Sunday, July 12, 2020

लॉकडाऊन ....११

लॉकडाऊन ..११
बातम्यांमध्ये यावर्षीची वारी रद्द होणार अशी बातमी पाहिली आणि तो जेवता जेवता उठून उभा राहिला. एक निराशा त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून आली.
अरे रे ....चक्क वारी रद्द .. काय परिस्थिती आणलीय या कोरोनाने.
तो पंचवीस वर्षाचा उमदा तरुण.वडील उद्योगपती...त्यामुळे पैश्याची कमतरता नव्हती. दोन वर्षांपूर्वी घरच्या बिझनेसमध्ये वडिलांसोबत काम करायला सुरुवात केली होती . अहोरात्र काम करायचा तो . पूर्णपणे घराच्या व्यवसायात स्वतःला झोकून दिले होते त्याने . वडीलही खुश होते त्याच्यावर.
पण त्याची एक गोष्ट त्यांना फारशी पटत नव्हती.
तो दरवर्षी न चुकता वारीला जायचा.
नाही ...तसा फारसा आस्तिक नव्हता तो. पण वारीला आपल्यातर्फे काही मदत करता येईल या हेतूने जायचा. एक सेवेकरी  म्हणून काम करायचं तो . त्यावेळी मात्र बिझनेस डोक्यातून निघून जायचा आणि वारकऱ्यांची सेवा हेच डोक्यात असायचे . गेली चार वर्षे न चुकता तो वारीत सहभागी व्हायचा . 
पण आज वारी रद्द झाल्याची बातमी ऐकून तो सुन्न झाला . इतक्या वर्षांनी सवय ...ती वारी ..तिची शिस्त ...सेवाभाव अंगात भिनले होते त्याच्या.
बातमी ऐकून त्याचे वडील थोडे खुशच झाले.
"चल मग... या वर्षी ते कॅनडाचे डील फायनल करून टाकू .तू जाऊन ये तिथे .नाहीतरी या लॉकडाऊनमुळे बरीच कामे रखडली आहेत,नुकसान ही भरून येईल .. त्याने काहीच उत्तर दिले नाही . मुकाटपणे पानावरुन उठला .
दुसऱ्या दिवशी मनात बेचैनी ठेवूनच तो ऑफिसला निघाला.सरकारने नुकतीच लोकांना आपापल्या घरी जाण्याची परवानगी दिली होती. 
रस्त्यावर ..मोठ्या मैदानाजवळ सर्वजण गर्दी करून होते . सर्वांना आपापल्या घरी जाण्याची घाई दिसत होती . चेहऱ्यावरची चिंता काही लपत नव्हती.
तो ती गर्दी पाहत गाडी चालवत होता.दोन ठिकाणी त्याला ही अडविले पोलिसांनी पण अधिकृत पेपर असल्यामुळे काही त्रास झाला नाही .
पण गाडी चालवताना तो रांगेत उभ्या असलेल्या कुटुंबाकडे पाहून बैचेन होत होता . त्याच्याही  धंद्यावर परिणाम होणार होताच .पण या लोकांसाठी आपण काही करू शकत नाही याचे जास्त दुःख होत होते.
अचानक त्याचे लक्ष त्या वृद्ध जोडप्यांकडे गेले . चेहऱ्यावरून तरी ते व्यवस्थित वाटत होते .ती वृद्ध स्त्री टिपिकल नऊवारी नेसून तर तो सदरा आणि साधा पायजमा घालून.
"हे मजूर कसे असतील ..?? त्याने स्वतः ला प्रश्न विचारला .तिच्या चेहऱ्यावरील हताश भाव पाहून त्याला राहवेना . गाडी थांबवली आणि त्यांच्याजवळ गेला.
तो वृद्ध थोडा अस्वस्थ दिसत होता . त्याने हळूच वृद्ध स्त्रीला विचारले " आई ...काही प्रॉब्लेम आहे का ...?? कुठे जायचे आहे तुम्हाला ...??
 तसे तिचे डोळे भरून आले ."आम्ही कोकणातले..वैभववाडीचे...ती हळूच म्हणाली . मुलगी परदेशी गेली तिला सोडायला आलो होतो. एकुलती एक मुलगी . पहिल्यांदाच परदेशी गेली नोकरीसाठी . म्हटले आलो तर दोन दिवस फिरून घेऊ आणि जाऊ नंतर घरी . तसेही आता आम्ही दोघेच . पण हे अचानक लॉकडाऊन सुरू झाले. हॉटेलात किती दिवस राहणार . पैसे संपत आले तसे बाहेर पडलो . पण आता नातेवाईकही दूर झाले . काही दिवस गुरुद्वारात राहिलो . आता मिळेल त्या गाडीने पुढे पुढे जाऊ ..."ते ऐकून तो मनातून हलला.
काही दिवस यांची सोय करावी असे त्याला वाटू लागले.आणि त्यांना गाडीत बसवले.
 "चला माझ्याबरोबर... दोन दिवस आराम करा.मग पुढे काहीतरी सोय होईलच ..." तो हळुवारपणे म्हणाला.तसे त्या बाबांनी हात जोडले .
"आहो... तुमच्या मुलासारखा आहे मी चला.." असे बोलून त्यांचे सामान गाडीत टाकत तो ऑफिसला आला.
ऑफिसच्या वरच त्याचा एक फ्लॅट रिकामा होता . त्याने तिथे त्यांची सोय केली . त्यांच्या दोन्ही वेळच्या जेवणाची सोय करून तो संध्याकाळी घरी आला. 
रात्री अचानक त्याचा मोबाईल वाजला . घड्याळात पाहिले तर रात्रीचे दोन वाजले होते.अनामिक भीतीने त्याने फोन उचलला . समोरून ती वृद्धा बोलत होती . "अरे बाळा ...हे बघ कसेतरी करतायत . खूप अस्वस्थ वाटतेय त्यांना. मी काय करू सुचत नाहीय.."
तो तसाच उठला आणि तयारी करून बाहेर पडला . त्याची वेळीअवेळी येण्याजाण्याच्या सवयीमुळे घरच्यांनी लक्ष दिले नाही .तो वेगाने ऑफिसजवळ आला आणि धावतच फ्लॅटमध्ये शिरला .
ते बाबा शांतपणे खुर्चीत बसून होते आणि माई केविलवाण्या चेहऱ्याने त्यांच्या डोक्यावर हात फिरवत होती . त्याने बाबांना आधार देऊन उभे केले आणि हळू हळू खाली घेऊन आला . दोघांना धीर देत त्याने गाडीत बसविले आणि जवळच्या खाजगी रुग्णालयात घेऊन गेला .
पण त्यांना पाहताच डॉक्टरने ऍडमिट करून घ्यायला नकार दिला .पहिली कोरोना टेस्ट करून या मगच ऍडमिट करतो .अशीच उत्तरे त्याला  बऱ्याच खाजगी हॉस्पिटलमधून मिळाली.
पहाटे पहाटे तो नाईलाजाने सरकारी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला . तिथे डॉक्टरांनी चेक केले ..काही नाही प्रेशर वाढले आहे .कदाचित गोळी घेतली नसेल . असे म्हणत त्यांना गोळ्या लिहून दिल्या . माईने मान खाली घालून गोळ्या संपल्यात हे कबूल केले.
त्याने हॉस्पिटलच्या मेडिकल मधून गोळ्या आणि कॅन्टीनमधून चहा बिस्किट्स आणून दोघांना दिला . बाबांना गोळ्या घेताच बरे वाटू लागले.
तो तसाच त्यांना परत फ्लॅटवर घेऊन आला पण गेटवरच सोसायटीचा सेक्रेटरी आणि इतर कमिटी मेम्बर हजर होते . कमिटीने त्यांना आत घेण्यास नकार दिला .  "साहेब ... बाहेरच्या लोकांमुळे सोसायटीला त्रास नको..."ते हात जोडून म्हणाले . त्यांचेही तसे चुकीचे नव्हते . पण आता वाद कोण घालेल असे मनात म्हणत तो चूप बसला . गाडी मागे वळवून तो दोन तीन मित्रांच्या घरी फिरला . पण तिथेही नकारघंटा मिळाली .
"बाळा.. नको आमच्यासाठी तू कष्ट घेऊ. कोणत्यातरी हॉटेलमध्ये आमची सोय कर थोडी पैश्याची मदत कर .गावी गेल्यावर तुझे पैसे पाठवून देऊ .. "बाबांनी त्याच्या खांदयवर हात ठेवून म्हटले. 
"बाबा.. हे लॉकडाऊन किती दिवस राहील ते सांगू शकत नाही.त्यापेक्षा मीच तुम्हाला सोडून येतो गावी . तुम्ही कुठे त्या परमिशन काढीत बसणार ..."? असे म्हणत त्याने परत सरकारी हॉस्पिटलात गाडी आणली.
 पुन्हा डॉक्टरला भेटून त्यांची वैदयकीय प्रमाणपत्रे मिळवली .तेथील योग्य ती कागदपत्रे पूर्ण करून तो इ पास च्या मागे लागला .त्या दोघांचे इ पास मिळाले पण ह्याला काही मिळेना.
 अचानक त्याला वडिलांच्या मित्राची आठवण झाली .ते पोलिसात मोठ्या हुद्द्यावर होते. अजूनपर्यंत त्याने त्याची कधीच मदत घेतली नव्हती . पण आता नाईलाज होता.वडिलांना फोन करून त्याने अडचण सांगितली . सर्व प्रकार ऐकून वडिलांनी मदतीचे आश्वासन दिले आणि  दहा मिनिटात त्याच्या मोबाईलवर इ पास आला . 
त्याने ताबडतोब दोघांना घेऊन प्रवासाला सुरवात केली .  शहरातून बाहेर पडताना त्यांच्या कागदपत्रांची तपासणी झाली पण पुढे त्यांना त्रास झाला नाही . हायवेवर रांगेत गाड्या चालू होत्या तर रस्त्याच्याकडेने शेकडो माणसे चालत होती . काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला बसून माणसे जेवत होती तर पाण्याच्या ठिकाणी चक्क आंघोळ ही चालू होती.  बऱ्याच सेवाभावी संस्था जेवणाची सोय करत होते . लोकांना थांबवून आग्रहाने जेवण देत होते .
"अरे ही तर वारीच आहे .इथला प्रत्येकजण आपल्या हक्काच्या ठिकाणी जात आहे . विठ्ठलाला भेटायची आतुरता जशी वारकऱ्यांच्या चेहऱयावर दिसतेय तीच आतुरता.. घराची ओढ प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसतेय . आणि लोकही किती हौसेने त्यांची सेवा करतायत...".त्याने मनोमन देवाचे आभार मानले आणि मागे बघितले.दोघेही डोळे मिटून देवाचे नामस्मरण  करत होते.
 दोघांना कसलाही त्रास होऊ न देता तो वैभववाडी जवळ आला आणि काही अंतरावरच त्यांची गाडी अडवली गेली .गावात शिरण्यास त्यांना मनाई केली गेली . बाबांनी  हात जोडून आपली ओळख दाखविली तेव्हा  फक्त त्यांनाच चालत जाण्याची परवानगी दिली गेली. मग ह्याने निदान त्यांना घरापर्यंत सोडून तरी येतो असे हात जोडून सांगितले.त्यांची कहाणी ऐकून गावकऱ्यांनाही दया आली.
त्यांनी परवानगी देताच तो दोघांसोबत गावाच्या दिशेने चालू लागला. नकळत त्या वृद्ध दाम्पत्याच्या तोंडून विठ्ठल नामाचा जप सुरू झाला.ते पाहून त्यानेही जप चालू केला .
काही वेळाने ते त्यांच्या घरापाशी आले . तो दारात उभा राहिला ते घरात शिरले . मग दोघांनी ही मागे वळून त्याला आशीर्वाद देण्यासाठी हात उंचावले . जणू विठ्ठल रुखमाई आशीर्वाद देतायत याचा त्याला भास झाला . 
आज खऱ्या अर्थाने त्याची वारी पूर्ण झाली होती .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment