Sunday, July 12, 2020

फादर्स डे ..२०२०

फादर्स डे...२०२०
तो बाप.... हॉस्पिटलमध्ये बायकोच्या प्रसूतीच्या वेळी काळजीने फेऱ्या मारणारा आणि बाळाच्या जन्माची बातमी ऐकताच हळूच डोळे पुसणारा.
तो बाप ... आईला त्रास होऊ नये म्हणून बाळाचे डायपर बदलणारा.
तो बाप... मुलाला चांगल्या शाळेत ऍडमिशन मिळावे म्हणून रात्रभर शाळेच्या दरवाजावर रांगेत उभा राहणारा.
तो बाप... मुलाचे पराक्रम अभिमानाने ऑफिसमध्ये सांगणारा.
तो बाप... दारूच्या नशेत आईला शिव्या देणारा पोराला लाथा घालणारा. 
तो बाप.... मुलाच्या खिशातून पैसे चोरून मित्रांना दारू पाजाणारा.
तो बाप.... मुलाला पोरगी पळवून आणली म्हणून अभिनंदन करणारा नंतर मुलीच्या बापापुढे हात जोडून माफी मागणारा.
तो बाप....मुलाला बार मध्ये पिताना पकडणारा आणि स्वतःचा बार बदलणारा.
तो बाप... एक बुवा सांगतो म्हणून मुलाच्या यशासाठी उपवास धरणारा.
तो बाप ... मुलासाठी टी शर्ट आणणारा आणि बायकोमार्फत त्याच्याकडे पोचवून त्याच्या चेहऱ्यावरचे भाव निखारणारा.
तो बाप.... पोरांना घरी यायला उशीर झाला की बायकोला फोन कर फोन कर म्हणून सतावणारा.
तो बाप... मुलाचा सर्व पगार झडप मारून ताब्यात घेणारा.
तो बाप... मुलाच्या शिक्षणासाठी बँकांचे ..सावकारांचे उंबरठे झिजवणारा.
तो बाप.... चार मुली झाल्या म्हणून वंशाच्या दिव्यासाठी पाचव्या वेळी पुन्हा प्रयत्न करणारा.
तो बाप... मुलगी आहे हे कळल्यावर गर्भाशयातच हत्या करणारा.
तो बाप... आपण बाप होऊ शकणार नाही हे कळल्यावर अनाथाश्रमातून मूल दत्तक घेणारा.
तो बाप... मुलावर बोजा पडू नये म्हणून आपला आजार लपविणारा.
कसाही असला तरी बाप तो बापच.
हॅपी फादर्स डे
© श्री. किरण कृष्णा बोरकर

No comments:

Post a Comment