Sunday, July 12, 2020

दगड... दोस्ती बडी चीज है

दगड ....दोस्ती बडी चीज हैं ..
साने गुरुजी उद्यानातील हाच तो दगड . लोकांसाठी तो नुसता बसण्यासाठी ठेवलेला दगड असेल . पण आमच्यासारख्या वेगवेगळ्या परिस्थितीत राहणार्यांना  एकत्र आणणारा हा एक दुवा आहे . खूप काही दिले या दगडाने आम्हाला . मुख्य म्हणजे जीवाला जीव लावणारे मित्र दिले . याच दगडावर बसून आम्ही अभ्यास केला . बाहेरून जाणाऱ्या मुलींची थट्टा केली . आंधळ्या भिकाऱ्याला चिडवले . त्यांच्या शिव्या खाल्ल्या . सिनियर्स कडून शिकवणी घेतली ती ही इथेच . आमच्यासाठी ही एकत्र येण्याची जागा होती .. तेव्हा मोबाईल नव्हते . लँडलाईन फोन ही नव्हते . पण वेळ मिळेल तेव्हा या दगडावर येऊन बसायचे . पाच ते दहा मिनिटात कोणीतरी येणार ही खात्री असायची आम्हाला . घरच्यांनाही आम्ही कुठे सापडू याची खात्री असायची .
काहीजणांना जुन्या आठवणी नकोशा वाटतात ,तर काहींना जुन्या आठवणी जगण्याची ऊर्जा देतात.
याच दगडावर ज्ञानसेवेची संकल्पना जन्माला आली . आमच्या हातून काहीतरी घडावे ही त्या दगडाचीच इच्छा असावी .
माझे नशीब थोर म्हणून अजूनही त्या दगडावर बसून अभ्यास करणारे मित्र माझ्या साथीला आहेत . आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीत माझ्या पाठीशी उभे राहिलेत .
कदाचित या दगडबरोबर राहून त्याचे काही गुण ही घेतले असावेत आम्ही . तटस्थता .. मनाला काही लावून न घेणे ... सर्व गोष्टी सहजतेने स्वीकारणे .आयुष्यात येणाऱ्या संकटांचा सामना कसा करावा हेही याच दगडाने शिकवले .
आमच्यासारखे कित्येक विद्यार्थी आतापर्यंत त्या दगडावर अभ्यास करून यशस्वी झालेत .
खरच दोस्ती बडी चीज हैं .... हे ही याच दगडाने शिकविले आम्हाला .

No comments:

Post a Comment