Saturday, July 9, 2016

पालखी

" साहेब ,मी तुमच्याकडे रजा मागण्यासाठी किंवा मंजुरीसाठी आलो नाही तर मी रजेवर चाललोय हे सांगायला आलोय " आमचा प्रमुख आणि अनुभवी  मेक्यानिक  शंकर माझ्या नजरेला नजर देत बोलत होता .मला नकळत हसू आले कारण हेच सर्व मी संध्याकाळी निघताना माझ्या साहेबांशी बोलणार होतो  फक्त नजर खाली ठेवून .होळी जवळ आली होती आणि आम्ही दोघेही कोकणातले .कोकणातील लोकांचे होळीवरील प्रेम जगजाहीर आहे .वर्षभर आपण ज्या देवाची मंदिरात जावून पूजा करतो तोच देव होळी पौर्णिमेनंतर स्वतःच्या घराबाहेर पडून गावातील प्रत्येक घरात जावून त्यांचे आदरतिथ्य स्वीकारतो .त्याला पालखीत बसवून वाजतगाजत नाचवत आणले जाते .त्याची पालखी खांद्यावर घेवून आपल्या घरी आणणे हे मानाचे समजले जाते .पालखी खांद्यावर येताच कोकणवासीय अतिशय भावूक होतात .प्रत्यक्ष देवालाच खांद्यावर बसवून घरी आणतोय हि भावनाच मनात आणून पहा आणि सांगा काय वाटते ? त्याला घरी आणून खणानारळाने ओटी भरली जाते .त्याला भेटवस्तू अर्पण केल्या जातात .प्रत्येक रहिवासी आपल्या ऐपती प्रमाणे त्याचे आदरतिथ्य करतो आणि भरल्या डोळ्याने ,दाटल्या कंठाने पाठवणी करतो .प्रत्येक कोकणवासी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो ,मग तो शंकर असो कि मी .

No comments:

Post a Comment