Sunday, July 12, 2020

सुट्टी

सुट्टी
त्या भल्या मोठ्या तुरुंगात आज थोडी गडबड दिसत होती. सर्व तुरुंग चकचकीत होता .कैद्यांचे कपडेही साफ स्वछ दिसत होते .आज कोणाला शिक्षाही  मिळणार नव्हती . कारण ही तसेच होते.
आज जागतिक नरकतुरुंगचे अध्यक्ष यशवंत मनोहर राज उर्फ यमराज आणि त्यांचे सचिव चिंतामणी त्रंबक गुप्त येणार होते.
वर्षातून एकदाच ते या तुरुंगात येत . काही कैदी पॅरोलवर सोडायचे अर्ज करीत . त्याची छाननी करून कैद्यांची मुलाखत घेऊन ते निर्णय घेत . आजही ते त्यासाठीच आले होते .
आपल्या काळ्या रंगाच्या बुलेटवरून त्यांनी तुरुंगाच्या आवारात जोरदार एन्ट्री घेतली आणि बोटावर जाडजूड चेन गरगर फिरवत उतरले. मागून आलिशान कारमधून  चित्रगुप्त उतरले . पाठीवरच्या सॅकमध्ये लॅपटॉप आणि हातातील  टॅब  त्यांच्या कॉर्पोरेट अधिकाराची जाणीव करून देत होता.
दोघेही वेळ न दडवता ऑफिसमध्ये शिरले .  सवयीनुसार चित्रगुप्तने अर्जाची फाईल उघडली आणि ते आश्चर्यचकित झाले . 
" महाराज... आज फक्त पाच अर्ज आहेत. त्यातील एक अर्ज तर दरवर्षीचा आहे .यावर्षी ही त्याला नाकारावे लागेल...." चित्रगुप्त हसत म्हणाले.
"नाही.. यावेळी सर्वांच्या मुलाखती घेऊ .... बोलव एकेकाला ..." ग्लासातील लाल सरबताचा घुटका घेऊन यमराजानी हुकूम सोडला.
चित्रगुप्तांनी बेल मारताच पहिला कैदी आत आला . 
"सांग तुझ्याबद्दल ...?? का तुला सुट्टी हवीय ..?? कधी आलास तू ..?? यमराज कडक आवाजात म्हणाले .
एक साधारण पंचावन्न वर्षाचा तो गृहस्थ होता. नुकताच मृत्यू पावल्यामुळे अजूनही चेहऱ्यावर तजेला होता .डोळ्यात बुद्धिमत्तेची चमक दिसत होती .
"नमस्कार साहेब .... मी व्यवसायाने डॉक्टर आहे . तुम्हाला माहीतच आहे सध्या जगभरात कोरोना विषाणूची साथ आली आहे ..." तो विनयशील आवाजात म्हणाला .
"माहितीय .. आम्हीच आणलाय तो विषाणू . हल्ली तुम्ही मानव फारच शेफारला आहात .त्यांना कंट्रोल करायला हे करावे लागले . त्यासाठी मला माझ्या कामगारांची कपात करावी लागली ...." यमराज चिडून म्हणाले.
"होय साहेब .. माझाही त्यामुळेच मृत्यू झालाय . सलग चोवीस दिवस मी हॉस्पिटलमध्ये रुग्णांवर उपचार करीत होतो . घरी गेलो नाही . विडिओ कॉलवर बायको मुलीशी बोलायचो .आहो एक दिवस सुट्टी घेऊन घरी गेलो तर सोसायटीवाल्यानी बिल्डिंगमध्ये घुसू दिले नाही . गेटवरच बायको मुलांना लांबून भेटलो . परत हॉस्पिटलमध्ये रुजु झालो . पण नंतर मला कोरोना झाला आणि डायबेटीस असल्यामुळे मृत्यू झाला . घरच्यांना माझे शेवटचे दर्शनही नीट करू दिले नाही हो . पुढच्या महिन्यात मुलीचा वाढदिवस आहे . त्यासाठी सुट्टी हवी आहे .उरलेल्या सुट्टीत पुन्हा रुग्णांवर उपचार चालू करेन...."त्याने हात जोडून विनंती केली.
"ठीक आहे.. .विचार करू ... जा बाहेर...". असे बोलून चित्रगुप्तनी दुसऱ्याला बोलाविले .
दुसरा कैदी साधारण चाळीशीचा होता.अंगाने मजबूत दिसत होता .चेहरा राकट आणि नजर शोधक दिसत होती . आल्या आल्या त्याने यमराजना सलाम केला .
"बोला... काय म्हणणे आहे तुमचे...."??  चित्रगुप्त छद्मी आवाजात म्हणाले .
"सर .. मी महाराष्ट्र पोलीस आहे ..मूळ कोकणातला. मुंबईत पोस्टिंग होती .  31 डिसेंबर पासून मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी बंदोबस्तात होतो. 31 डिसेंबर ला चौपाटी ,26 जानेवारी शिवाजी पार्क .होळीला गावाकबी जावूक मिळाला नाय.....". तो जोशात येऊन म्हणाला .
"ए भाऊ.. मराठीत बोल ... तुझे ते मालवणी नको.  गोधळ उडतो खूप ....." डुलक्या घेणाऱ्या यमराजांना पाहून चित्रगुप्त म्हणाले .
"आहो दोन वर्षे झाली ...गावात पालखी खांदयवर घेतली नाय . राखण दिली नाही . मागच्या वर्षी गणपतीची सुट्टी ही चार दिवस दिली . मुलांकडे गणपती विसर्जनाची जबाबदारी देऊन आलो .  का..?? तर मुंबईला धोका आहे . इकडच्या मंडपात बंदोबस्त हवाय . रोज काही न काही कारण आहे . आता हा कोरोना ..  लोकांनी घराबाहेर पडू नये म्हणून आम्ही घराबाहेर पडतो ,रस्त्यावर उभे रहातो. लोकांच्या शिव्या खातो . त्यांना पाया पडून घरी राहायला सांगतो.शेवटी मला ही कोरोना झालाच.हॉस्पिटलमधून डायरेक्ट स्मशानात  नेले मला . देहदान करायची इच्छा होती माझी . तीही अपूर्ण राहिली . गावी घर डबल करायचे होते. तर तुम्ही निसर्ग वादळ पाठविले . अर्धवट बांधलेले घर ही वाहून गेले असेल . तिकडे जाऊन लोकांना मदत तरी करतो . म्हणून सुट्टी हवीय..."
"ठीक आहे... विचार करु... झोपेतून जागे होत यमराज म्हणाले .
तिसरा कैदी आत आला . त्याच्या चालीवरूनच तो सैनिक आहे ते कळत होते . अर्थात यमराजाना सर्व कैदी सारखेच . 
"बोल बाबा ...तुला का सुट्टी हवी .....??
"सर... मी भारतीय सैन्यात कमांडो आहे. आतापर्यंत मी भारताच्या सर्व सीमेवर यशस्वी कारवाया केल्या आहेत . देशात घुसणार्या ,हल्ला करणाऱ्याला  शत्रूला ठार मारणे हेच माझे काम . त्या दिवशी लष्करचा मोठा नेता येणार अशी टीप मिळाली आणि आम्ही कारवाई केली . सहा तास कारवाई सुरू होती . भयानक गोळीबार झाला . मी आणि माझे दोन साथीदार गंभीर जखमी झालो.. त्यांचे दहा अतिरेकी मारले आम्ही . पण तो लष्करचा प्रमुख निसटला . त्याला ठार मारण्याची संधी मिळावी म्हणून सुट्टी हवीय . आणि तसेही मी ही दोन वर्षे घरी गेलो नाही . तीन महिने सियाचेनला होतो तर सहा महिने वाळवंटात . दोन महिने टायगर हिलला  होतो.
"बघू.... ."कान कोरत यमराज म्हणाले.
"नेक्स्ट..."असे चित्रगुप्त ओरडताच त्यांचा नेहमीचा कैदी आत आला . त्याला पाहताच यमराजानी कपाळावर हात मारला.
येणारा कैदी सडपातळ उभट चेहऱ्याचा होता . चार्ली चॅप्लिनसारख्या मिश्या त्याच्या ओठावर होत्या. पण नजर मात्र थंड आणि भेदक होती .अंगावरचा लष्करी युनिफॉर्म त्याच्या अधिकाराची जाणीव करून देत होती ..
"अरे बाबा... गेली सत्तर वर्षे तू आमच्याकडे सुट्टी मागतोयस . पुन्हा जगाची वाट लावायची आहे का तुला ...."??.यमराज संतापाने म्हणाले .
"नाही ...या वेळी जग वाचवायचे आहे मला..". तो आपली भेदक नजर यमराजांकडे रोखत म्हणाला . "मला भारतात जायचे आहे . तिथे कोरोनाचे पेशंट वाढतायत .लोक ऐकत नाहीत . लोकशाहीने या देशाची वाट लावून टाकली आहे . तिथे कठोर वागायला हवे . हुकूमशाही हवी तिथे . रस्त्यावर फिरणार्यांना ,नियम न पाळणार्यांना कठोर शिक्षा दिली पाहिजे. इथे कोणतेही सरकार कितीही चांगले काम करो पण विरोधी पक्ष नावाला जागून विरोध करणार .अजूनही संपूर्ण भारतात शिक्षणाची सोय नाही ,रस्ते नाहीत ,ट्रान्सपोर्ट नाही . मलाच जाऊन व्यवस्थित करावे लागेल ...." म्हणून सुट्टी हवीय..
यावेळी यमराज चिडले नाही तर फक्त विचारपूर्वक मान हलवली.
"नेक्स्ट....".चित्रगुप्त टेबल आवरत ओरडले.
आत आलेल्या कैद्याला पाहताच दोघांच्याही चेहऱ्यावर  आश्चर्ययुक्त आनंदाचे भाव उमटले .
"आयला तुम्ही ...." दोघेही एकसाथ ओरडले .."तुम्ही कसे इथे ...बघ चित्रगुप्त काही गडबड नाही ना . चुकून तर आले नाही ना..." यमराज ओरडून म्हणाले .
आत आलेला कैदी एक उमदा हसतमुख हँडसम तरुण होता . दोघांच्याही बोलण्यावरून तो खूप फेमस असावा असे दिसत होते .
"सर.... मी नाटक.. मालिका आणि चित्रपटात काम करतो. माझे तीनचार चित्रपट खूपच प्रसिद्ध झालेत .दोन नाटके दोन सिरीयलही खूप प्रसिद्ध झाल्या होत्या.पण या कोरोना लॉकडाऊन मुळे सगळे काम बंद झाले . हातात पैसे नाही . डोक्यावर कर्ज.  काही सुचेना यापुढे आपल्याला कामे मिळतील की नाही ही भीती . उंची राहणीमान परवडणार नाही . नैराश्य आले आणि आत्महत्या केली. पण पृथ्वीवर खुपजण आठवण काढतायत माझी . म्हणून मला परत जाऊन पुन्हा नव्याने सुरवात करायची आहे ..."तो सहजपणे म्हणाला.
"खूप छान निर्णय .. ..तुमचे काही चित्रपट इथे पाहतो आम्ही . यावेळी तुमच्या  इंडस्ट्रीतील काहीजण आलेत इथे .. ठीक आहे आम्ही विचार करू .... चित्रगुप्त हसत म्हणाले.
"सर्व मुलाखती संपल्या. आता निर्णय घेऊ.." यमराज चित्रगुप्तांला म्हणाले .
"यातील कितीजणांची पृथ्वीवासीयांना गरज आहे .."?? त्यांनी प्रश्न केला .
हातातील टॅब  उघडून चित्रगुप्तांनी शोध घ्यायला सुरुवात केली. 
"महाराज.... डाँक्टर सोशल मीडियावर फार ऍक्टिव्ह नाही . तो वैचारिक पोस्ट आणि त्याचे विचार मांडतो फार मित्र नाहीत ,त्याच्या जाण्याने घरचे आणि मित्रपरिवार सोडून कोणास दुःख झालेले दिसत नाही.
 "दुसरा तो पोलीस .. त्याला अकाउंट चालविता येत नाही . फक्त फेसबुक आहे . पण मागचे सहा महिने लॉगइन केले नाही .."
" तिसरा सैनिक .. त्याचे फक्त व्हाट्स अप आहे . रेंज मिळेल तेव्हा विडिओ कॉल करतो . दोन नंबर असतात.  एक बहुतेक बायकोचा दुसरा वडिलांचा ...
" तिसरे आपले जुने मित्र ... तेव्हा तर नेट वगैरे नव्हतेच . लोक पुस्तकातून  चित्रपटातून त्यांची चर्चा करतात.अजूनही शिव्या देतात त्यांना काहीजण.."
" पण हा शेवटचा कलाकार खूप प्रसिद्ध आहे . सोशल मीडियाचा वापर आहे . सगळीकडे ऍक्टिव्ह असतो . आणि हो त्याच्या मरणावर  खुपजणानी दुःख प्रकट केले आहे .जणू काही आपल्या घरातील कोण गेले असे लिहितात लोक....चित्रगुप्तांनी टॅबवरून सर्व माहिती दिली.
"पण त्याने तर आत्महत्या केलीय . त्याला जगायचे नव्हते म्हणून हे पाऊल उचलले त्याने....."यमराजानी आश्चर्यानी विचारले . 
"होय महाराज ...पण त्याच्या जाण्याने पृथ्वीवर दुःख झाले आहे . सोशल मीडियावर 80% लोकांना त्याच्या आत्महत्येचे दुःख झाले आहे. चूक सर्वांकडून होते महाराज . तुम्ही ही एकदा एका स्त्रीचे ऐकून तिच्या नवऱ्याचे प्राण परत केले होते . हल्ली त्यावरून ही खूप वाद चालू आहेत ... आणि शेवटी जनमताचा आदर केला पाहिजे...".तिरकस नजरेने यमराजांकडे पाहत चित्रगुप्त म्हणाले .
"ठीक आहे ...आता जनमत त्याच्या बाजूने आहे म्हणतोस तर त्याला परत पाठवून देऊ . बघू जनतेच्या जीवावर काय करतो पुढच्या आयुष्यात .. असे म्हणून त्यांनी समोरच्या कागदावर सही केली आणि बोटातली चेन  गरगर फिरवत बाहेर पडले.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment