Monday, July 4, 2016

दीपक

साने गुरुजी उद्यानाच्या कोपऱ्यात आणि सिद्धिविनायक मंदिराजवळच्या जवळ त्याचा टेलिफोन बूथ होता.सरकारने अंध व्यक्तीला दिलेली जगण्याची संधी !! त्याचे नाव आम्हाला माहित नव्हते पण आम्ही अभ्यास करताना त्याचे  जवळपास वावरणे असायचे, खूप बडबड करायचा, आमचा टाइम पास करायचा. कोणीतरी एकदा त्याला दीपक टॉकीजमध्ये चित्रपट पाहताना पहिले होते, तेव्हापासून सगळे त्याला दीपक बोलायचे. खूप चिडायचा. आमचा ग्रुप तर दिवसभर गार्डनमध्येच पडलेला असायचा, मग कधी कधी कंटाळा आला कि हळूच त्याच्याजवळ जाऊन कोणतरी कानात पुटपुटायचा " दीपक में कोनसा पिक्चर लगा है?" आणि दूर पळायचा कारण विजेच्या वेगाने तो आपली काठी फिरवायचा आणि शिव्यांचा पट्टा चालू करायचा. 5 मिनटे हा प्रकार चालू असायचा मग कोणतरी म्हणायचे "चला आता नव्या जोमाने अभ्यासाला सुरवात करू".आमच्या मध्ये असेही काही कलाकार होते परीक्षेच्या पेपरला जाताना ते आधी त्याला चिडवून जायचे. त्याच्या शिव्या खाल्ल्या कि पेपर छान जातो हि त्यांची श्रद्धा. इतके असूनही त्याचे अभ्यास करणाऱ्या मुलांवर प्रेम होते.कधी पोलिस आम्हाला हाकलवून  द्यायला आले कि हा पुढे व्हायचा,आमच्या चांगल्या वर्तणुकीची हमी त्यांना द्यायचा, "अच्छे लड़के है साब, घरमे पढाई के लिये जगह नही इसलिये यहाँ आके दिनभर पढाई करते है" असे सांगून आमची पाठराखण करायचा. कधीतरी कटिंग पाजायचा. कालांतराने आमचा गार्डनशी संबंध तुटला, सिद्धिविनायक मंदीरची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली, भिंत बांधली गेली त्यात त्याचा स्टॉल हि हलविला गेला. काळाच्या ओघात दीपक हि हरवून गेला. आजही तिथून जाताना काही क्षणात सर्व आठवणी डोळ्यासमोर येतात आणि नकळत डोळ्याच्या कडा ओलावतात.

No comments:

Post a Comment