Tuesday, July 5, 2016

कृष्णा बोरकर

     साल १९७७.... नाट्यक्षेत्रातील फिल्मफेअर समजला जाणारा नाट्यदर्पण सोहळा रवींद्र नाट्य मंदिरात चालू होता. त्यावेळी अतिशय कमी बक्षीस समारंभ साजरे होत.  त्यामुळे नाट्यदर्पण ला एक मानाचे स्थान मराठी रंगभूमीवर होते.
      अतिशय प्रतिष्ठेच्या या सोहळ्याला सगळी मराठी नाट्यसृष्टी उपस्थित होती. सगळ्यांना उत्सुकता होती ती  या वर्षीच्या "मॅन ऑफ  द इयर "या प्रतिष्ठेच्या पुरस्कारावर कोण आपली मोहर उमटवितो याची. कारण हा पुरस्कार कोणाला मिळणार याची कल्पना फक्त आयोजकानाच असे. बाकी कोणालाही माहित नसे.
आणि...... अचानक रंगमंचावर काळोख झाला.
      थोड्यावेळाने एक स्पॉट लाईट एका गृहस्थावर स्थिरावला. आयोजक त्या गृहस्थाला स्वतः रंगमंचावर घेऊन आले.  सडपातळ देह, जाड भिंगाचा चष्मा, अत्यंत साधी रहाणी असे रंगभूषाकार  श्री. कृष्णा बोरकर भांबावलेल्या अवस्थेत रंगमंचावर उभे होते. त्या वर्षीच्या मॅन ऑफ द इयर पुरस्कारासाठी त्यांचीच निवड झाली होती. मराठी रंगभूमीवरच्या इतिहासात पहिल्यांदाच एका पडद्यामागील कलाकाराचा इतका मोठा गौरव नाट्यदर्पणने केला होता.त्यामागची  कारणेही तशीच होती.
      प्रा. मधुकर तोरडमल यांचे "गुड बाय डॉक्टर" हे नाटक रंगभूमीवर तुफान चालत  होते आणि त्यामध्ये तोरडमलांची रंगभूषाकार बोरकरांनी केलेली रंगभूषा हा चर्चेचा विषय बनली होती. रंगमंचावर डॉक्टरांची  एन्ट्री होताच प्रेक्षकातून किंकाळ्या उमटत इतकी हिडीस चेहऱ्याची  रंगभूषा बोरकरांनी केली होती.डॉक्टरांचे कुबडेपण, त्यांचे  पुढे आलेले दात, चेहऱ्यावरचं व्रण हे इतके हुबेहूब होतं की प्रेक्षक घाबरून जायचे. प्रक्षकांमधून किंकाळ्या ऎकू येत. त्यांच्या ह्या रंगभूषेला दाद म्हणूनच त्यांना  हा प्रतिष्ठेचा पुरस्कार त्यांना देण्यात आला आणि मुख्य नाट्यदर्पणने हे जे पाऊल उचलले त्यामुळे पडद्यामागील कलाकारांचे  योगदान व कष्ट सर्वांच्या लक्षात येऊ लागले आणि त्यानंतर पडद्यामागील कलाकारांनाही पुरस्कार देणे चालू झाले.

No comments:

Post a Comment