Monday, July 11, 2016

हसरे दुःख..भा. द.खेर

अजूनही तो जगातील सर्वश्रेष्ठ विनोदवीर म्हणूनच ओळखला जातो.अजूनही त्याचे चित्रपट टीव्हीवर लागले कि आमची पिढी आणि आधीची पिढी सगळी कामे सोडून त्याच्या चित्रपटाचा आनंद घेतात. अर्धा तास का होईना, तो सर्वाना आपली दुःखे विसरायला लावतो.सर्वाना मनमुराद हसवतो आणि जाता जाता मनाला चटका लावूंन जातो.

लोकांना नेहमी त्याच्या चेहऱ्यावरचे बालिशपण, निरागसता दिसते पण त्यामागचे दुःख कोणालाच दिसत नाही. त्याने त्याच्या आयुष्यातील सगळ्या गोष्टी पडद्यावर विनोदीरूपाने सादर केल्या. त्याच्या बेकरीतून पाव घेऊन पळण्याला लोकांनी हसून हसून दाद दिली पण ह्या पावासाठी त्याने किती संघर्ष केलाय याची जाणीवहि लोकांना नाही.

वयाच्या अवघ्या 5 व्या वर्षी आईचा गाण्याचा कार्यक्रम बंद होऊ नये म्हणून त्याने रंगमंचावर प्रवेश केला आणि कायमचा जोडला गेला. त्याने जगाचे आधुनिकरण होताना माणुसकी कशी हरवते ते दाखवले, तर एका हुकूमशहामुळे जग दुसऱ्या महायुद्धच्या खाईत कसे लोटले गेले आणि सामान्य माणसाचे किती हाल झाले तेही दाखवले. अंध मुलीवर जीवापाड प्रेम करणारा रस्त्यावरचा गरीब माणूस उभा केला आणि तिला दृष्टी आल्यावर त्याला पाहून तिला बसलेला धक्काहि सहन केला.

होय.... तोच तो महान विनोदवीर "चार्ली चॅप्लिन". आज त्याच्या आयुष्यावरचे भा. द. खेर लिखीत "हसरे दुःख " पुस्तक वाचताना आपण किती खुजे आहोत हे जाणवते.चार्लीचे कष्टमय आणि हलाखीचे बालपण, अविरत कष्ट करणारी आणि मधूनच वेडयाचे झटके येणारी आई,जीवापाड प्रेम करणारा त्याचा सावत्र भाऊ यांच्या पाठिंब्यावर चार्ली उभा राहिला. या गरिबीतही त्याच्या आईने योग्य संस्कार केले, त्याला माणूस म्हणून जगायला शिकवले.

प्रसिद्ध माणसे पुष्कळ आहेत, पण अजरामर माणसे फारच कमी आहेत. आज चार्ली त्याच्या अभिनयामुळे विनोदवीर म्हणून अजरामर झालाय पण त्यामागे त्याच्यावर झालेले संस्कारही फार महत्त्वाचे आहेत. माझ्या मुलाला चार्ली चॅप्लिन कोण हे माहित नव्हते म्हणून त्याचा प्रसिद्ध "द ग्रेट डिटेक्टर" टी व्ही वर चालू झाला तेव्हा मी त्याला माझ्या बाजूला बसवले आणि जमेल तितकी त्याची माहिती त्याला सांगितली. त्याला जमेल तितका चित्रपट पाहायला लावला.आमच्याकडून तरी ह्या महान विनोदवीरासाठी हेच करू शकतो.

No comments:

Post a Comment