Sunday, July 12, 2020

लॉकडाऊन ...१२

लॉकडाऊन ....१२
"पप्या चल खेळायला ....." काखेत बॅट.. हातात बॉल आणि एका हाताने चड्डी सावरत पिंट्याने दारासमोर उभे राहून नेहमीसारखा आवाज दिला.
"आयला.... आज पप्याचे दार बंद कसे..." असा विचार करीत असतानाच शेजारच्या मालतीकाकूने त्याच्या पाठीत धपाटा हाणला.
"मेल्या... जेव्हा बघावे तेव्हा खेळ चालू तुमचे. शाळा बंद आहेत त्याचा फायदा घेताय होय. पळ घरी ... पप्या नाही येणार आजपासून...."ती आवाज चढवून म्हणाली.
 पाठीवर बसलेल्या धबक्याने पिंट्या थोडा हादरलाच. पाठ चोळतच तो वळला.पण जाता जाता तिला जीभ काढून वेडावून दाखवायला विसरला नाही. 
पिंट्या आणि पप्या एकाच शाळेतील वर्गमित्र.सध्या दोघेही सातवी क मध्ये आहेत. शहराच्या मध्यभागी असलेल्या जुन्या चाळीत राहतात . चाळीतील सगळेच कामगार असल्यामुळे सर्वांची परिस्थिती सारखीच.
 नेहमीच पोटाची काळजी.... तेव्हा पोरांकडे कोण लक्ष देणार .....?? आणि त्यात हा कोरोनाचा लॉकडाऊन त्यामुळे सर्वच त्रासलेले होते . ह्या दोघांना कोरोना काय तेच माहीत नाही . शाळा बंद आहे यातच त्यांना आनंद होता. घरासमोरच्या ग्राउंडवर दोघेच क्रिकेट खेळायचे .  घरच्यांनी मास्क घालूनच खेळायला जा या अटींचे पालन मनापासून करायचे .
 मालतीकाकूला मनातून शिव्या देतच तो घरात शिरला . आणि आईला विचारले "पप्याचे दार बंद का ..?? कुठे गेलाय तो .." नेहमी चिडून बोलणारी आई आज त्याला जास्तच गंभीर दिसली . 
" हे बघ.... त्या पप्याला चिकटू नकोस.लांब राहा.त्याच्या आईवडिलांना कोरोना झालाय ,ते हॉस्पिटलमध्ये आहेत . पप्याला ही घरात बसायला सांगितले आहे..."तिने थोडा आवाज चढवूनच सांगितले.
"आयला.... म्हणजे पप्या आता घरातच बसणार ..."?? आश्चर्याने पिंट्या म्हणाला.
"हो ....आणि तू त्याच्या जवळही गेलास तर तंगडी तोडून ठेवीन ..."आईने तिची आवडती धमकी दिली .
पप्या एकटा कसा राहील घरी ...?? त्याला रात्री भीती वाटते एकट्याने झोपायला .. चहा बरोबर आख्खा ग्लुकोजचा पुडा लागतो . मध्ये मध्ये चॉकलेट गोळ्या लागतातच . कोण देईल त्याला ....??  असा विचार करीतच तो मुकाटपणे खाटेवर बसला .
इतक्यात त्याची आई कपात चहा आणि कागदात चपात्या घेऊन बाहेर पडली . निघताना म्हणाली "मी पप्याला चहा देऊन येते .तू जाऊ नकोस बाहेर .त्याने मान डोलावली .
"काही करून पप्याला भेटलेच पाहिजे . त्याच्याशी बोललेच पाहिजे. पिंट्याचे विचारचक्र चालू झाले .पण कसे....??? अरे हो .. मागच्या गल्लीतून पप्याच्या खिडकीजवळ जाता येते की .. बरेचजण त्या गल्लीत संध्याकाळी प्यायला बसतात म्हणून आई तिथे पाठवत नाही.पण आता कोण नसेल तिथे ....मनात येताच तो टुणकन उडी मारून उठला.
शाळेच्या बॅगेत दहा रुपयांची नोट त्याने जपून ठेवली होती . त्याने धावत वाण्याकडे जाऊन कुरकुरेचे पॅकेट घेतले आणि त्या मागच्या गल्लीतून पप्याच्या बंद खिडकीसमोर उभा  राहिला .मग हळूच इकडेतिकडे पाहत खिडकीवर थापा मारल्या आणि त्याच्या नावाने हाका मारल्या . थोड्या वेळाने आतून खिडकी उघडली आणि पप्याच समोर आला .
"आयला पिंट्या तू ....."?? पप्या आनंदाने ओरडला. 
"शु.... हळू आणि लांब राहून बोल ... " पिंट्याने मोठेपणाचा आव आणत ऑर्डर सोडली. मग हातातील कुरकुरेचे पॅकेट फोडले त्यातील काही काढून स्वतःच्या खिश्यात टाकले आणि उरलेले पॅकेट त्याच्या दिशेने फेकले .एखाद्या कसलेल्या खेळाडूप्रमाणे पप्याचे ते लीलया झेलले . दोन कुरकुरे तोंडात टाकून म्हणाला बरे झाले रे आणलेस .. तुझी आई चहा चपाती बाहेर ठेवून गेली . चहा बरोबर चपाती कशी खाता रे तुम्ही ..."??
"नाही खाल्ली तर पाठीत धपाटे खावे लागतात .. बरे सांग आता तू एकटाच राहणार का ....?? रात्री पण एकटाच झोपणार ...?? डोळे मोठे करत पिंट्याने विचारले . 
"हो रे .. माझी तर खूप फाटते रात्री एकटे झोपायचे म्हटल्यावर . लवकर येऊ दे आई बाबा  ...." पप्या रडवेला चेहरा करीत म्हणाला .
"पप्या ...तू मुळीच काळजी करू नकोस. मी इथेच येईन दिवसभर . असेच लांब अंतर ठेवून गप्पा मारत बसू. तुला काय हवे ते सांग . मी देईन आणून तुला . तुला माझ्याकडची सगळी खेळणी आणि गेम आणून देतो . कंटाळा आला की खेळत बस .. आणि दिवसा अजिबात झोपू नकोस मग रात्री टीव्ही पाहता पाहता झोप लागेल....."पिंट्या मोठेपणाचा आव आणत म्हणाला .
 रात्र होईपर्यंत दोघेही गप्पा मारीत बसले . तो पर्यंत कोणी ना कोणी अधेमध्ये त्याच्या दरवाजावर काही ठेवून जात होते . दरवाजा वाजला की पिंट्या लपून बसायचा .
बाबांच्या आणि इतरांच्या बोलण्यावरून पिंट्याला कोरोनापासून कसा बचाव करायचा हे कळत होते . तो रोज ती माहिती पप्याला सांगत होता.
" लिंबू सरबत कर ...हातातील पाच लिंब पिंट्याच्या हाती देत आई ओरडली . कोरोनापासून लांब ठेवते लिंबू सरबत ..."
पिंट्याने हळूच एक लिंबू आपल्या खिश्यात टाकले . थोडया वेळाने धावत जाऊन खिडकीतून पप्याकडे फेकले ." लिंबू सरबत पी ...कोरोना होणार नाही.." असे त्यालाही ओरडून सांगितले . 
हळू हळू पिंट्या त्याच्या खाण्यातील वस्तू बाजूला ठेवून ते पप्याला देऊ लागला .त्याच्याशी गप्पा मारीत वेळ घालवू लागला.
 तिथे पिंट्याची आई दिवसभर हा असतो कुठे याची काळजी करू लागली .हल्ली भूकही त्याला जास्त लागते हे लक्षात येऊ लागले तिच्या. तिने पिंट्याच्या बाबांच्या लक्षात आणून दिले .बाबांनी काही न बोलता फक्त मान डोलावली.
त्या दिवशी पुन्हा पिंट्या खिशातून खाऊ घेऊन पप्याच्या खिडकीवर आला . पप्या त्याची वाटच पाहत होता . त्याने फेकलेली खाऊची पिशवी त्याने सहज झेलली  आणि डोळे विस्फारून पिंट्याच्या मागे पाहू लागला .
पिंट्याच्या मागे त्याचे बाबा उभे होते . पिंट्याचीही त्यांना पाहून तरतरली. त्यांनी हसून पिंट्याच्या खांद्यावर हात ठेवला .
"छान घेतोस मित्राची काळजी...पण तितकीच स्वतःची ही घे .किती वेळ घाणीत उभा राहून गप्पा मारणार तू . चल आपण ही जागा साफ करू ..."असे म्हणत त्यांनी खिडकीखालील जागा झाडून साफ केली आणि बरोबर आणलेले टेबल तिथे ठेवले .
"हे घे टेबल...यावर बसून बोल त्याच्याशी . पाय दुखाणार नाहीत तुझे ....  पण हो त्याच्यापासून लांब राहायचे . तोंडावरचा मास्क काढायचा नाही . आणि कुठेही स्पर्श करायचा नाही ..अश्या प्रेमळ सूचना देत पिंट्याच्या डोक्यावरून  प्रेमाने हात फिरवला आणि परत निघाले .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment