायचे. पण हा मूकपणे आमच्या कारवायांना पाठिंबा द्यायचा. सिद्धये इथे सही कर म्हटल्यावर हा सही करणार. स्वतः कधीच प्रत्यक्ष सहभागी नसायचा पण आमच्यावर खूप विश्वास होता त्याचा. त्यामुळेही कोणी त्याची थट्टा केली नाही.

कॉलेज संपले आणि प्रत्येकाने आपापला मार्ग निवडला. तरीही आमच्या ग्रुप चा एकमेकांशी संपर्क होताच. पण हा मात्र पूर्णपणे विस्मरणात गेला. काय करतो हे कळलेच नाही. आणि एक दिवस व्हाट्स अॅप ग्रुप स्थापन झाला, मग कोणीतरी याचा नंबर दिला आणि हा ग्रुप मधे ऍड झाला. नंतर फेसबुक वर पण contact झाला. त्यानंतर कळले कि हा क्लासेस घेतो. ९ वि आणि  १० च्या विद्यार्थ्यांना शिकवतो. अरे वा!! त्याच्या स्वभावाला साजेसाच मार्ग मिळाला तर!

पण हा अबोल असणारा माणूस आता व्हॉट्स अॅप आणि फेसबुक च्या माध्यमातून मोकळा होत होता. आणि अजूनही आमच्या कार्याला पाठिंबा देत होता. अर्थातच प्रत्यक्ष हजर कधीच नसतो. आम्हीही त्याला ओळखतो. त्यामुळे force कधीच करत नाही. पण प्रत्यक्ष सहभागी झाला तर सर्वांनाच आनंद होईल हे निश्चित. पण आमच्या या कार्याला नेहमीच पाठिंबा असतोच.

खरेच आज २५ वर्षानंतरही जराही बदलला नाही तो. आपल्या तत्वांशी कधीही आणि जराही तडजोड केली नाही. आजही शिक्षणक्षेत्राच्या बाजारात अतिशय निष्ठेने आणि प्रामाणिकपणे आपले काम करतोय.  कॉलेज संपल्यानंतर अजूनही आम्ही एकदाही भेटलो नाही पण व्हॉट्स अॅप आणि फेसबुकमुळे तोच जिव्हाळा जाणवतो. आज गुरुपौर्णिमा..... आणि म्हणूनच या देशाचे सुजाण नागरिक घडविण्यात मोलाचा वाटा उचलून मदत करणाऱ्या माझ्या या मित्राला त्रिवार वंदन !!! ईश्वर तुला आणि तुझ्या कुटुंबियांना उदंड आयुष्य देवो...!

No comments:

Post a Comment