Sunday, July 12, 2020

मुंबईकर आणि कोरोना ...३

मुंबईकर आणि कोरोना....३
आयच्या गावात.. ..!!  हा लॉकडाऊन वाढला की ... मला वाटले पंधरा दिवस असेल .मग सुरू होईल नेहमीप्रमाणे रुटीन...
पण कसले काय...
आले त्या दिवशी साहेब टीव्ही वर ...हल्ली ते असे टीव्हीवर येऊन मित्रो बोलले की जीवच दडपतो बघा...
 मागच्या वेळी नेमके आठ वाजता मित्रो म्हणून नोटबंदी केली. 
नाही नाही माझे काहीच प्रॉब्लेम झाले नाहीत .. पावणेतीनशे रुपये होते फक्त खिश्यात..च्यायला..!! पाच सहा हजार खिश्यात ठेवून फिरायची हिंमत आहे का आपली.पाकीट नुसते त्या पाकिटमाराला दाखवायला असते.
असो आता तो विषय नाही .विषय आहे लॉकडाऊनचा . साहेब प्यारे देशवासीयो बोलले आणि समजलो काही खरे नाही .. लॉकडावून वाढला ... बसा अजून काही दिवस घरात.
आपली घरात बसायची तयारी आहे हो ... पण बरेच दिवस ह्याची सोय नाही .. म्हणजे दारू हो.
ती ही बंद...  पुढचे दिवस काढायचे कसे ...?? नाही म्हणजे आपले रेग्युलर बसणे नाही म्हणा .. पण कधी कधी साहेब घेऊन जातात पार्टीला .. तर कधी ते फॉरेनर्स येतात त्यांना घेऊन लंचला जावे लागते .. नाहीतर कधी कधी मित्र प्रेमाने आग्रह करून घेऊन जातात . तेव्हा महिन्यातून तीन चार वेळा होतेच.
छे.. छे.. आपल्याला व्यसन नाहीच.अजून पोरांची लग्न आहेत ..जबाबदाऱ्या आहेत  आपल्याला हे रोज रोज पिणे परवडते का ....?? आणि बसल्यावर ही दोन पेगच्या वर घेत नाही बरे का ..?? 
विचारा विचारा कोणालाही विचारा .. सगळे हेच सांगतील .. आहो घरी येतो तेव्हा आजूबाजूच्याना कळत देखील नाही हे घेऊन आलेत.
सौची कटकट आहेच हो. ती तिचे कर्तव्य करणारच .. कोणाच्या बायकोला आवडेल आपला नवरा दारू पिऊन येतो ते.पण मीही माझे कर्तव्य करतो.कोणालाही नाराज करीत नाही .जो विचारेल त्याच्याबरोबर जातो.तो जे देईल ते पितो.तो जे मागवेल ते खातो .. समोरच्याला नाराज करायचे नाही .आपल्यावर विश्वास आहे म्हणून घेऊन जातात ना .. 
तर आता तो प्रश्न नाही .प्रश्न हा आहे अजून किती दिवस दारूची दुकाने बंद राहतील ..?? राज्याचा किती महसूल बुडतोय याची कल्पना आहे का कोणाला ....??
त्या दिवशी नटराजचा शेट्टी म्हणाला रोजचे लाखाचे नुकसान होतेय त्याचे .... मला महसूलाची काळजी नाही हो.त्या अण्णा परबची आहे . दारू नाही मिळाली की राक्षस बनतो तो . समोर आलेल्या प्रत्येकाला शिव्या देतो . हात पाय थरथरतात त्याचे .पण पियाल्यावर त्याच्यासारखा देव माणूस नाही.काय  त्या वैचारिक चर्चा, साहित्यिक गप्पा .. जगातील कोणताही विषय नाही ज्यावर अण्णा बोलू शकत नाहीत आणि दयाळूपणा तर किती ....??  अर्धा चकाना तर दुसर्यांना वाटण्यात जायचा.खंबा संपला की हा चुपचाप घरात जाऊन ताटात पडेल ते खाऊन सरळ अंथरुणात ... अश्या माणसांसाठी तरी दुकाने उघडा. पन्नास टक्के भांडणे मारामाऱ्या बंद होतील. आपले चॅलेंज आहे .
माझे काय विचारता ....?? नाही हो हवीच असे काही नाही.लॉकडावूनच्या आधी आमच्या मेव्हण्याने अर्धा खंबा  दिला होता मला. तो देतो अधूनमधून  स्वतःचा मोठेपणा दाखवायला.मी पण मग एकदम उपकार केल्यासारखे दाखवतो.
एकदा बायकोला विचारले हा फुल खंबा का देत नाही...??  तर म्हणते दिली तर चार दिवसात संपवाल. म्हणून मीच सांगितलीय अर्धाच दे .
बघा ह्या बायका अशीच माहेरी इज्जत काढतात . पण त्याच मेव्हण्याच्या नोकरीसाठी मी प्रयत्न केले ते सोयिस्कर विसरून गेलीय .
पण काही म्हणा या लॉकडाऊनमुळे ती बाटली पुरवून पुरवून वापरली इतके की शेवटी मुलाने औषधांची मेजर कॅप हातात दिली आणि म्हणाला आता यातून प्या. या पोरांना काय सांगू अरे दारू चवीचवीने प्यायची असते . 
पण आता पुढे काय ..?? बर्याचजणांना खुशाली विचारायला फोन केला असे सांगून दारूचा विषय काढला .पण सगळीकडे माझ्यासारखेच हाल . म्हणजे सध्या निदान महाराष्ट्रात तरी माझ्यासारखे बहुसंख्य लोक आहेत याचा आनंद झाला .
आ हा हा .... शेवटी तो दिवस आलाच.किती दिवस सरकार दुकाने बंद ठेवेल.उद्यापासून उघडणार बघा दुकाने. नाही हो मी कशाला जाऊ  आणायला .. आपल्याला नसली तरी चालते . आणि किती वर्षे तीच तीच दारू पिणार . नाही बुवा मी काही लाईन लावायला जाणार नाही ... चार दिवस नाही मिळाली तर जीव जाणार नाही ..पण हिला सांगतो म्हणजे फोन करून मेव्हण्याला सांगेल . बहिणीचे कर्तव्य पार पाडूक नको...?? 
आज सकाळी लवकरच जाग आली . बायकोने समजले अश्या अर्थाने मान का डोलावली समजली नाही .नाहीतरी तिच्या बऱ्याच गोष्टी समजत नाही मला . अशी मीच समजूत करून घेतो . खाली जरा राउंड मारून येऊ.
गल्लीच्या कोपऱ्यावर आज बरीच गडबड दिसतेय . अरे महाजन काका रांगेत कसे .. काय पोर आहेत बापाला या वयात रांगेत उभे राहायला सांगतात ...?? झाडले पाहिजे एकेकाना .. काका मलाच बोलावतात वाटते .... काय ही दारूसाठी रांग आहे ...?? देवा दुकान तर त्या टोकाला आहे ... चारशे माणसे तरी असतील रांगेत .... संध्याकाळ होईल बाटली हातात पडेल तेव्हा .. बघू अजून कुठे काय चालू आहे ...
अबब... सगळीकडे तीच परिस्थिती . नुसत्या रांगाच रांगा लागल्यात प्रत्येक दुकानात .... पण लोक बघा किती शिस्तबद्ध...  योग्य अंतर राखून..,कुठे गडबड गोंधळ नाही .एका हातात पैसे तयार ,ब्रँड फिक्स ,दोन मिनिटात काउंटरवरून दूर . आजूबाजूच्यांची चौकशी , एकमेकांना सहकार्य .. शिका काहीतरी शिका .. या दुकानावर तर महिलांसाठी वेगळी रांग, वरिष्ठ नागरिकांना प्राधान्य .... वा  हात जोडले पाहिजे .
इथे जरा रांग कमी दिसतेय .राहूया थोडा वेळ उभे . आपला तर अर्धा खंबा कोटा.पण नको एक बाटली घेऊच .लॉक डाऊन वाढला तर ...?? असलेली बरी.. रांग तशी पटापट पुढे जातेय .. येईल नंबर पंधरा मिनिटात ...
 आयला...!! आता हे पोलीस कशाला आले.. ??
काय..??  दुकान बंद करतायत ..नको हो दहा मिनिटे थांबा ..मी घेतो मग काय हवे ते करा . बघा बघा पब्लिक किती चिडलय ..
अरे.. आज किती महसूल वाढेल याचा विचार करा ..  लोक ऐकत नाहीत .. कशी ऐकणार .. कधीपासून रांगेत उभे आहोत आम्ही . नाही हटणार.. अहो साहेब मारताय काय आम्ही सभ्य लोक आहोत तोंडाने बोला .दादागिरी सहन करणार नाही .फुकट पीत नाही विकत घेऊन पितोय . मारू नका मारू नका.
देवा...ह्यांचा दंडुका तर जोरात बसतोय .... आई ग ढुंगण सुजणार बहुतेक . किती जोरात बसला फटका ... पळूया घरी नाहीतर अजून फटाके बसतील . उद्या मेव्हण्याला सांगतो आण बाबा अर्धी बाटली .
© श्री.किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment