Thursday, July 21, 2016

पॅकेज

विक्रम.... माझा बालपणापासूनचा एक अवलिया दोस्त. त्याचं डोकं नेहमीच इतरांपेक्षा वेगळं चालायचं. बहुधा म्हणूनच आमची दोस्ती झाली असावी. एक एक खूप भन्नाट कल्पना नेहमीच त्याच्या डोक्यात असायच्या. अर्थात सगळ्या समाजसेवेशी संबंधित. पण ज्या कोणाला सुचणारही नाहीत अशा विचित्र.

माझ्या एक मित्राची आई नेहमी बिचारी अंथरुणावर खिळलेली असायची. मित्राला नोकरी सांभाळून आईकडे बघणं म्हणजे त्याची अगदीच तारेवरची कसरत व्यायची. हे सर्व पाहून त्यावरून ह्याला सुचले.

"अरे आपण तिची जबाबदारी घेऊया.  अगदी तिच्या आजारपणात तीची काळजी घेण्यापासून ते अगदी ती गेल्यानंतर तेराव्यावरपर्यंतची सगळी जबाबदारी घेऊ. एक पॅकेज बनवू म्हणजे तुझा मित्र तेवढे पैसे देऊन मोकळा होईल. आपण सर्व करू पाहिजे तर रडायला माणसे देखील आणू." मी म्हटले हे असं सगळं होईल न होईल माहित नाही पण वाजले किती बघ. आता मात्र रडशील तू. असं म्हणून आम्ही हसत निघालो आणि ही गोष्ट विसरूनही गेलो.

पण गेल्या आठवड्यात मित्राच्या आईला ऍडमिट करायला मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा तिथे एक श्रीमंत वृद्ध इसम मरण पावला होता. पण त्याचं जवळचं असं कोणीच नाही हे पाहून बराच वेळाने अगदी न राहवून मी Hospital staff ला विचारले की असे किती वेळ ठेवणार? तर उत्तर आले काळजी करू नका त्यांचे सर्व काही कॉन्ट्रॅक्टवर दिले आहे कुटुंबियांनी. हल्ली सगळीकडे पॅकेज सिस्टीम आहे. आता कंपनीची माणसे येतील आणि ती करतील सर्व.

अरे हा काय प्रकार ???? माझी उत्सुकता वाढली आणि तिथेच थांबलो, काही वेळाने 2 माणसे आली त्यांनी बॉडी ताब्यात घेतली. येतानाच त्यांनी कागदपत्रे आणली होती. सगळे सोपस्कार पूर्ण करून त्यांनी घरच्यांना फोन करून स्मशानभूमीत यायची वेळ दिली. मी त्यांना हा काय प्रकार आहे ते विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की आम्ही लोकांच्या अंतिम पर्वाचे पॅकेज देतो. जसे लोक पिकनिकचे ,लग्नाचे पॅकेज देतात तसे आम्ही मृत्यूच्या विधीचे पॅकेज देतो. बऱ्याच श्रीमंत लोकांना आपले वृद्ध आईवडील ऍडमिट झाल्यास त्यांच्याकडे बघायलासुद्धा वेळ नसतो तसेच त्यांचे निधन झाल्यास अंत्यविधीची तयारी करायलाही जमत नाही आणि माणसेही गोळा होत नाहीत. त्यांच्याकडे पैसा असतो त्यामुळे ते ह्या गोष्टीचे पॅकेज देतात.आमची वेगवेगळी पॅकेज आहेत. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून डिस्चार्ज देईपर्यंत, तर काहीजणांना अंत्यविधीचे, तर काहींना अंत्यविधीपासून तेराव्यापर्यंत अशी वेगवेगळी आहेत.

लोकांकडे पैसा आहे पण रडायला वेळ नाही. आता या मयताला स्मशानात नेले आणि सर्व तयारी केली की यांचे नातेवाईक येतील आणि अग्नी लावून निघून जातील. बाकीची कामे आम्ही करू. मला तेव्हा विक्रमची आठवण झाली 10 वर्षांपूर्वी त्याच्या डोक्यातून निघालेली कल्पना आज सत्यात उतरली होती.

इतक्यात मित्र धावत आला आणि म्हणाला चल रे आईला x ray काढायला घेऊन जाऊ वार्डबॉयला शोध. मी म्हटलं कशाला वॉर्डबॉय पाहिजे आपले माणूस आहे चल आपण घेऊन जाऊ.

No comments:

Post a Comment