Sunday, July 12, 2020

लॉकडाऊन ..१३

लॉकडाऊन ...१३
ती वस्तीच पूर्ण सील केली होती.बाहेरचा कोणीही आत जाऊ शकत नव्हता . तर बाहेर जाणाऱ्या स्त्रियांची चौकशी करूनच सोडले जात होते .कारणच तसे होते . सोशल डिस्टन्स इथे पळाले जाणारच नव्हते . त्या वस्तीत येणारे तसेच होते . पैसे देऊन आपली शारीरिक भूक भागविणारे . 
त्या वस्तीतलीच ती एक होती .आयुष्यभर तिने लोकांची भूक मिटवली होती . अतिशय कडक स्वभावाची पण प्रामाणिकपणे धंदा करणारी . आज तीन महिने होत आले . एकही गिऱ्हाईक तिच्या दारात आले नव्हते . काहीजणी लपून छपून बाहेर जाऊन धंदा करून येत होत्या. पण तिला हे पसंद नव्हते . सरकार जी मदत देईल ती घ्यायची आणि पुन्हा घरात बसायचे हेच करत होती ती . मदत घेताना पुरुषांच्या नजरा आणि चुकून नको त्या ठिकाणी होणारे स्पर्श सहन करीत होती ती . कधी कधी तिला नवल वाटायचे या परिस्थितीत ही कसे जमते याना . या लॉकडाऊनमुळे ती मेटाकूटीस आली होती.
पण घरी तिची दहा वर्षाची मुलगी खुश होती.कधी नव्हे तर आईचा सहवास तिला मिळत होता . ती जे बनवून द्यायची ती ते चवीने खात होती .नाहीतर आईचा सहवास कमीच मिळायचा तिला . हीची रात्र व्हायची तसा आईचा दिवस चालू व्हायचा . कधी कधी रात्रभर खाटेच्या कुरकुरीने तिला झोप येत नव्हती .
ही सकाळी उठून शाळेची तयारी करायची तेव्हा आई झोपलेली असायची . पण या लॉकडाऊनमुळे आई तिच्याकडे लक्ष देऊ लागली . तिला आता घरीच कांदेपोहे उपमा असा नाश्ता मिळू लागला .नाहीतरी रोज त्या अण्णाकडचे मेदू वडा ,इडली खाऊन कंटाळाच आला होता. आई तिला गोष्टी सांगत होती ..तिच्याशी सतत बोलत होती .व्यायाम करीत असताना कसे फिट राहावे हे समजावत होती .
खरेच तिनेही हा लॉकडाऊन सकारात्मक घेतला होता . सकाळी लवकर उठून योगा, व्यायाम . मग दोघींसाठी भरपूर नाश्ता. बरेच वर्षांनी ती मोकळा श्वास घेत होती . मुलीला वेळ देत होती . लॉकडाऊनमध्ये आपल्या धंद्याचे काय होणार ही चिंता होतीच . पण तरीही खचू द्यायचे नाही असाच विचार करीत दिवस ढकलत होती . आपले शरीरच मोठे भांडवल आहे हे लक्षात ठेवून नेहमी फिट राहण्याचा प्रयत्न करीत होती.
त्या वस्तीत तो पहिल्यांदाच पहाऱ्यावर आला होता . कोवळा तरुणच दिसत होता तो . त्याची भिरभिरणारी नजर हे काही नवीनच आहे याची जाणीव करून देत होती. वस्तीतल्या स्त्रियांनी बरोबर हेरले होते त्याला . सूचक इशारेही चालू केले त्यांनी . ते पाहून ती स्वतःशीच हसत होती . "त्यांची तरी काय चूक ...?? हा तर धंदा आहे..." बरेच दिवस हे नजरेचे खेळ चालू होते पण गोष्ट पुढे जात नव्हती .
त्यादिवशी ती सामान घेऊन येत असताना त्याची आणि तिची नजरानजर झाली . त्याच्या डोळ्यातील भाव पाहून सुखावली . त्याच्या डोळ्यात वासना नव्हती तर स्वप्नाळू दिसत होते ,थोडे रंगीलही .त्याची नजर आपल्या पाठीवर रेंगाळते याची तिला जाणीव झाली .बरेच दिवस हे चालू होते.
 मग त्या दिवशी तिने खिडकीतूनच चहाचा कप दाखविला .त्याने लाजून मान डोलावली इकडे तिकडे पाहत तो तिच्या खोलीत शिरला . तिच्या मुलीला मोबाईलवर खेळताना पाहून तो हसला आणि गालाचा चिमटा काढला . मुलगी शहारली आणि आत धावत गेली . गप्पा मारत मारता त्याने सहा महिन्यांपूर्वी लग्न झाले असे सांगितले . पण आता लॉकडाऊनमुळे  तीन महिन्यापूर्वीच बायकोला गावी पाठविले होते . सध्या एकटाच होता . वेगवेगळ्या ठिकाणी ड्युटी करत होता .
बोलता बोलता कधी जवळ आले ते दोघांनाही कळले नाही .तिचा ही गेले दोन महिने पुरुषांशी संबंध नव्हताच तर तो तीन महिने उपाशी . एक वादळ त्या खोलीत आले आणि काहीवेळाने शांत झाले . 
त्याने कपडे चढवून पैश्याचे पाकीट उघडले तिने मान हलवून नकार दिला . किती दिवस उपाशी राहून ड्युटी करतोय माझ्याकडून ही भेट समज असे बोलून पुन्हा चहाचा आग्रह केला . 
तो बेडवर बसला असतानाच ती छोटी बाहेर आली . तिला पाहून याचे डोळे लकाकले. त्याने पुन्हा तिच्या गालावरून हात फिरवला तिने तो झिडकारला आणि पुन्हा आत पळाली .
तिने दिलेला चहा पिऊन तो बाहेर पडला .काही दिवस हे असेच चालू होते.
  एक दिवस तो बाहेर पडताच ती छोटी बाहेर आली . 
"मला तो अजिबात आवडला नाही . त्याचा स्पर्श घाणेरडा होता. पुन्हा बोलावू नकोस त्याला ... "ती खिडकीतून त्याच्याकडे पाहणाऱ्या आईला म्हणाली .
"माहितीय बेटा ...तुला स्पर्श करताना त्याची नजर पहिली मी .म्हणूनच त्याला असे औषध दिलय की पुढचे सहा महिने त्याला कसलीच इच्छा होणार नाही . वासनेने पिसाट बनलेल्या पुरुषांना कंट्रोल करायचे औषध आपल्याइथे सर्वांना दिलंय. तेच चहातून दिले त्याला . मी सगळे सहन करेन पण माझ्या मुलीवर कोणाची वाकडी नजर पडू देणार नाही . पण तो ही आपला रक्षणकर्ता आहे . रक्षकाने भक्षक होऊ नये म्हणून काही महिने ही शिक्षा पुरेशी आहे त्याला ...ती छोटीला जवळ  घेत म्हणाली .
तो खाली आपल्या जागेवर बसून तृप्तीचे क्षण उपभोगत होता .
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment