Thursday, July 28, 2016

एका मुलीची गोष्ट

काल रात्रशाळेत स्कूल बॅग वाटपाचा कार्यक्रम झाला. याच निमित्ताने एका सरांशी भेट झाली. एखाद्या सहज भेटीत अगदी सहज बोलता-बोलता काय ऎकायला मिळेल याबद्दल अंदाज बांधणं खरच अवघड.

कोकणातील एका अगदी लहानशा  गावात ते सर कार्य करतात. तिथे कार्य करत असताना आलेले अनुभव ते आमच्याशी share करित होते. जे काही त्यांनी आम्हाला सांगितलं ते फार भयंकर होतं.

कोकणातील मुले खूप हुशार आहेत. त्यांच्यात गुणवत्ता ठासून भरली आहे, पण योग्य मार्गदर्शन मिळत नाही ही खंत आहे. याशिवाय ज्या गावात ते काम करतात त्या गावात मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी पोषक वातावरण नाही. वगैरे वगैरे गोष्टी ते सांगत होते. त्यापुढे ते म्हणाले की कोकणात लैंगिक शोषण हि देखील फार मोठी समस्या आहे. आणि ह्याच मुद्द्याला धरुन त्यांनी एक अनुभव सांगितला, जो ऎकून आम्ही अवाक झालो.

६ वी इयत्तेमध्ये एक मुलगी शिकत होती. तिच्या वर्गावर बाई शिकवायला आल्या तर ती normal असे पण तेच जर सर आले तर अक्षरशः थरथर कापायची आणि अंग चोरून राहायची. तिचा नक्की काय problem आहे हे कोणाच्या लक्षात येत नव्हते. शेवटी त्यासाठी तज्ज्ञांची मदत घेतली गेली आणि जे काही सत्य बाहेर आले ते फारच भयानक होते.

तिच्या आजीने तिला असे सांगितले होते कि परपुरुषाचा नुसता स्पर्श जरी झाला तरी बाई गरोदर राहते. तेव्हा कुणाही पुरूषाला तू स्वतःला स्पर्श करू देऊ नकोस. हे ऎकून सर्वांना धक्का बसला. का तिच्या आजीने तिला अशी आणि इतकी चुकीची माहिती दिली असावी यासाठी अधिक माहिती काढली असता असे लक्षात आले की तिच्या आत्याने आंतरजातीय विवाह केला होता जो  आजीला पसंत नव्हता. त्यानंतर तिची आत्या गरोदरपणात घरी आली होती तेव्हा आजीने तिच्याकडे बोट दाखवून त्या मुलीला हे सर्व सांगितले.

त्या मुलीवर व्यवस्थित उपचार केले गेले, हळू हळू ती सावरली ९ वि मध्ये ती पूर्ण बरी झाली आणि १० वि च्या परीक्षेत ९४% गूण मिळवले.

परंतू, तिचं नशीब चांगलं म्हणून शिक्षकांच्या ही गोष्ट लक्षात आली आणि त्यांनी योग्य ती पावलं उचलून तिला त्यातून बाहेर काढले. पण एक क्षणभर आपण धरुन चालू की समजा शिक्षकांनी पुढाकार घेऊन हे सर्व केलं नसतं तर??? न जाणे अजून किती काळ ती मुलगी चुकीच्या समजूतीतच राहिली असती.

तिच्या आजीचा हेतू स्पष्ट कळतो की, जे त्या मुलीच्या आत्याने केले ते हिने करू नये म्हणून आजीने तिला त्यापासून कायमस्वरूपी परावृत्त करण्यासाठी हे सर्व केले. पण आजीने तिच्या कोवळ्या मनाचा जराही विचार न करता हे सर्व केल्याने तिला किती मानसिक त्रासाला सामोरं जावं लागलं. अशी चुकीची माहिती या वयातल्या मुला-मुलींना देणं म्हणजे त्यांच्या आयुष्याशी खेळण्यासारखंच आहे.

No comments:

Post a Comment