Sunday, July 12, 2020

लॉकडाऊन ..१०

लॉकडाऊन ...१०
"काय साहेब ...!!  सध्या काय चालू आहे ..?? फोनवर  मुलाचा आवाज ऐकताच बाप खुश झाला .
"काही नाही सर...  तुमच्यासारखाच आघाडीवर आहे इथे ....."त्यानेही हसत खेळत नेहमीच्या आवाजात उत्तर दिले.
ते दोघे बाप लेक.
बाप पोलिसात साधा कॉन्स्टेबल तर मुलगा सैन्यात कमांडो तुकडीत.
 बाप सध्या कोरोना असलेल्या एका भागात ड्युटीवर तर मुलगा काश्मीरमध्ये आघाडीवर.
दोघे महाराष्ट्रातील एका छोट्या गावातले.यांचे पूर्वज सगळे सैन्यात आणि पोलिसात.पोरांचा आजोबा तर चीनच्या लढाईत शाहिद झालेला .
आज दोघेही आपापल्यापरीने देशाची सेवा करत होते.
 वेळ मिळेल तेव्हा न चुकता फोन करायचे एकमेकांना.
बापाची बायको म्हणजे पोरांची आई तर  तीन वर्षांपूर्वीच वारली होती आणि पोराचे लग्न व्हायचे होते .त्यामुळे दोघेच एकमेकांचे मित्र बनले होते.
 नेहमी वेळ मिळेल तेव्हा फोन करीत एकमेकांना .आजही तसाच फोन चालू होता.
 "काळजी घ्या साहेब .. .साधे पोलीस आहात तुम्ही. सेफ्टी काही आहे का ...??  तो कोरोना आहे . वय झालेल्याना जास्तच त्रास देतो . तसे तुम्ही तरुण आहात म्हणा.पंचावन्न हे काही वय नाही . पण मास्क नसेल तर रुमाल तरी बांधा आणि मी मागे ठेवून गेलो होतो ते ग्लोव्हज घाला.आणि हो.... तो युनिफॉर्म रोजच्या रोज धुवा .. म्हातारी गेल्यानंतर तुम्ही आळशी झालात खूप ......"पोरगा हसत हसत म्हणाला .
"साल्या बापाची खेचतो का ...?? समोर असतास तर एक लावून दिली असती. .. मी माझी काळजी घेतो रे . मास्क ,सॅनिटायझर .. सगळे व्यवस्थित चालू आहे . युनिफॉर्मचा त्रास आहे रे ...तुझी म्हातारी गेली आणि माझे कपडे मीच धुतो . पण आता या कोरोनामुळे घरी जाण्याची निश्चित वेळ नाही . मग गेल्यावर हा टाकतो पाण्यात आणि दुसरा घालून येतो . मग पुन्हा घरी जातो तेव्हा तो बाहेर निघतो पाण्यातून ..."असे बोलून खो खो हसू लागला .
"काय पिताजी .... तेव्हाच म्हटले गावातल्या आरती काकूंशी लग्न करा . पण ऐकले नाहीत . किती दिवस नुसते तिला बघत बसणार आणि व्हाट्स अप चॅटिंग करणार ....." तो अजून खेचत म्हणाला 
"अरे किती खेचशील बापाची... ,तुला काही काळ वेळ आहे का ..?? इथली परिस्थिती किती गंभीर आहे . लोक घाबरली आहेत..." बाप काळजीने म्हणाला .
"बाबा परिस्थितीचे मला सांगू नका ... इथे रोज मरणाच्या दारात आहोत आम्ही.इथल्या रहीवाश्यांचे चेहरे बघा . रात्री आठ नंतर कोणाच्या घरावर थाप मारली आणि त्यांनी दरवाजा उघडला तर मरणाची भीती काय ते कळते .तिथे तर फक्त रोग आहे इथे रोगही आणि बंदुकीच्या गोळ्याही ...पण जाऊ द्या हो आपण गंभीर बोललो तर परिस्थिती पालटेल का ...?? त्यापेक्षा हसत खेळत बोलू .. काय माहीत कधी भेट होईल आपली ...." तो थोडा गंभीर होत म्हणाला.
"अरे मित्रा बस क्या ... माहितीय आम्हाला किती कठीण परिस्थितीत काम करतोस तू ..."बाप आठवणीने हळवा झाला .
"माझे जाऊ द्या हो..आर्मी मला खूप काही देते .पण तिथे काय परिस्थिती आहे....."??त्याने परत मूड आणत विचारले .
"इथे परिस्थिती बिकट आहे .लोक ऐकत नाही रे.. वेड्यासारखे फिरतात बाहेर. हात जोडून सांगावे लागते बाबांनो घरात राहा .. पण नाही .मारले तर कोणीतरी विडिओ काढतो आणि करतो व्हायरल . आमची दोन्ही बाजूने मारली जातेय.. रस्त्यात किती लोकांच्या संपर्कात येतो आम्ही . तरी बरे जेवण खाण्याची चिंता नाही...तरीही किती काळजी घेणार..."?? बाप पुन्हा भावनिक झाला .
"म्हणजे बाबा..आपण दोघेही आता लढाईवर आहोत तर ...हो पण आता  शाहिद व्हायचे नाही हा.नाहीतर अंत्ययात्रेला कोणीच यायचे नाही ..आजोबांच्या वेळी आख्खा गाव आलेला अंत्ययात्रेला . काय ती गर्दी ,काय तो जयजयकार ... साल मरण ही खुश झाले असेल तेव्हा अशी प्रसिद्धी मिळाली म्हणून ..आपण ही तसेच शाहिद व्हायचे .घराण्याचे नाव राखायचे ...पोरगा हसत म्हणाला .
"ए भानावर ये .. चल मी निघतो राउंड ला .. आज थोडे थकल्यासारखे वाटतेय...."बाप जड आवाजात म्हणाला.
दोघांनी फोन ठेवले आणि आपापल्या कामाला लागले .
दुसऱ्या दिवशी सकाळी एका घरात काही अतिरेकी लपल्याची टीप त्यांना मिळाली.तिथे निघायची तयारी करत असतानाच बाप गेल्याचा फोन आला.
अचानक मिळालेल्या बातमीने त्याला धक्का बसला .  "शेवटी शाहिदाची परंपरा कायम राखली तर ..."?? तो मनात म्हणाला.
 "जवान दो मिनिटंमे तय्यार होकर रिपोर्ट करो .."त्याच्या कॅप्टनचा करडा स्वर कानावर आला तसा तो पटकन उठला .खिश्यातून बापाचा फोटो काढून एक कडक सॅल्युट ठोकला आणि Ak47 घेऊन बाहेर पडला .
दोन दिवसांनी 
त्या छोट्या गावात सैन्यदलाची एक गाडी उभी राहिली . चार सैनिकांनी त्यातून एक शवपेटी बाहेर काढली . पूर्ण गावात लॉकडाऊन होते . गावात एकही माणूस बाहेर दिसत नव्हता . गावाचा सरपंच पुढे आला त्याने जवानांना स्मशानभूमीचा रस्ता दाखविला . चारही सैनिकांनी लष्कराला साजेशा इतमामात त्याचे अंत्यसंस्कार केले . अंत्यसंस्काराला गावातून फक्त सरपंचच हजर होता . दोन दिवसांपूर्वीच त्या शाहिद सैनिकांचा  कॉन्स्टेबल बाप कोरोनामुळे शाहिद झाला होता . त्याचे प्रेत तर डायरेक्ट विद्युतदाहीनीत नेले होते . सोबत फक्त त्याचे दोन सहकारी होते.
त्याच दिवशी हा त्याचा मुलगा काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी लढता लढता शाहिद झाला होता .आपले अंत्यसंस्कार गावी व्हावे अशी त्याची इच्छा होती .सरपंचाने संपूर्ण गावातर्फे त्याला श्रद्धांजली वाहिली.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment