Sunday, July 12, 2020

लॉकडाऊन ...९

लॉकडाऊन ....९
"मला ही बिस्किट्स नको.तुला माहितीय ना.. मला ती ओरीयौच हवी..."छोटा अंबर आईकडे चिडून पाहत  म्हणाला.
"हो रे राजा... पण आता संपली ती .आपण उद्या आणूया हं.."आई त्याला समजावत म्हणाली.
 घरात बसून कंटाळलेल्या सदाशिवला अंबरचे बोलणे ऐकूना राग आला.
त्याच्या पाठीवर धपाटा देत तो ओरडला .. "खायचे असेल तर खा..बापाने पैशाचे झाड नाही लावलंय".पाठ चोळत रडवेला चेहरा करून चहा पिऊ लागला .
अंबर सदाशिवचा एकुलता एक मुलगा.
सदाशिव खाजगी कंपनीत कामाला . कडक शिस्त पाळणारा.त्यामुळे घरातही तेच वातावरण.
आईच्या लाडाने अंबर बिघडलाय ही त्याची तक्रार . अंबरच्या प्रत्येक मागणीत तो हस्तक्षेप करायचा.
त्याची शिस्तही तशीच होती . वेळच्यावेळी उठणे ,पूजा ,अभ्यास  अगदी चोख पाहिजे त्याला.
बाप घरात असला की अंबर  जरा जपूनच वागायचां.
पण ओरियो बिस्किट्स त्याचा जीव की प्राण . त्यासाठी तो आकंडतांडव करायचा . दुसरे काहीही चालायचे नाही त्याला .  आई बराच स्टॉक भरून ठेवायची.
 सदाशिवपुढे मात्र त्यांचे काहीही चालायचे नाही.
त्यांच्या विभागात काही कोरोन रुग्ण सापडले होते  आणि त्यामुळे संपूर्ण एरिया सील  केला होता.
सदाशिवही घरात बसून होता .लॉकडाऊन सुरू झाले तसे त्याने बायको आणि अंबरला घराबाहेर पडण्यास बंदी घातली होती. तो स्वतः ही फारसा बाहेर जात नव्हता . ताटात पडेल ते मुकाट्याने गिळायचे अशी तंबीच त्याने दिली होती.
आज  सकाळी उठलाच तो अंबरच्या ओरडण्याने.आईकडे तो ओरियोची मागणी करत होता . गेले पंधरा दिवस तो चहाबरोबर मिळेल ते खात होता.पण आता त्याचा बहुतेक कंट्रोल सुटला होता. सदाशिव चिडून उठला तसा तो भीतीने शांत झाला पण मुसमुसणे बंद झाले नाही. 
सदाशिवने कपडे चढविले . मास्क घातला आणि त्याच्याकडे एक जळजळीत  कटाक्ष टाकून बाहेर पडला.
बराचवेळ झाला पण सदाशिव आला नाही म्हणून बायकोला चिंता वाटू लागली . तिने फोन केला तेव्हा तो दहा मिनिटात येतो म्हणाला पण अर्धा तास झाला तरी आला नाही .
काळजीने ती गॅलरीत उभी राहून त्याची वाट पाहू लागली . बऱ्याच वेळाने शेजारचा निखिल वर येताना दिसला.
 तिला पाहून त्यानेच विचारले "वहिनी ....भाऊ आले का ..?? नाक्यावर  बऱ्याचजणांना पोलिसांनी पकडलेय बाहेर फिरतात म्हणून . उठाबशा काढताना भाऊंना पाहिले मी मगाशी . काठीचे फटके ही दिलेत बऱ्याच जणांना . मी आलो पळून भाऊ ही येतील आता .."
 "देवा ....!! मनातल्या मनात ती देवाचा धावा करू लागली . इतक्यात सदाशिव तिला गल्लीच्या कोपऱ्यातून येताना दिसला .
काहीसा हताश ..त्याची चाल ही मंदावली होती . दुर्मुखलेल्या चेहऱ्याने तो तिच्यासमोर उभा राहिला.
"काय हो ...?? किती उशीर ..?? त्याच्या हातातील पिशवी हातात घेत तिने विचारले . काही न बोलता तो आत शिरला.
खुर्चीवर बसताना एक वेदनेची चमक त्याच्या डोळ्यात उतरली आणि थोडा हुंकारही . तिने काळजीने त्याच्याकडे पाहिले .
"आज काही मिळालेच नाही म्हणून थोडा उशीर झाला ग ..."तो हसत म्हणाला .
तिने काही न बोलता पिशवी उलटी केली . आतून ओरियो बिस्किट्सचे पाच पुढे बाहेर पडले . 
  इतका वेळ फुरंगटून बसलेला अंबर धावत येऊन सदाशिवच्या  गळ्यात हात  टाकून गालाची पापी घेत आनंदाने नाचू लागला  .ते पाहून कडक शिस्तीच्या आवरणात गुरफटलेल्या बापमाणसाच्या दुखऱ्या वेदनेवर अलवार फुंकर घातली गेली.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment