Sunday, July 12, 2020

वादळ

वादळ
निसर्ग वादळाचे लक्ष आमचा जिल्हा आहे हे ऐकून मी थोडा चिंतेत पडलो.
आधीच माझे घर समुद्राच्या समोर. त्यात छप्पर पत्र्याचे.कोणी राहत नव्हते म्हणा. सामानही तसे काही नव्हतेच.
आमचे राम भाऊच सगळे बघायचे . काही अडचण असेल तर फोन करून सांगायचे.
विक्रमला जेव्हा सांगितले तेव्हा पटकन म्हणाला "भाऊ ...घराचे नुकसान झाले तर आपले भाऊ रिसॉर्ट बंद .. बसायचे कुठे मग ...."?? 
च्यायला इथे मी घराच्या टेन्शनमध्ये आणि याला बसायची चिंता ....मी जरा चिडलोच.
गावी कडक लॉकडाऊन असल्यामुळे जायचीही सोय नव्हती. तेव्हा फक्त टीव्ही बघण्याशिवाय पर्याय  नव्हता. सौ ने रामभाऊना फोन करून विचारलेच . त्यांनी स्वतःच्या घराची काळजी घेतली होतीच . आता निसर्गापुढे कोणाचे चालता हा....  बोलून हसले होते.
टीव्हीवर वादळाचे रौद्ररूपपाहून आम्ही हादरलो.हळूहळू वादळ आमच्या गावाकडे सरले आणि गावाशी संपर्क तुटलाच . संपूर्ण दिवस आम्ही चिंतेत घालवला.
दुसऱ्या दिवशी सकाळी विक्रम दारात गाडी घेऊन हजर..."भाऊ चल निघुया .....बघू काय किती नुकसान झालेय ते .."
पडत्या फळाची आज्ञा घेऊन मी पटकन गाडीत बसलो आणि निघालो .
"अरे पण गावात लॉकडाऊन असेल तर ..."?? माझी नेहमीची शंका .
"खड्ड्यात गेले लॉकडाऊन .आपल्याला घराची चिंता .. बघू काय होतंय..".तो चिडून म्हणाला.
काही तासातच आम्ही जिल्ह्यात प्रवेश केला .
वादळाचे थैमान काय असते हे आम्ही प्रत्यक्ष पाहत होतो. नैसर्गिक संकटे...  दहशदवादी हल्ले ..आम्ही मुंबईकरांनी खूप पचवली होती आणि त्यातूनही ताबडतोब उभे राहिलो होतो.पण इथे गावात मात्र ते सहन करायची ताकद नव्हती . कसे करणार .. रस्त्यारस्त्यावर विजेचे खांब पडले होते. घरांचे पत्रे उडाले होते .झाडे कोसळली होती. मदत मात्र कमी प्रमाणात होत होती.
गावात शिरलो आणि समुद्राच्यासमोरच्या घरांची दुर्दशा दिसू लागली. रस्त्याच्याकडेला लावलेली झाडे पडली होती .एकूणएक घराचे पत्रे उडाले होते. काही ठिकाणी तर भिंती ही पडल्या होत्या . काही वाड्यांमधील माड सुपारीची झाडे जमीनदोस्त झाली होती .
"भाऊ ... गेले आपले घर .... सगळे पत्रे उडाले असतील ....." विक्रम उदासपणे म्हणाला . मी तर गावाची अवस्था पाहून सुन्न झालो होतो .
गाडी माझ्या घराजवळ थांबली आणि घराची अवस्था पाहून धक्काच बसला . घराचे अर्धे पत्रे उडून गेले होते . विजेचे मीटर खाली लोबकळत होते. घरात चिखल होता. पंखे वाकडे झाले होते . थोडे थोडे पैसे वाचवून ,कर्ज काढून बांधलेल्या घराची अवस्था पाहून मी खचून गेलो.विक्रमने मला सावरले.
तसेच मागे आम्ही रामभाऊंच्या घरापाशी आलो . त्यांच्या घराची अवस्था पाहून माझे घर बरे.. असे म्हणायची पाळी आली . त्यांच्या घराचे सगळे पत्रे उडून गेले होते. वाडीतील झाडे पडली होती. एक आंब्याचे कलम तर त्यांच्या घरावर पडून दोन भिंतीच जमीनदोस्त झालेल्या दिसत होत्या.
रामभाऊ ओसरीत उभे होते. बनियन आणि हाफ पॅन्ट या त्यांच्या नेहमीच्या पोशाखात. आम्हाला पाहतच ते हसले . पण डोळ्यातील वेदना  लपवू शकले नाहीत.
"घराक जाऊन इलस....."?? त्यांनी विचारले.मग आजूबाजूला नजर फिरवत म्हणाले "होत्याचा नव्हता केलान रे ह्या वादळांन.."
रामभाऊनी घरावर ताडपत्री टाकून तात्पुरते छप्पर तयार केले होते . भिंतही झाडांच्या फांद्यांनी बनवली होती. एका कोपऱ्यात आंब्याची रास उभी होती. तर बाजूला शेवग्याच्या शेंगा आणि नारळ होते काही फणस ही होते.ओसरीत चूल पेटली होती . भाताची पेज त्यावर शिजत होती .
"बसून घेवा... असे म्हणून त्यांनी  आम्हाला दोन छोटी टेबल दिली.आणि स्टीलच्या पेल्यातून गरम गरम पेज आमच्या पुढ्यात ठेवली .
" मसाला आणि किराणा.. सर्व समान ..भिजून गेला बघ.तांदळाची पेज खा आज .रात्री बंदरावर जाऊ बघू काय मिळता ता.. .."ते हसत म्हणाले .
"रामभाऊ काकू दिसत नाही ..."?? मी इकडे तिकडे नजर फिरवत विचारले .
"अरे तिका काल शाळेत बसिवलंय.आता दोन दिवस येव नको बोल्लय. ह्या सर्व बघून तिचा तर जीवच जाईल...."असे बोलून हसले .
"काय रामभाऊ इतके होऊन तुम्ही हसता..."?? विक्रम आश्चर्याने म्हणाला .
"मग काय करू....?? माझ्या रडण्यान ह्या सर्व भरून येवचा काय ....?? असात तर दिवसभर रडत राहतय .." ते कठोरपणे म्हणाले ..."अरे या निसर्गानं आपली जागा दाखवून दिली आमका. माणसाक जगूसाठी काय लागता ते दाखवून दिलान. आता ह्याच बघ ना ही ह्या पेजेने पॉट भरता आणि या ताडपत्रीने पाणी आत येऊचा नाय . रात्री झोप लागात ना ...?? 
"म्हणजे इथे झोपणार तुम्ही ...."?? मी चिंतेत विचारले . 
"आपण झोपुचा हयसर... जमीन सुकी हा.. पाऊस पडलो तरी पाणी शिरणार नाय घरात . तुम्ही खय जाणार...?? एक दिवस तरी ह्यो अनुभव घेवा..  अरे भाऊ घर पडला ना तुझा ...?? नुसता बघूनच जातस.. मुंबई घर असा तुमचा पण आम्ही खय जाऊचा ..."ते विषदाने म्हणाले .
"रामभाऊ आम्ही थांबू आज .. विक्रम म्हणाला .घराची दुरुस्ती ताबडतोब केलात ..."?? 
"मग काय सरकार येवुची वाट बघायची . तो पर्यंत हाय ता पन व्हावून जायचा . ताडपत्री होती,पडलेल्या कलमाच्या फांद्या तोडल्या . एक जाळा उसावला त्याचे दोरे काढले आणि जमेल तशी दुरुस्ती केली . लेक आणि सून होतेच मदतीला ..." रामभाऊ खुशीत म्हणाले .
"अरे आता हयसर महिनाभर लाईट येऊचा नाय . मुंबईतून मेणबत्ती कोणी पाठवल्यांन तर बरा होईल. ह्या तीन तासाच्या वादळात पन्नास वर्षे मागे गेलंय बघ मी . तेव्हा लाईट नाय ,चुलीवर जेवण . जे आहे ते खाऊन जगायचं . आज रात्री बंदरावर जाऊन जाळी फेकू . मिळात ता आणू ,त्याने दहा दिवस आरामात जातील.सकाळी जंगलात जाऊ ,जांभळा करवंदा जमा करू.., शिकार मिळाली तरी करू ... पोटाचो प्रश्न नाय रे ..... पण ह्या आयुष्यभराच्या मेहनतीवर पाणी पडला त्याचा दुःख होता.. असे म्हणून त्यांनी हळूच डोळे पुसले . 
रात्री तसेच आम्ही उघड्या आकाशाखाली अंगणात झोपलो.दुपारी जेवून निघताना विक्रमने रामभाऊच्या हातात पैसे ठेवले .
"अरे कित्याक हे .. आमच्याकडे पाहुण्यांकडून पैसे घ्यायची पद्धत नाय ओ. आलात ताच बरा वाटला बघा. ह्या वादळामुळे जास्त काय करता आला नाय तुमच्यासाठी त्याचा वाईट वाटता.. आणि भाऊ माझा व्यवस्थित झाला की तुझा घर घेतंय करून . बाय ला सांग काळजी करू नकोस ...." मी मानेने होय म्हटले .
"रामभाऊ.. हे पैसे तुम्हाला असेच देत नाही मी . ते आंबे टाका गाडीत आणि काल पकडलेले मासे ही . आणि त्या फणसाचे गरे ही द्या ... आलोच आहोत तर कोकणचा मेवा घेऊन जाईन म्हणतो . काही दिवसांनी येईल तेव्हा अजून मिळेल ते घेऊन जाईन . त्याचेच हे पैसे.... "विक्रम नेहमीच्या शैलीत म्हणाला .
पैसे घेताना रामभाऊचा बांध फुटला." ह्या वादळाने एका फटक्यात उध्वस्त केलान आमाक.. पण आम्ही परत उभे राहू .. ज्या निसर्गाने आमच्याकडून ओढून घेतलान त्याच निसर्गाकडून आम्ही पुन्हा काढून घेऊ . पुन्हा उभे राहू. पण हारणार नाही ..."
मी अश्रू पुसत रामभाऊच्या मिठीत शिरलो.

© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment