Sunday, July 12, 2020

लॉकडाऊन ...८

लॉकडाऊन...८
"काही आणायचे आहे का मॅडम ...?? मी खाली उतरतोय ...." त्याने कापडी पिशवी हातात घेत कोपऱ्यातील चपला पायात घालत विचारले.
" आता कशाला जाताय खाली ..?? माहितीय ना काय चालू आहे ...?? उगाच रोगाला आमंत्रण ..".तिने त्रासून म्हटले.
 "मग काय करू मॅडम....?? काल पासून दूध नाही. साखर तर कमी लागते आपल्याला त्यामुळे त्याचे टेन्शन नाही . डायबेटीस असल्याचा काय फायदा असतो हे या रोगाने जाणवून दिले आपल्याला ..."तो हसत म्हणाला.
"होईल हो सर्व काही व्यवस्थित....आजचा दिवस दुधाची पावडर वापरू ... उद्या कोरा चहा पिऊ .. तोपर्यंत काहीतरी होईल ...." ती म्हणाली .
"हो ना...जुने दिवस आठवले बघ .. तेव्हा दुधाच्या बाटल्या मिळायच्या केंद्रावर . आपली तर ऐपत नव्हती . मग जाधवांकडून एक रुपयांचे दूध आणून चहा करायचो . आणि एक रुपयाचा बिस्कीटचा पुडा आणून पोराला द्यायचो.दूध त्यांच्या चहातच संपून जायचे आणि आपण कोरी चहा प्यायचो.... "तो जुन्या आठवणीत रमला.
"आणि हो .... रात्री अमितचा व्हिडिओ कॉल येईल त्याला हे सांगत बसू नका .. आणि ती दाढी करून घ्या हो आधी .. किती गबाळे दिसतायत तुम्ही .. काल बोललाच तो .. पप्पा कसे रहातायत...?? ती थ्री फोर्थ कशी  आणि टी शर्ट ही जुना ...." ती ओरडली.
"ओ बाई ...माहितीय ना.. इथले सलून बंद आहेत ते . मी घरी दाढी करत नाही हे चांगले माहीत आहे त्याला. म्हणून तो किटही पाठवून देत नाही . त्या नेहमीच्या सलूनवाल्याच्या अकाउंटवर पैसे पाठवितो आठवणीने .  आणि कपड्याचे काय ग ....??  हल्ली कुठे  बाहेर जातो आपण...??  आणि तुला तर कपडे धुवायला जमत ही नाही ..."त्याच्या बोलण्यात वेदना होती .
"सगळं मान्य आहे... पण तिकडे त्याला का त्रास द्यायचा .. किती करतो तो आपल्यासाठी . दर महिना रेशन... गरजेच्या वस्तू दारात येतात . कामवाल्या बाईला वेळच्या वेळी पगार . डॉक्टरची बिल आपल्या गोळ्या... सर्व काही व्यवस्थिती मॅनेज करतो ते ही परदेशात राहून....आहो ... त्या गोळ्यांवरून आठवण झाली .. या दोन दिवसात तुमच्या गोळ्या संपतील . आठवणीने घेऊन या ......" ती कपाळावर  हात मारून म्हणाली.
"आणि तुझ्यातर अजून महिनाभर चालणारच आहेत  नाही का ...?? कालच रिकामी पाकिटे पाहिली मी  .. आणि म्हणूनच खाली चाललोय आणायला ... त्या मेडिकल वाल्याकडे काही खायला असेल तर तेही घेऊन येतो ...." तो डोळे मिचवकात म्हणाला.
"आहो ....आपला अमित ठीक असेल ना ...?? आपल्या इथे इतकी गडबड चालू आहे ,तिथे तर बघायलाच नको . रोज शंभरावर माणसे मरतायत .ते सर्व रोज बोलतात आपल्याशी पण चेहऱ्यावरची काळजी काही लपत नाही त्यांच्या ...." ती अश्रू टिपत म्हणाली .
"सरकार.... त्याला स्वतःची काळजी नाहीय तर आपली काळजी आहे. इथे सर्व लॉकडाऊन आहे. कोणी कोणाकडे जात नाही.आपली कामवाली येत नाही . दूधवाला येत नाही. हे सर्व माहीत आहे त्याला .. आणि तिथे राहून खिश्यात बक्कळ पैसे असूनही काहीही करू शकत नाही याचे दुःख आहे त्याला .....म्हणून तुम्हाला सांगतो हसत खेळत बोला त्याच्याबरोबर .." तो आता गंभीर झाला . 
"ठीक आहे... मग आज मस्त हसऱ्या चेहऱ्याने सामोरे जाऊ त्याला .. मी तुमच्यासाठी आज छान ड्रेस काढून ठेवते . पण तुम्ही आज खाली जाऊ नका प्लिज .. "ती अगदी गोड आवाजात म्हणाली.
"हाय.. हाय ..!! इसी अदा पर तो हम फिदा हुये थे .. लग्नाआधी असाच एकदा  बिल्डिंगखाली आलो होतो तुला भेटायला.. तेव्हाही तू असेच म्हटले होतेस आणि तेव्हाही मी थांबलो थोडा वेळ...परिणाम कांय झाला माहितीय ना ....?? तुझ्या बापाने कानाखाली काढलेला जाळ अजून चटका देतोय ...." तो गालावर हात ठेवून नाटकी आवाजात म्हणाला .
"इतके ही नको हो कुजकट बोलायला... तरीही लग्न केलेच ना शेवटी तुमच्याशीच .... ते राहू दे आज मी तुमची दाढी करते.. माझ्याकडे हेयर रिमूविंग क्रिम आहे . त्यानेच करू ... .."ती ताठ मान करून म्हणाली .
काय क्रिम..?? हे कधी आणलेस तू ..?? आणि तुझे वय आहे का हे ...."?? तो थोडा चिडून म्हणाला .
"गप बसा हो .. मागे सुनबाई आली होती तेव्हा तिचा मेकअप बॉक्स इथेच ठेवून गेली माझ्यासाठी .आई वापरा तुम्ही छान दिसाल अशी म्हणाली.मग मीही ठेवून घेतला . त्यात हे होते . आज तेच वापरू मस्त दाढी करूया तुमची ... .." ती टाळी वाजवत म्हणाली.
मान डोलवत  तो हताशपणे तिच्यासमोर जाऊन बसला . 
संध्याकाळी दोघेही तयार होऊन त्याच्या विडिओ कॉलची वाट पाहत बसले . त्याचा कॉल आला आणि आईवडिलांना इतके टापटीप बसलेले पाहून तो खुश झाला.
त्याने हळूच मुलाला थांब अशी खूण केली .मग आत जाऊन ओवाळणीचे तबक आणले आणि तिला ओवाळले .मग ती उठली आणि त्याला ओवाळले . मुलगा हे सारे स्क्रिन वर पाहत होता . त्याने आश्चर्याने विचारले .." हे काय .."?? 
"अरे ..आज आमच्या लग्नाचा वाढदिवस नाही का ...? तो ही  एकोणपन्नासावा .. नेहमी शेजारी आणि नातेवाईक येतात शुभेच्छा द्यायला पण या लॉकडाऊन मुळे कोणाच्या लक्षात आलेले दिसत नाही . नेहमीचे फोन आठवणीने आले तेव्हढेच . पण हा दिवस साजरा करायला हवाच .  आज आम्हीच एकमेकांना ओवाळणार .. एकमेकांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार ...." तो हसत हसत मुलाला म्हणाला . तिने ही अलगद डोळे पुसले.
"माफ  करा बाबा .. या परिस्थितीमुळे मला तुमच्यासाठी काहीच करता येत नाही . पण एक वचन नक्की देतो .तुमच्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस आपण झोकात साजरा करू . त्यावेळी मी विडिओ कॉल करणार नाही तर प्रत्यक्ष हजर असेन . कदाचित पुढचे सर्वांचे वाढदिवस आपण एकत्रच साजरे करू ..
© श्री. किरण कृष्णा बोरकर 
8286837133

No comments:

Post a Comment