Sunday, July 12, 2020

अलक।...२

अलक...२
त्याचे वय साधारण सहा वर्षे असावे. कोथिंबीरच्या दोन जुड्या हातात घेऊन एका हाताने चड्डी सावरत बाजारात फिरत होता.सगळ्यांसमोर त्या जुड्या पुढे करायचा .  माझ्याही समोर येऊन मुकाटपणे दोन जुड्या समोर केल्या . मी मान नकारार्थी हलवली.पण उपदेश करायचा माझा स्वभाव स्वस्थ बसू देत नव्हता . "शाळा नाही का रे ...?? जाऊन अभ्यास कर .. शिकलास तरच मोठा माणूस बनशील पुढे .... "तो शांतपणे माझे ऐकून घेत होता.इतक्यात कुठूनतरी त्याची आई समोर आली.त्याच्या पाठीत धपाटा पडला . "तुला काय गप्पा मारायला पाठवलंय होय ...  चार जुड्या विकल्या असत्यास आतापर्यंत. इथे उपदेश देण्यापेक्षा दहा रुपयांची जुडी घेतली असती तर संध्याकाळी चहासोबत बिस्कीटचा एक पुडा खाता आला असता...".
दोघांची नजर बरेच काही शिकवून गेली मला.
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment